मध्यरात्री हमसफर एक्स्प्रेस जम्मू स्टेशन ला पोंहचली. सर्वजण खाली उतरल्यावर हजेरी घेतली. शंभर टक्के उपस्थिती असल्यामुळे बिनफिकीर झालो. जम्मू स्टेशनवर भरपूर गर्दी असल्यामुळे सर्वांना अमरनाथ यात्री संघाच्या कॅप घालायला लावल्या. स्टेशन बाहेर आमच्या गाड्या येणार असल्यामुळे सामान घेऊन बाहेर पडलो. यावेळी मुद्दामहुन चंदिगडच्या एसी बसेस बुक केल्या होत्या. त्या दोन बसेस येण्यासाठी थोडा वेळ लागला. देर आये दुरुस्त आये या उक्ती प्रमाणे आलेल्या बस एकदम नवीन व आरामदायी होत्या. मी नेहमी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. यापूर्वी आम्ही कधी एसी बसेस वापरल्या नव्हत्या.गेल्या वर्षी जम्मू मध्ये गर्मी जास्त होत असल्यामुळे यावेळी एसी बस बुक केल्या होत्या. ४५ सीटर टू बाय टू पुश बॅक नवीन बस गुरु नानक ट्रॅव्हल्स ने पाठविल्या होत्या.त्यामुळे सर्वजण खुश झाले.
टूरमध्ये बसच्याvमागेपुढे बसण्यावरून नेहमी भांडणे होत असतात. त्यामुळे मी पूर्वीपासून अशी सिस्टीम लावली होती की, दररोज सीट नंबर चेंज करायची. त्यामुळे प्रत्येकाला समान न्याय मिळत होता. प्लॅटिनम ग्रुपचे लीडर होते माझ्या सोबत नऊ वेळेस अमरनाथ यात्रा पूर्ण केलेले सुभाष देवकते. कॅशियर बनवले होते रामेश्वर वाघमारे यांना. या ग्रुपमध्ये संजय राठोड, ज्योती वाघमारे, किरण व नारायण गवळी, वंदना व केदार मालपाणी, अलका व अमर शिखरे पाटील, पूजा व पवन मालपाणी पुणे, विद्या व प्रकाश शिंदे, जयश्री व मधुकर पाष्टे, आशुतोष, सुजाता मुखाडे, संगीता व नारायण भूसे, माया व शिवाजी डिग्रसे, शिल्पा व मच्छिंद्र गिरी, अपर्णा व कल्याण शिरशीकर, संगीता व प्रदीप दांडेगावकर, अक्षय व शाम हुरणे, मुकेश व योगेश पटेल, रेणुका व माधव उल्लेवाड, वैशाली व द्वारकादास नखाते, वर्षा व अरुण हिवरेकर, सविता व सुभाष वलबे, अर्चना व उमाकांत कदम, कैलास घागरदरे, गोपीनाथ वैद्यम, सचिन उल्लेवाड यांचा समावेश होता.
चेक पोस्ट वरून आम्हाला सकाळी पाच वाजता सोडले. रस्त्यात एका लंगर वर सर्वांनी नाष्टा केला. लंगरवाल्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. बस मध्ये समोसा कचोरी हा खेळ घेतला. विजेत्याला पाचशे रुपये बक्षीस होते तर जे हरतील त्यांना पेनल्टी म्हणून एखादे गाणे किंवा विनोद म्हणायचे असते. ते जर म्हटले नाही तर पन्नास रुपये फाईन द्यावा लागतो. दोन्ही करायचे नसेल तर एक उठबशी काढली तर सर्वच माफ. गेम मध्ये खूप मजा आली. प्रत्येक जण हरल्यानंतर काहीतरी म्हणायचा. त्यानंतर मी प्रत्येकावर वेगवेगळ्या विनोद सांगून सर्वांनी ज्या टाळ्या मिळवल्या. एका बस मध्ये सुरेखा रहाटीकर तर दुसऱ्या ग्रुप मध्ये मुकेश पटेल हे विजय ठरले. या सगळ्या गदागोळ्यात प्रवास कधी संपला हे समजले देखील नाही.
चारच्या सुमारास आम्ही श्रीनगरला पोहोचलो. त्या ठिकाणी मोठ्या गाड्यांना शहरात प्रवेश नव्हता. त्यामुळे लोकल छोट्या गाड्या करून आम्ही हॉटेल मालाबार ला पोहोचलो. याशिवाय कश्मिरा, लेक व्ह्यू मध्ये देखील काही रूम बुक केलेले होत्या. दोन दिवस आंघोळ केलेली नसल्यामुळे गरम पाण्याने मनसोक्त आंघोळ केली. थकवा निघून गेला होता. आमच्या सोबत असणारे प्रसिद्ध व्यापारी शाम हुरणे यांच्यातर्फे रात्रीचे जेवण देण्यात आले. अन्नपूर्णा भोजनालयातील जेवण सर्वांना आवडले. सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे लवकर झोपा असा सर्वांना मेसेज पाठवला.
*(क्रमशः)*