(आज जागतिक योग दिन, त्यानिमित्य मोफत योग शिक्षण देण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले योगाचार्य सितारामजी सोनटक्के यांचा परिचय देणारा लेख)
प्राचीन हिंदुस्थानी तत्वज्ञानात मन आणि शरीराचा अभ्यास म्हणून योगाला ओळखले जाते. योगाच्या विविध शैली शारीरिक आसने, श्वासोच्छ्वासाची तंत्रे आणि ध्यान किंवा विश्रांती एकत्र करतात. योग ही मूलत: अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, योगामुळे मनुष्य अनेक बिमारीवर मात करू शकतो हे सिद्ध करून दाखवत जिल्हाभर नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर योगाचे मोफत धडे देणारे योग प्रशिक्षक योगाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.
धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती स्वार्थी बनत चाललेला आहे मी, माझं कुटुंब व माझा परिवार यांच्या बाहेर निघायला कोणी तयार नाही असे असताना सुद्धा योगाचारी सितारामजी सोनटक्के गुरुजी यास अपवाद आहेत. योगाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी मागील आठ महिन्यापासून भक्ती लॉन्स नांदेड येथे सकाळी पाच ते सात नियमित मोफत योगाचे प्रशिक्षण देत असतात. यात शेकडो पुरुष व महिलांना लाभ मिळतो. अत्यंत निस्वार्थ भावनेने सितारामजी सोनटक्के गुरुजी हे प्रशिक्षण देत असतात.
नांदेडकरांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. योगाचार्य म्हणतात, योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते,
लवचिकता आणि ताकद वाढवते, तणाव आणि चिंता कमी करते, एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते पचन आणि रक्ताभिसरण सुधारते. “योग” हा शब्द स्वतःच एक संपूर्ण विज्ञानासारखा आहे जो शरीर, मन, आत्मा आणि विश्वाला एकत्र आणतो. योगाचा इतिहास सुमारे ५ हजार वर्ष जुना आहे, जो प्राचीन हिंदुस्थानी तत्वज्ञानात मन आणि शरीराचा अभ्यास म्हणून ओळखला जातो. योगाच्या विविध शैली शारीरिक आसने, श्वासोच्छ्वासाची तंत्रे आणि ध्यान किंवा विश्रांती एकत्र करतात.
योगाची आठ अंगे सांगितली आहेत ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी होत. यास अष्टांगयोगही म्हटली जाते. योगाचार्य मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, योग हे एक प्राचीन भारतीय विद्या आहे जे आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी अनेक फायदे देते. योगासने, श्वास घेण्याचे व्यायाम आणि ध्यान यांचा समावेश करून, योग आपल्याला एकूणच निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यास मदत करते. योगाचार्य विविध आसणे प्रात्यक्षिके करून दाखवतात. या शिबिरातून महिला-पुरुष, युवक यांना मोठा फायदा होत आहे. योगाचार्य सितारामजी सोनटक्के गुरुजी यांच्या या निशुल्क कार्यामुळे परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे. सुमित मोरगे यांनी भक्ती लॉन्सची सकाळी पाच ते सात दरम्यान मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल योगाचार्यसह योग साधकांनी त्यांचे अभिनंदन केले. सितारामजी सोनटक्के यांनी वेगवेगळ्या रविवारी वेगवेगळे उपक्रम घेऊन साधकांना योगाची गोडी लावतात. योग मनुष्यासाठी खूप महत्त्वाचा असून कसलीही बिमारी यापासून दुरुस्त होऊ शकते आपण योगाकडे दुर्लक्ष करू नये असाही संदेश त्यांनी योग करताना देत असतात. आपल्या घरचे काम बुडवून ते केवळ छंद व समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने सितारामजी कार्य करीत आहेत. त्यांना अनेकांची साथ मिळालेली आहे. अशा त्यांच्या निस्वार्थी कार्यास नमन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा!
दादाराव आगलावे, मुखेड.
मो. 94 22 87 47 47