मुखेड:( दादाराव आगलावे)
दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने दिनांक 16 व 17 जून रोजी श्रीक्षेत्र बासर येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुखेड येथून हजारो भाविक जाणार असल्याची माहिती मुखेड केंद्राच्या वतीने देण्यात आली.
भारतीय संस्कृतीमध्ये विद्येची देवता व बुद्धीची देवता म्हणून श्री सरस्वती मातेस प्रथम स्थान दिले आहे. या सामूहिक सरस्वती पूजन सोहळ्यातून मुलांमध्ये भक्ती व मूल्य संस्काराची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात येणार आहे. या उपक्रमात शालेय मुले, युवा-युती आणि पालक एकत्रितपणे सामूहिक पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन करणार आहेत.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने नेहमी समाज उपयोगी अशा 18 विभागांच्या माध्यमातून विविध ज्ञान विनामूल्य जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात येते. या सेवा कार्यातील बालसंस्कार विभागाच्या वतीने विविध उपक्रमातून व्यसनमुक्ती अंधश्रद्धा, पर्यावरण जनजागृती, गड किल्ले संवर्धन अशा अनेक विषयावर सामाजिक प्रबोधन करण्यात येते. बासर येथे दिनांक 16 रविवार व दिनांक 17 सोमवार रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
दिनांक 16 रोजी मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांची उपस्थिती बासर या ठिकाणी लाभणार असून इतर जिल्ह्यातील दिनांक 17 तारखेला सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळ्यासाठी उपस्थित राहायचे आहे. या सोहळ्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे यांची विशेष उपस्थिती राहणार असून सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने पालकाने मुलांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.