अमरनाथ गुहेतून भाग – ६ *(लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर)*

 

बर्फानी बाबाच्या दर्शनासाठी सर्व यात्रेकंरू रात्री १ वाजता स्नान करून तयार झाले होते. पूर्वी अमरनाथ येथे राहण्याची व्यवस्था होती.परंतु तीन वर्षांपूर्वी अमरनाथ गुफे जवळील सर्व टेन्ट वाहून गेल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हापासून अमरनाथ ला गुफे जवळ कोणालाच राहू दिले जात नाही. त्यामुळे एकाच दिवसात दर्शन घेऊन परत यावे लागते. म्हणून मी सर्वांना कंपल्सरी डोली अथवा घोडा करण्यास सांगितले होते.३२ यात्रेकरूंनी डोली केली तर ५५ जण घोड्यावर स्वार झाले.तिघे जन हट्ट धरून पायी गेले.
ठीक ३ वाजता कुडकुडत्या थंडीत लाईनीमध्ये उभे राहिलो. साडेचारला गेट उघडल्यानंतर अमरनाथ दर्शनासाठी मोठ्या उत्साहात व जल्लोषात बम बम भोलेच्या गजरात रवाना झालो.

बालटाल येथून गुफेपर्यंतचे अंतर १४ किलोमीटर आहे. डूमेल गेटवर सर्वांच्या आरएफआयडी कार्डची तसेच यात्रा परचीची तपासणी होते. त्यामुळे डोली व घोड्यावर बसलेल्यांना खाली उतरून रांगेत उभे रहावे लागते. गेटच्या बाहेर घोडेवाले आणि डोली वाले आमची वाट पाहत थांबलेले होते. गर्दी इतकी जास्त होती.सगळे घोडे वाले सारखेच दिसत होते.आम्ही त्यांना ओळखू शकत नव्हतो. आम्ही सर्वांनी अमरनाथ यात्री संघाचे टी-शर्ट व टोपी घातलेली असल्यामुळे घोड्या वाल्यांनी आम्हाला बरोबर ओळखले. घोड्यावर बसून आम्ही परत चढाई सुरू केली. रेल पथरी, बरारी मार्ग, संगम या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेऊन आमचा प्रवास सुरू झाला.एका बाजूने उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूने खोल दरीतून खाली अमरगंगा वेगाने वाहत असलेले दृश्य नवीन व्यक्तीच्या हृदयात भीती निर्माण करते. यावेळी दरीच्या बाजूने संपूर्ण बॅरिकेटिंग झाले असल्यामुळे सुरक्षित वाटत होते.

सकाळी दहा वाजता अमरनाथ गुफेपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडा स्टैंड वर आम्हाला थांबवले. तिथून पुढे पायी अंतर कापावे लागले. काही जणांना हे अंतर चढताना दम लागत होता. म्हणून त्यांनी अठराशे रुपये प्रत्येकी देऊन डोली केली. अमरनाथच्या पायऱ्या एकदम छातीवर आहेत. त्या ठिकाणी सर्वांची कडक तपासणी करण्यात येते. मोबाईल व इतर वस्तू जमा करावे लागतात. आमच्या सोबत असणाऱ्या सुभाष वलबे यांची एका मिलिटरी वाल्याची सोबत ओळख निघाल्यामुळे काहीजणांना रांगेत उभे टाकावे लागले नाही. डोलीवर आलेल्यांना वरपर्यंत जाऊ दिल्या जाते.अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचे भरपूर वेळ दर्शन झाल्यामुळे मन प्रसन्न झाले. शिवलीला अमृताच्या नित्य पठनाच्या ४२ ओव्या आणि ओम नमः शिवाय चा जप केला.माझ्या गळ्यात १०८ स्फटिकाची माळ असून त्यात एक मुखी आणि गणेश मुखी ओरिजनल रुद्राक्ष लावलेले आहेत.पंडितजी सांगून ती माळ शिवलिंगाच्या समोर टेकविली. गुहेमध्ये कबुतराची जोडी दिसल्यामुळे सर्वजण खुश झाले.

प्रसन्न वातावरणात खाली उतरलो.माहिती कक्षातून अनाउन्समेंट केली की, ” माझे दर्शन झाले असून मी बालटाल कडे परत जात आहे. ज्यांचे ज्यांचे दर्शन झाले असतील त्यांनी इतरांची वाट न पाहता लंगर मध्ये थोडेसे खाऊन बालटाल कडे परत जावे.” गुहे पासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या घोड्याच्या स्टॅन्ड कडे पायी चालत आलो. दुपारी एक च्या सुमारास आम्ही घोड्यावरून परत जाण्यास निघालो. गुफे कडे पाहून भोलेनाथाला नमस्कार केला व परत येण्याची संधी मिळू दे अशी प्रार्थना केली.माझ्यासोबत चार बॅनर होते. त्यावर मजकूर लिहिलेला होता की, भारतीय जनता पक्षातर्फे अमरनाथ यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत. मोदीजींचा, खा. अशोक चव्हाण, माजी खासदार चिखलीकर,खा. डॉ. अजित गोपछडे, संजय कोडगे आणि तिन्ही जिल्हाध्यक्षांचा व माझा त्यावर फोटो छापलेला होता.घोडेवाल्याच्या मदतीने मी रस्त्यात योग्य ठिकाणी बॅनर बांधले.

खाली उतरत असताना धूळ फार मोठ्या प्रमाणात उडत होती. त्यामुळे मास्क लावणे आवश्यक होते. बर्डी टॉप इथे लंगरमध्ये चहा घेऊन बालटाल बेस कॅम्प ला सायंकाळी ४ वाजता पोहोचलो. किती यात्री टेन्ट मध्ये परत आले याची चौकशी केली. डोलीवर गेलेले सर्व जण दोन वाजताच परत आले होते. मसाज वाल्याला बोलवून मस्तपैकी मालीश केली आणि गरम पाण्याने मनसोक्त आंघोळ केल्यामुळे थकवा दूर झाला. यावर्षीच्या प्रवासातील अत्यंत समाधान देणारी बाब म्हणजे यावर्षी आमच्यापैकी एकालाही कुठलीच शारीरिक व वैद्यकीय अडचण न उद्भवता खूप छानपणे बाबा अमरनाथचे दर्शन झाले. निसर्गाने देखील छान साथ दिली. आकाश निरभ्र असल्याने आणि वातावरणात हलकासा गारवा असल्यामुळे यात्रेकरूंना कुठलाच त्रास झाला नाही. पायी गेलेले तिघे सोडून बाकी सर्वजण सात वाजेपर्यंत परत आले होते. आमच्या सोबत असणाऱ्या डॉ. स्नेहाराणी व डॉ.महेश बिरादार या जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस आज होता. आम्ही त्यांचे परत एकदा विधीवत लग्न लावले. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक काश्मिरी लोकं सुद्धा येऊन उभे राहिले. बहारो फुल बरसाओ,
वरात, अंतरपाठ,पाच मंगलाष्टका, अक्षदा व वरमाला असा सर्व योग जुळून आल्यामुळे हा सोहळा संस्मरणीय झाला.
भटजीची भूमिका बलभीम पत्की यांनी तर वधू-वरांच्या मामांची भूमिका रामेश्वर वाघमारे व बालाजी जाधव यांनी व्यवस्थित पार पाडली. लंगर मध्ये विविध खाद्यपदार्थ चा आस्वाद घेतल्यानंतर टेन्ट मध्ये पडल्या पडल्या झोप लागली.
*(क्रमश:)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *