Post Views: 123
नवे शैक्षणिक वर्ष सुरुच होते आहे. कोणत्याही शैक्षणिक वर्षात कुठेही एकही शाळाबाह्य विद्यार्थी असू नये, असा राज्य सरकारचा दंडक आहे. स्तंभलेखक व शिक्षक मारोती कदम यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना शाळेत प्रवेश दिला. परंतु त्यापैकी एका मुलाचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांनी या वास्तव घटनेचे लेखस्वरुप चित्रण केले. वाशीम जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबातील एका मुलाच्या आकस्मिक निधनामुळे त्या कुटुंबावर आलेला काळाचा घाला म्हणजे मारोती कदम यांचा लेख म्हणजे ‘निष्पाप बळी’ होय. कदम हे अत्यंत संवेदनशील मनाचे लेखक आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या ज्या अशा घटना त्या कदमांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत त्या कागदावर शब्दबद्ध होणारच! ते जसे संवेदनशील लेखक आहेत तसे ते विद्यार्थ्यांच्या भावविश्वात रमणारे बालमूलक शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेत म्हणजे पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू होतो आणि कदम प्रचंड अस्वस्थ होतात. त्यांचा मृत्यू कदमांचे काळीज हालवून सोडतो. ते भावविवश होतात परंतु भावनेच्या भरात दुसरीकडे वाहत जात नाहीत. एखाद्याच्या आयुष्यात माणसाला लाचार करुन टाकणारी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्या परिस्थितीनुसार त्याच्या किंवा संबंधित लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेणारे अनेक लोक त्यावेळी तयारच असतात. मारोती कदम हे अशा बाबतीत कोसो दूर आहेत. कारण ते आपल्या स्वभावसंबंधाने काही तत्व बाळगून आहेत. त्यामुळे त्यांचे वर्तन कधीही तत्वद्रोही नसणारेच आहे. म्हणून साहिलचा मृत्यू चटका लावून गेला असला तरी त्यांनी परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळत त्या गरीब कुटुंबाला त्या विभागातील शिक्षकांकडून काही मदत मिळेल का याचा विचार केला. त्यांनी तसे आवाहन करताच देणाऱ्याचे हात हजारो पुढे आले आणि एक चळवळ उभी राहिली.
मारोती कदम यांनी ‘साहिल’साठी जी चळवळ उभी केली त्यासाठी फार मोठे कारण आहे. ते महत्वाचेही आहे. ते इतरांनी आदर्श घेण्यासारखेही आहे. ज्या घटनेमुळे लोकांनी पांडे कुटुंबासाठी जी सहानुभूती दाखवली तीही तितकीच महत्त्वाची आहे. पांडे कुटुंब हे मुळचे वाशिम जिल्ह्यातील असले तरी ते पिंपळगाव लिखा येथे सालगडी म्हणून वास्तव्यास होते. हे सालगडी म्हणजे चंद्रशेखर पांडे. साहिल त्यांचाच मुलगा. तो शाळेत जात नसल्याचे कदम यांच्या लक्षात आले. त्यांनी विचारणा केली आणि त्यातून साहिलचा आणि त्याची बहीण पूर्वाचा दररोज कदम सरांसोबतच शाळेत येण्याचा प्रवास सुरू झाला. त्यांना शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत प्रवेशित झाल्याचा आनंद होताच परंतु मुलं शिकताहेत, दररोज अभ्यास, गृहपाठ करताहेत यांचा आनंद अधिक होता. शिक्षणापासून वंचित असणारी ही मुले शाळेत आणि शिक्षणाच्या प्रवाहात आली होती. लिहू लागली होती, वाचू लागली होती. कोणत्याही शिक्षकाला याचा आनंदच होणार. महाराष्ट्र सरकार शाळाबाह्य मुलांना शोधून म्हणजे सर्वेक्षण करुन शाळेत दाखल करण्यासाठी दंडक घालत आहे. अशी शाळाबाह्य मुले आता नाहीतच अशी परिस्थिती आहे. कदमांनी ही किमया साधली होती. त्यांना दररोज मुलांना आखाड्यावरुन शाळेत आणि शाळेतून आखाड्यावर मोटारसायकलवरून नेण्यात आणि आणून सोडण्यात कोण आनंद होता! अशातच घात झाला! साहिल गेला… धक्कादायक होते हे ऐकणे. कुणाचाही विश्वासच बसणार नाही अशी ही बातमी. पण बातमी खात्री पटणारी होती. अनेक प्रश्नांनी कदमांच्या डोक्यात काहूर माजले. चैन पडत नव्हते. दुसर्या दिवशी शाळेत जाताना कदम सर आणि त्यांचे मुख्याध्यापक सांत्वनपर भेट घेण्यासाठी आखाड्यावर गेले. हे दिसताच चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नीने एकच हंबरडा फोडला.
हा हंबरडा काळीज चिरून आरपार जात होता. आता काळीज आभाळाएवढं करणं शक्य नव्हतं. त्या मातेचा एकेक शब्द आसमंत भेदत होता. काही वेळ हे दोघे स्तब्धच होते. काय बोलावे काही सुचत नव्हते. परंतु कदम सरांनी परिस्थितीवर आणि स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित करीत साहिलच्या वडिलांना बोलते केले. ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. आईवडिलांचे दुःख काही वेगवेगळे नव्हते. तसेच आता त्या वातावरणात कठोरातला कठोर व्यक्ती वितळल्याशिवाय राहणार नव्हता, अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी होती. तरीसुद्धा दुःखाचे कढ पचवित ते म्हणाले, ‘सर, त्याला थोडी ताप होती. ऊसाच्या फडावर ट्रॅक्टर आले होते, ते भरुन देऊन चार वाजता दवाखान्यात घेऊन जावे म्हणून आम्ही माल कमी असल्याने ऊसतोडीत दंग होतो. लेकरं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत खेळत होती. ट्रॅक्टर भरण्यासाठी ट्रॅक्टरकडे गेलो असता, साहिल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता सर, उन्हाच्या तीव्रतेने त्याचा ताप वाढून त्याला भोवळ येऊन खाली कधी पडला हे आम्हाला कळलेच नाही. तोंडातून रक्तस्त्राव चालूच होता. तरी मालकाच्या गाडीवर दवाखाना गाठला पण, डॉक्टर म्हणाले, उशिर केलात!. सर, सांगा आता आम्हाला इथं काम करायला मन लागेल का? मागे माझ्या पाव्हण्याला साप चावला, गेल्या महिन्यात आमची झोपडी जळाली, त्यात सर्व संसार जळून खाक झाला. आता तर माझ्या काळजाचा तुकडाच गेला… सर…’ पुढे ते स्वतःला आवरत म्हणाले, ‘अगोदरच ऊसतोडीचा मुकादम म्हणून मालकाकडून दीड- दोन लाख घेऊन ऊसतोड कामगारांना दिले तर ते रक्कम घेऊन पसार झाले, म्हणून मला ते दोन लाख फेडण्यासाठी इथं सालगडी म्हणून कुटुंबासह रहावं लागलं आहे सर…!’
साहिलच्या वडिलांना मुकादमी करणं चांगलंच अंगलट आलं होतं. त्याचे आईवडील अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करीत होते. पण त्यांना फसविणारे तितकेच बदमाश होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते दोन लाख फेडण्यासाठी हे कुटुंबिय वाशिमहून इथे आले होते. वर्षभरात ते पैसे फिटलेही असते. परंतु भटकंतीमुळे पोरांच्या शिक्षणावर गदा येत होती. मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत होती. यातून कदम सरांनी मार्ग काढला होता. मुलांचे शिक्षण सुरू झाले होते. पांडे कुटुंबियांच्या मेहनतीला मुलांच्या शिक्षणाची सोनेरी किनार लाभत होती. पण अशातच घात होतो. एकाएकी साहिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो. हा प्रकार म्हणजे माणसाच्या आकलनशक्तीच्या पलिकडला आहे. आईवडिल किंवा त्याठिकाणी कुणीही असते तर सगळेच भांबावून गेले असते. ते तसेच झाले. काय झाले हे समजण्याच्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या आतच साहिल गेला होता. कारण खूप उशीर झाला होता. त्याला काय झाले, त्याला कोणता रोग होता, त्याला आधीच काही बिमारी होती का, एकाएकी रक्ताच्या थारोळ्याने वेढणे याला तत्कालीन कारण कोणते आदी प्रश्न अनुत्तरितच राहतात. या प्रश्नांची उत्तरे कदमांच्या निष्पाप बळी या लेखात सापडत नाहीत. कारण हा प्रकार ते त्यांच्या मूळ गावी असते तरी घडला असता. परंतु जी आर्थिक विवंचना पांडे कुटुंबियांच्या मागे होती. त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, एकामागून एक संकटे येत होती यामुळे मुलांच्या आरोग्याकडे किंवा शिक्षणाकडे लक्ष देणे कठीण होऊन बसले होते. या सगळ्यांमध्ये साहिलचा काय दोष होता? इथे दोषी कोण होते? परिस्थिती? की आणखी कुणी?
कदम सर आणि त्यांचे मुख्याध्यापक धीर द्यायला गेलेत, पण त्यांनाही भावना आवरता आल्या नाहीत. चंद्रशेखरची दर्दनाक कहाणी ऐकून त्यांचं मन सुन्नं झालं होतं. लेखात कदम लिहितात की, त्यांचे सांत्वन करताना आमची बोबडी वळू लागली आणि शेवटी तिथून निघतांना आम्ही तुमच्यासाठी राजीव गांधी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव पाठवून तुम्हाला काही आर्थिक मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करु! या शब्दात धीर देऊन त्यांनी त्यांचा निरोप घेतला. आता दररोज शाळेला जाताना साहिल आखाड्यावर दिसत नाही ही बाब मनाला चटका लावून जात होती . नियतीने व दारिद्रयाच्या युतीने निष्पाप साहिलचा बळी घेतला होता. ही बाब कदमांना कुठे तरी अस्वस्थ करीत होती. ती खेळत असलेली मुले, पालकांशी झालेला संवाद, त्यांचे स्मीत हास्य, मोटारसायकलवरून नेणे आणणे, आधार कार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया, त्यांचा अभ्यास वगैरे सगळं सगळं लख्खपणे आठवत होतं. त्यांना मागचं काहीतरी आठवत होतं आणि त्यांची तगमग होत होती. मेंदूत वैचारिक तडफड होत होती. आता आपण काय करू शकतो या दिशेने त्यांची हतबलता जात होती. कदम सर जात्याच शैक्षणिक चळवळीतील शिक्षक-कार्यकर्ते आहेत. ते काही स्वस्थ बसणारे नव्हते. त्यांचा सर्जनशील मेंदू काही एका चळवळीची दिशा रेखाटत होता. एक संपूर्ण रचनात्मक आराखडा तयार होत होता. तो तयार झाला की, तो लोकांपर्यंत जाणार होता. परंतु एक शंकाही त्यासोबत होती. ही योजना कितपत यशस्वी होईल?
मग कदम सरांनी अगदी धाडसाने आपली योजना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात आधी त्यांनी ‘निष्पाप बळी’ हा साहिलवर आधारित म्हणजे या सत्य घटनेवर आधारित लेख लिहिला. तो व्हाट्सअप समुहात पसरवला गेला. यातून लोकांची विशेषतः त्या भागातील शिक्षकवृंदांची सहानुभूती मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाली. या निमित्ताने त्यांनी साहिलच्या कुटुंबियांना यथायोग्य व यथाशक्ती मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आणि आपल्या फोन पे वर रक्कम जमा करण्यासही सांगितले. मग काय पहायचे! पटापटा रकमा जमा होऊ लागल्या. मग पुढे या शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केले. कदम सरांनी शिक्षक संघाच्या माध्यमातून हा समाजाभिमुख उपक्रम राबविला. एकूण एकावन्न हजारांची रोख रक्कम जमा झालेली होती. शिक्षक संघाचे पदाधिकारी मा .चेअरमन श्री विठ्ठलराव भोसले, क्रेडीट सोसायटीचे कोषाध्यक्ष श्री विष्णू गव्हाणे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक श्री पांडूरंग बारकर, मुख्याध्यापक श्री विठ्ठलराव रिठठे, श्री ज्ञानोबा विटकर, संगिता भोळे, तिरुपती केंद्रे, त्र्यंबक उदबुके, श्री गणेश कल्हारे, अंगणवाडी मदतनिस रुक्मीनबाई मोरे, चंदू मोरे यांच्या उपस्थितीत पांडे कुटूंबियांकडे शिक्षक संघाच्या सर्व शिलेदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जमा केलेली ५१,०००/- ही रक्कम संघाचे पदाधिकारी विठ्ठल भोसले, विष्णू गव्हाणे, पांडूरंग बारकर, डॉ. दिलिप श्रृंगारपुतळे यांच्या हस्ते शाळेतच एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.
ही घटना होती याच २०२४ सालच्या जानेवारी महिन्यातली. देणगी जमा करून ती पालकांकडे सुपुर्द करण्यास मार्च उजाडला. कारण कदम सरांनी निष्पाप बळी हा लेख लिहून त्यानंतरची सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागणारच होता. राजीव गांधी योजनेतून काही मदत मिळण्यास आणखी वेळ लागेल पण शिक्षकांनी सामाजिक जाण आणि भान ठेवून संवेदनशील मनाने आपले कर्तव्य बजावण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत कार्यक्रमावेळी व्यक्त झाले. तर शिक्षकांनी अध्यापना बरोबरच गुणवंत आणि उपेक्षित, वंचित घटकांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याची जाणीव समाजाला करून दिली पाहिजे. तसेच उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारण्याची भूमिका उपक्रमशील अध्यापक मारोती कदम यांनी सार्थ करून दाखविली. याचा कुणालाही अभिमानच वाटेल. काहीही घडले तरी शिक्षण ज्यांच्यापर्यंत पोहचत नाही, त्याला कारण काहीही असेल परंतु कदम सरांची त्या सर्वच वंचित घटकांपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाची गंगा पोहोचलीच पाहिजे ही त्यांची तळमळ पुढेही तसूभरही कमी झालेली दिसणार नाही. हे ठामपणे सांगता येईल. मी या निमित्ताने कदम सरांच्या एकुणच शैक्षणिक कार्याला खंबीरपणे सॅल्युट करतो. त्यांनी उभे केलेले कार्य उभेच रहावे. त्यांनी दिलेला हा आदर्श इतरांनीही घ्यावा तसेच पीडित कुटुंबांना दुःख विसरून जगण्याची उमेद मिळावी ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद!
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.
मो. 9890247953