नांदेड दि. २७ जून २०२४:
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा केली.
गुरुवारी सायंकाळी रेलभवन येथे झालेल्या या भेटीत खा. अशोकराव चव्हाण यांनी मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांकडे रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले आणि या प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली. यामध्ये बहुप्रतिक्षित नांदेड-बिदर रेल्वे मार्ग आणि नव्याने प्रस्तावित केलेला नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचाही समावेश होता. हे रेल्वे मार्ग पूर्णत्वास आल्यास प्रवाशांसह समाजातील विविध घटकांना लाभ मिळणार असून, या परिसरातील अर्थकारणालाही गती लाभेल, असे खा. चव्हाण यांनी यावेळी रेल्वे मंत्र्यांना सांगितले.