शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनावे -तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख

*कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी  दर्जेदार बियाण्याची घरच्या घरी निर्मिती करण्याचे केले आवाहन

कंधार ;

  पुढील वर्षासाठी लागणारे सोयाबीन बियाणे घरच्याघरी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच तयारी करून आपल्यासाठी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्या साठी लागणारे बियाणे तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा व मोठ्याप्रमाणावर बियाणे उपलब्ध करावे जेणेकरून येत्या खरीप हंगामासाठी बियाणेवरील होणारा दुपटीचा खर्च वाचून उत्पादन खर्चात बचत होईल तसेच बियाण्याच्या गुणवत्तेबद्दल शंका न राहता चांगले व दर्जेदार बियाणे तयार होईल आणि यापासून भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल. 

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विविध वाणांची चालू खरीप हंगामात पेरणी केलेली आहे.जेएस 335  या वाणाची मोठ्या प्रमाणावर लागवड तालुक्यात असली तरी याव्यतिरिक्त सोयाबीन एम ए यु एस 71, एम ए यु एस 158 ,एम एस यू एस162 ,एम ए यु एस 612, फुले संगम, फुले कल्याणी या वाणांची पेरणी केली आहे. सोयाबीन हे पीक स्वपरागीत असल्याने या पिकाचे घरचे बियाणे शेतकरी वापरू शकतात उत्पादकतेत कुठलीही कमतरता येत नाही. बियाणे तयार करताना  इतर वाणाची भेसळ होणार नाही एवढी काळजी घेतली तरी पुरेसे आहे.

चालू खरीप हंगामातील पिक आता  काढणीस तयार झालेले असून अशा पिकाच्या कापणीपूर्वी त्या शेतातील इतर गुणधर्म दाखवणारी झाडे जसे शेंगावरील लव त्याचबरोबर फुलांचा रंग  या व इतर काही वेगळे गुणधर्म असलेली झाडे ही  काढून टाकावित व त्यानंतर उर्वरित पिकाची कापणी करून शेतामध्ये हवामानाचा अंदाज घेत पसर वाळल्यानंतर त्याचा एकत्रित ढग करावा कापलेल्या पिकाचे पावसापासून संरक्षण करावे व असे सोयाबीन मळणी यंत्राद्वारे काढताना त्या मळणी यंत्राचा आरपीएम हा मर्यादित ठेवावा जेणेकरून बियाण्याला मळणी यंत्रद्वारे इजा होणार नाही व चांगल्या प्रकारचे बियाणे तयार होईल अशाप्रकारे तयार केलेल्या बियाण्याची आर्द्रता तपासून पहावी व त्या बियाण्यामध्ये पंधरा टक्केपेक्षा जास्त आर्द्रता असेल तर बियाणे उन्हात वाळवून घ्यावे व त्यानंतर बियाण्यातील काडीकचरा, बारीक,खराब ,किडके बियाणे हे वेगळे करावे व त्यानंतर असे तयार झालेले बियाणे ज्यूटच्या बारदानाचा वापर करून साठवून ठेवावे. साठवण करताना बियाण्याच्या पोत्यांची थप्पी एकावर एक 6 पोत्यांपेक्षा जास्त असू नये त्याचबरोबर आजूबाजूने व बुडाशी हवा खेळती राहील अशा पद्धतीने या बियाण्याची साठवण करावी.सोयाबीनच्या प्रचलित जातीपेक्षा जर आपण नवीन वाणाचे बियाणे साठवण केले तर अशा बियाण्याला शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने असे बियाणे हातोहात विक्री होण्यास मदत होते.

खरीप हंगामातील बियाण्यापासून आपल्या गरजेपुरती साठवण करून बाजारातील बियाण्यावर शेतकऱ्यांनी विसंबून न राहता घरच्या घरी तयार केलेले दर्जेदार बियाणे येत्या हंगामासाठी वापरून आत्मनिर्भर बनावे ही शेतकरी बांधवांना विनंती आहे. यावर्षी कृषी विभागामार्फत जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड आर.टी. सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या माध्यमातून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावागावात शेतकऱ्यांची निवड करून ज्या शेतकऱ्याकडे चांगल्या प्रतीचे सोयाबीन आहे अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शेतातील  बियाणे मळणी व साठवणबाबत मार्गदर्शन करून त्या त्या गावाला लागणारे सोयाबीन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जनजागृती व मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सूरू आहेत.त्या अनुषंगाने कंधार तालुक्याची गरज पाहता तालुक्‍यात सोयाबीनचा पेरा चालूवर्षी 23 हजार हेक्‍टरवर झालेला होता यामध्ये 10% वाढ अपेक्षित धरून साधारणत: 25 हजार हेक्‍टर क्षेत्राला लागणारे प्रति हेक्‍टरी 100 किलो बियाणे याप्रमाणे 25000 क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे यावर्षी पुरेसा पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच प्रकल्प जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत जमिनीतील पाणीपातळी सुद्धा चांगली असल्याने विंधन विहीर व विहिरींना पाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. पाणी पातळी स्थिर असल्याने या वर्षीसुद्धा रब्बीसह उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड होण्याची अपेक्षा आहे रब्बी हंगामामध्ये तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव गहू हरभरा भाजीपाला चारा पिकांसह  उशिरा रब्बीतील संकरित ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात करतात. त्याचबरोबर उन्हाळी हंगामात सुद्धा जिथं सिंचनाची व्यवस्था आहे अशा ठिकाणी संकरित ज्वारी त्याचबरोबर भुईमुगाचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतात.

गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पुरेसे सिंचन उपलब्ध असल्याने अशी पेरणी मोठ्या क्षेत्रावर होणे अपेक्षित आहे. यावर्षी शेतकरी बांधवांना विनंती आहे की जिथे शक्य आहे त्या ठिकाणी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर फरदड कापूस न घेता अशा कापसामध्ये भुईमुगाच्या बरोबर  सोयाबीन या पिकाची जर लागवड केली तर उन्हाळ्यामध्ये सोयाबीनचे अतिशय दर्जेदार बियाणे तयार होऊ शकते तसेच त्याची उगवण सुद्धा  ९० टक्के च्यापुढे मिळू शकते हे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी प्रचलित वाणाचे बीजोत्पादन न घेता सोयाबीन एम ए यू एस ७१ ,एम ए यु एस १५८; एम ए यू एस १६२;एम ए यू एस ६१२ ;फुले संगम ;फुले कल्याणी या व इतर चांगल्या जातींची निवड करून जर हा बीजोत्पादन कार्यक्रम उन्हाळी हंगामात राबवला  तर त्यापासून अतिशय चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे आपल्याला उपलब्ध होणार आहे .तालुक्यात अशा पद्धतीने २००० हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली तर कंधार तालुक्यासाठी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या संपूर्ण बियाण्याची गरज आहे ती संपूर्ण गरज या माध्यमातून पुर्ण होऊ शकते.

———————————————

तालुक्यातील गोणार येथील शेतकरी श्री सुभाष कदम यांनी गतवर्षी त्यांच्या स्वतःच्या शेतात अशा पद्धतीने उन्हाळी सोयाबीनची लागवड करून स्वतःला लागणारे बियाणे घरच्या घरी तयार केलेले होते यावर्षी सुद्धा ते जवळपास तीन एकर क्षेत्रावर या पद्धतीने लागवड करून बियाण्याचे उत्पादन घेणार आहेत.

———————————————

कुरूळा ता.कंधार येथील गंगाधर रामराव बेलदरे यांचे सोयाबीन वाण- MAUS-612 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *