अमरनाथ गुहेतून भाग- 4 (*लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर)

 

मोठ्या गाड्यांना सात नंतर शहरात प्रवेश बंदी असल्यामुळे हॉटेल मालाबार मधून सर्व सामान घेऊन सकाळी आम्ही साडेसहाला निघालो. सुरुवातीला पाहिले हजरत बल दर्गा. अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी मोहम्मद पैगंबर त्यांच्या दाढीचा एक केस जपून ठेवण्यात आलेला आहे. नेहमी बातम्यांमध्ये हजरतबलचा उल्लेख असतो. काही वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी हजरत बल दर्गा मध्ये तळ ठोकला होता. तेव्हापासून हा परिसर बराच सेन्सिटिव्ह आहे. या दर्ग्याच्या ठिकाणी अनेक कबुतरे आहेत.दाणे टाकले की ते अगदी आपल्याजवळ येऊन दाणे टिपतात. इतक्या मोठ्या संख्येने कबूतर पाहून अनेकांनी फोटो शूट केले.

त्यानंतर आमचा मोर्चा वळला तो खीर भवानी मंदिराकडे. तेथील पुजारी विजय शर्मा यांनी मंदिराबद्दलची माहिती दिली. लंकेमध्ये रावणाने भक्ती करून पार्वती मातेला आणले.परंतु राम रावण युद्धात फार मनुष्यहानी झाली असल्यामुळे पार्वती मातेने हनुमानाला सांगून जल रूपात कश्मीरमध्ये प्रस्थान केले.या मंदिरात पार्वती सोबत शिवजीची पिंडी असून संपूर्ण भारतात फक्त इथेच अशी मूर्ती आढळून येते. या ठिकाणी खीर चा प्रसाद चालतो. म्हणून देवीला खिर भवानी असे नाव पडले आहे.तलावात हे मंदिर असून तिथे पूजा-याशिवाय कोणी जात नाही. या तलावातील पाणी प्रत्येक मोसमात बदलत असते.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शक्तीपीठात चिनारच्या वृक्षांमध्ये भारताचा नकाशा स्पष्ट दिसत दिसतो. नवलच आहे नाही का? इथे आम्ही चविष्ट लंगरचा आस्वाद घेतला. मोफत उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल लंगरच्या व्यवस्थापकांचा ट्रॉफी व शिरोपाव देऊन सत्कार केला.

तिथून आम्ही निघालो सोनमर्ग कडे. अतिशय निसर्गरम्य परिसर आहे हा. तसे पाहिले तर संपूर्ण कश्मीरच नितांत सुंदर आहे. कश्मीरमध्ये आलेली व्यक्ती तीन ठिकाणे आवर्जून पाहतात ती म्हणजे गुलमर्ग ,सोनमर्ग व पहेलगाम. सोनमर्गला आम्ही उतरल्यावर छोट्या जीपवाल्यांनी आम्हाला गराडा घातला. उंच पर्वतावर असलेले सहा पॉईंट पाहण्यासाठी छोट्या जीप घेऊन जावे लागते.प्रत्येकी सातशे रुपये दराने जीप हायर केल्या. झिरो पॉईंट सह इतर प्रेक्षणीय स्थळे पाहिली. झिरो पॉईंट वर असलेला बर्फ पाहून प्रत्येकाला बालपण आठवले. बर्फावर घसरणाऱ्या गाडीत बसून प्रत्येकाने मजा घेतली. सेल्फी आणि रिल इतक्या बनवल्या की विचारू नका. या सगळ्यात सायंकाळचे सहा वाजले. आमच्या सोबत असलेल्या हिंगोले परिवाराने चविष्ट असे ब्रेड पकोडे व चहाची व्यवस्था केली होती.बालटालचे गेट सायंकाळी सहाला बंद होत असल्यामुळे आमची घालमेल सुरू झाली. गडबड करत बालटाल ला पोहोचलो. बालटालला पूर्वी एकदा अतिरेकी हल्ला झाला असल्यामुळे हा परिसर मिलिटरी च्या ताब्यात होता. प्रत्येकाची कडक तपासणी करून आम्हाला बेस कॅम्प मध्ये सोडण्यात आले. या ठिकाणी यात्रा परची दाखून आरएफआयडी घ्यावे लागते. सर्वांची यात्रा परची योग्य असल्यामुळे काही अडचण आली नाही.बालटाल बेस कॅम्प मध्ये एक दिवस मुक्काम यासाठी करायचा असतो की, त्या वातावरणाशी एकरूप होता यावे. बालटालचा परिसरात अनेक छोटे छोटे तंबू तात्पुरत्या स्वरूपात उभारून सर्वांच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे. मी अनेक वर्षापासून पूजा टेन्ट हाऊस मध्येच राहतो. एका टेन्ट मध्ये सहा ते दहा व्यक्तींची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असते. पलंगाच्या वर गादी, रजई व उशी ठेवलेली असते.आम्ही सगळे नव्वद जण वेगवेगळ्या टेन्ट मध्ये सामावलो. रात्री अडीच वाजता दर्शनासाठी निघायचे असल्यामुळे घोडे व डोलीची आत्ताच बुकिंग करणे आवश्यक होते. यावर्षी अमरनाथ शाईन बोर्ड ने घोड्यासाठी ₹ ४५०० तर पालखीसाठी ₹१७५००असा दर ठेवला होता.हे पैसे आडवांस मध्ये भरून पावती घ्यावी लागते.दुसऱ्या दिवशीच्या सर्व सूचना सर्वांना सांगितल्या. लंगर मध्ये जेवून लवकरच झोपी गेलो.
(क्रमश:)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *