अंधश्रद्धा,दैववाद,नशीब,ढोंग, अहंकार,दुराचार,अत्याचार वाईट प्रवृत्तींना दूर लोटून आणि नैतिकता, सदाचार ,समानता,दया ,करुणा,क्षमा, शांती या सर्वांमध्ये ईश्वराचा अंश आहे. तो आपणाला पंढरीच्या वारी मधून वेळोवेळी प्रत्ययास येतो. प्रत्येक भक्तात सुप्त अवस्थेत परमतत्त्व असते ते भक्ती भावाने सर्वांना जागृत करते, समतेचे तत्व प्रत्येकाने आचरणात आणावे, भेदाभेद करू नये,जोपर्यंत सर्वजण एकत्रित येत नाहीत,तोपर्यंत समाजाचा, देशाचा उद्धार होत नाही हे आपल्याला या वारीतून शिकवलं जाते. म्हणून
*अवघे गरजे पंढरपुर। चालला नामाचा गजर।। टाळ घोष कानीं येती। ध्यानी विठ्ठलाची मूर्ती* पंढरीच्या वारीला प्रत्यक्ष पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. हजारो अन्नदाते वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी आतुरतेने त्यांची वाट पाहत आहेत. वारकरी या काळात पडणाऱ्या पावसाला, उन्हाला, वादळवाऱ्याना अजिबात जुमानत नाहीत.आषाढ सरीमध्ये तो ओलाचिंब भिजवून विठ्ठलाचे गुणगान करीत पुढे जातो.
*पांडुरंग जाहलो हो। चंद्र भागा तीर* मुखाने म्हणत लाखो वारकरी चालत आहेत पण एकही उपाशी राहत नाही.कोणालाही निमंत्रण नाही, हजारो गावची माणसे एकत्रित आली पण कधी भांडण,तंटा, वादविवाद नाही *या रे या रे लहानथोरं । याति भलती नारी नर।। म्हणून सर्व एकत्रित येतात.जिथे भाव आहे तेथे प्रत्यक्ष देव आहे. त्या देवाला भेटण्या साठीच सर्व वारकरी एकत्रित येऊन पंढरपूरला हरिनामाचा गजर करतात. पंढरपुराकडे येणाऱ्या दहा रस्त्यातून वारकरी येत असतात. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी गावोगावी भक्तमंडळी उत्सुक असतात.
जो पायाने चालतो तो प्रवास, जो भावनेने चालतो ती यात्रा, व जो हृदयाने चालतो ती पंढरीची वारी असते. आठशे वर्षांपासून ही अखंड वारी आळंदी व देहू येथून चालत आहेत. 28 जून रोजी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या देहू येथून 329 दिंड्या व 29 जून रोजी संत ज्ञानोबा माऊली यांच्या आळंदी येथून 450 दिंड्या मार्गस्थ होऊन काही दिंड्या वाटेत विलीन होतात, या दोन्ही दिंड्या विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपुराकडे प्रस्थान केल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणावरून वारकरी दिंडीत सामील झाले,ना कशाची चिंता,ना कशाबद्दल खंत सर्व एकत्र येऊन ही दिंडी समतेची, एकात्मतेची, हृदयाची भाषा जोडून सर्व धर्मीयांना सोबत घेऊन निघाली. *इडा पिडा टळुनी जाती। देहाला या लाभे मुक्ती* मजल दर मजल करत प्रत्येक ठिकाणी विसावा घेत दिंड्या चालत आहेत, हरिपाठ, काकड आरती, भजन, कीर्तन, भारुडे, भोपळ्या सर्व काही चालतात. हरिनामाचा गजर करतात, टाळ मृदुंगाचा आवाज कानी घुमतो, पंढरीचा पांडुरंग सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी युगानुयुगे कटेवर हात ठेवून उभा आहे.म्हणून सर्वांचे दुःख,दारिद्र्य ,इडा,पिडा सगळ्या टळून जातात या वारीमध्ये आणि देहाला मुक्ती मिळते,ते वारकरी मुक्त कंठाने आळवणी करतात.
ही वारी जीवन सरीता असून ती नैतिक, सामाजिक जीवनमूल्ये शिकविते, या वारीतून शारीरिक
,मानसिक थकवा दूर होऊन आजार नाहीसे होतात. इतराबद्दल दया, प्रेम, आपुलकी, माया मनात उत्पन्न होते. वारीमध्ये येणाऱ्या भक्ताच्या भोजना साठीच्या पंगती सर्वधर्मसमभावाची शिकवण देतात, कोण कुठून आला? कशासाठी आला? कोणाला सोबत घेऊन आला या सर्व प्रश्नांची उत्तरे वारीत मिळतात. येथे मनाला शांती मिळते. माणसाचा स्वभाव कसाही असो येथे वारीत तो सौजन्याने वागतो. ही वारी अहंकार कमी करते. जीवनाला चांगले वळण लावते. सन्मार्गाकडे घेऊन जाते. ही वारी सत्वगुणाची आहे. आपल्या घराकडील राग ,द्वेष, सर्व काही ती विसरायला लावते, या वारीमुळे समाज एक संघ होतो, मनामध्ये आपले पणाची भावना तयार होते. *नाम रंगी रंगलो हो। संतांचे माहेर*
म्हणून संत कान्होपात्रा म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे, अनेक संतांनी पंढरपूरला माहेर म्हटलेलं आहे, दिव्यांग, निराधार अनाथ यांना वारी आधार देते. विठुरायाच्या दर्शनासाठी स्वतः अपंगत्व विसरून जातात. आपले वय विसरून झिम्मा, फुगडी, नृत्य करताना पाऊले खेळताना वारकरी दिसतात, हाच तो आनंद येथे मिळतो. म्हणून *ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही*
ही वारी हृदय जोडणारी वारी आहे. त्यासाठीच वारी हा एक सत्वगुणाचा सोहळा आहे .
हा सत्वगुणाचा सोहळा पंढरीकडे जाताना तो भक्ती, बंधूंभाव सात्विकता,समानता, समरसता ही जीवनमूल्ये शिकवते.
*सकळाशी येथे आहे अधिकार। कालीयुगी उद्धार हरीच्या नामे।।* म्हणून वारीमध्ये प्रत्येक वारकरी एकमेकांच्या पाया पडतात त्यामुळे चालून चालून थकलेला जीव एका स्वरात गातात.भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ।। अशी त्यांच्या तोंडून आपोआप शब्द निघतात.
शिस्तीने वारकरी पायी वारी करतात. वेळेचे बंधन पाळतात. नेमून दिलेले कामे चोखपणे करतात.त्यामुळे ही विठ्ठल नामाची शाळा पंढरपूरला आषाढीे एकादशीला भरते. मृत्युलोकी एक नगर । त्याचे नाव पंढरपूर असे भाविकांची श्रद्धा आहे. वारकरी हे नावच वारीमुळे पडले .संतश्रेष्ठ ज्ञानदेव माऊली व जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जाती-जमातीच्या लोकांना एकत्रितपणे आणून ही वारी सुरू केली. वारी हा एक आनंद सोहळा आहे. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हणतात.म्हणून सर्वच वारकरी *पंढरीचा वास,चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे ।। या इच्छे पोटी वारकरी वारी कधीच चुकवत नसतात.आषाढी, कार्तिकी, माघी चैत्री अशा चार मुख्य वाऱ्या असून बाकी 24 एकादशीच्या वाऱ्याही करणारे काही वारकरी आहेत. सुखी संसाराची सोडुनिया गाठ। पाऊले चालती पंढरीची वाट।।
काही दिवस पंढरीची वाट संपूर्ण सुखी संसार सोडून ते वाटेने चालतात. कारण त्यामुळे आपली दुःख नाहीशी होतात.परमेश्वर हा भक्त पुंडलिका साठी उभा राहिलेला आहे, म्हणूनच भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी ।धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी।।असे म्हणतात. प्रत्येक वारकऱ्यांच्या पत्नीला सुद्धा वाटते की या पंढरपुरात असे काय आहे की एवढा लाखो वैष्णवांचा मेळा तेथे भरतो म्हणून मलाही तुम्ही पंढरपूरला घेऊन चला असे अंत:करणा तून आपल्या पतीला विनवणी करतात. त्यामुळे भक्ती करा, परमार्थ करा, सन्मार्गाने वागा आणि मोक्ष मिळवा अशी ही वारी आपणाला शिकवते. वारीमध्ये रिंगण सोहळा असतो पुंडलिक वर दे…असा जयघोष करीत अश्वाचे रिंगण सुरू होते. भाविकांनी टाळ्यांचा गजर केला की अश्व वेगाने पाच प्रदिक्षणा पूर्ण करतात. घोड्यांच्या टापा खालील माती कपाळी लावण्यासाठी हजारो वारकरी रिंगणात येतात.काही जण माती आपल्या गावाकडे शेतीत घेऊन जातात ‘ज्ञानोबा तुकारामचा’ जयघोष करून उजळलें भाग्य आतां। अवघी चिंता वारली।।..हा संतपर अभंग म्हणून पुढे निघतात या त्यानिमित्ताने लाखो भाविक भक्त पंढरीच्या दिशेने विठुरायाचे सावळे रूप पाहण्यासाठी डोळे आतुरलेले आहेत. *देव दिसे ठाई ठाई । भक्तलीन भक्तापाई* हे वारकरी संतांनी सांगितलेल्या वाटेवर चालत आहेत.संतांनी माणुसकी व मानवता धर्म शिकवला .आपण सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावे,
ह्दयांनी एकत्रित यावे. वैष्णवांचा मेळा भरवावा, एकजुटीने राहावे ,अशी शिकवण दिली, त्यामुळे संत कार्याची आज फलश्रुती झाली आहे. 20
दिवसाच्या प्रवासामध्ये वारकरी संपूर्ण देहभान विसरून फक्त कानामध्ये टाळ, मृदुंग व वीण्याचा आवाज घुमत राहतो. आणि त्यानुसार तो दिसा माशी चालत जातो. समाजधर्माची अवनती होऊ नये. संतांनी सांगितलेले उपदेश ऐकावे, म्हणून संत सावतामाळीनी कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी।।असं म्हणून विठ्ठलाला त्यांनी आपल्या मळ्यात पाहिले, खरोखरच पंढरीचा पांडुरंग या भक्तांना भेटण्या साठी त्यांच्या घरी गेले, संत चोखोबांची गुरे ओढू लागली, असा हा आगाध महिमा या पंढरीच्या पांडुरंगाचा आहे .संत जनाईला दळण दळू लागले. नाम्याची खीर चाखली, संत कान्होपात्राला मंदिरात जागा दिली असे भक्त पांडुरंगा बद्दल बोलतात, नाम्या ,जनी, माळी,संत सेना, संत नरहरी, संत गोरोबा कुंभार संत कान्होपात्रा या सगळ्यांना घेऊन ते चालले , त्याची महिमा अपार आहे, म्हणून *विठू माझा लेकुरवाळा। संगे गोपाळाचा मेळा ।।* असे म्हटले जाते, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला। या संतांचा मेळा गोपाळांचा झेंडा रोविला ।।
असा आवाज दुमदुमून जातो. *संत हे आपल्याला उपदेश करतात* नैतिकतेची जाणीव करून देतात. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत. अशी भूमिका घेतात,येथे कोणत्याही जातीचा, वर्णाचा भेदभाव केला जात नाही ,आपण सगळे परमेश्वराचे लेकरे आहेत म्हणून एकाच विचाराने दिंडी चालते, *सुखालाही आला या हो। आनंदाचा पूर।।* अवघे गरजे पंढरपुर। चालला नामाचा गजर।।आजच्या जातीय द्वेषभावनेतूनच समाजाची विभागणी होऊन शकले उडत आहेत. जो तो माझेच खरे म्हणत आहे, त्यामुळे प्रत्येकाला गर्व झाला आहे, मी पणाचा आव आणला जात आहे,थोर- वडील व्यक्तीचा आदर ठेवल्या जात नाही, आपपल्या परीने चालत आहेत, जर अशी अवस्था निर्माण झाली तर आपल्या देशावर कोणीही आक्रमण करू शकेल, असे काही होऊ नये म्हणून सर्वांनीच एकजुटीने वागावे, हृदयाची भाषा बोलावी, शांतीचा संदेश घ्यावा, हिंसा करू नये ,परंतु आज दररोज पेपर उघडल्या नंतर टि, व्ही चालू केला की जाळपोळ, अपहरण,खून,बलात्कार अनेक बेरोजगाराच्या समस्या व्यसनाधीनता, यामध्ये तरुणाई अडकली आहे, जर असे झाले तर मानवतावादी दृष्टीकोन नाहीसा होईल.दहशतवाद वाढेल, कोणाचाच विश्वास कोणावर राहणार नाही हे सर्व आपल्याला बंद करायचे असेल तर सर्वांनी आपण समतेचा झेंडा हातात घेऊ, आज अनेक झेंडे झाले आहेत. *सांग विठ्ठला मी कोणता झेंडा हाती घेऊ* असा प्रति प्रश्न विठ्ठलालाच विचारला जात आहे.
असे न होता खरा तो धर्म मानून आपण सर्व सत्याच्या बाजूने चालू, समतेची ,साक्षरतेची, जीवाभावाची मैत्रीची,ऐक्याची ,शिक्षणाची ही दिंडी घेऊन चालू, तेव्हाच वारीचा उद्देश सर्वांना कळाला आणि ती आचरणात आणली असे होईल. 19 ते 20 दिवस फक्त हरिनामाचा गजर करून गावाकडे आल्यानंतर चांगल्या पद्धतीने सर्वांनीच वागावे, वर्तन ठेवावे, राग, द्वेष, मत्सर ,अहंकार या विकारा पासून दूर राहावे, म्हणून वारी हा एक सत्वगुणाचा सोहळा आहे. राम कृष्ण हरी, चला माऊली, माऊली, माऊली
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड*