नांदेड : ( दादाराव आगलावे)
योग साधकांसाठी भव्य योग भवन बांधून देण्याचे आश्वासन नांदेड उत्तर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिले आहे.
पतंजली योगपीठ अंतर्गत नांदेड येथील मालेगाव रोडवर भक्ती लॉन्स मंगल कार्यालय येथे गेल्या पाच महिन्यापासून निरंतर मोफत चालू असलेल्या योग साधना शिबिरास नांदेडचे उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा शिबिराचे मार्गदर्शक तथा योग गुरु सिताराम सोनटक्के यांनी यथोचित स्वागत केले.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वतः योगसाधनेत सहभाग नोंदवून योग अभ्यास केला. भक्ती लॉन्स योगा समितीचे पदाधिकारी सदाशिवराव बुटले पाटील यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्याचा व विकासात्मक दृष्टीकोनाचा गौरव करून नांदेड वासियांसाठी सर्व सुविधायुक्त योग भवन बांधून देण्याची योगसाधकांच्या वतीने विनंती केली यावर स्वागताला उत्तर देताना आमदार बालाजी कल्याणकर यांनी योगभवनासाठी निधीची अजिबात कमतरता पडू देणार नाही परंतु जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी किमान दोन हजार साधक योग साधना करतील असे भवन आपण निश्चित बांधून देऊ असे यावेळी आश्वासन दिले.
याप्रसंगी त्यांनी योग गुरु सिताराम सोनटक्के हे मोफत योग साधकांना निसिम व निस्वार्थ सेवा देत असल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर यांचे समर्थक उमेश दिघे, भक्ती लॉन्स योग समितीचे सर्व पदाधिकारी व शेकडो महिला व पुरुष योग साधक यांची उपस्थित होती .