माझे बाबा ; माझे हिरो


आज 14 सप्टेंबर माझे बाबा सायन्ना गुरुजी येवतीकर यांचा 79 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने थोडं लिहावं म्हणतो. माझे बाबा माझ्यासाठी नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत, तेच माझे खरे हिरो आहेत. ज्यांच्यामुळे आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे, यात त्यांचेच श्रेय आहे. ते जर माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर मी आज असा राहिलो नसतो. गरीब परिस्थितीमधून माझे बाबा घडले, आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक संकटांना तोंड दिले. ते तीन बहिणी आणि तीन भावंडे अश्या मोठ्या परिवारातील. त्यापैकी आज दोन बहिणी आणि दोन भाऊ हयात आहेत.

माझे आजोबा दशरथ हे कपडे विणण्याचे काम करत आणि आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन विक्री करत. ते देवधर्म करण्यात मग्न असत, श्रीरामाचे ते परमभक्त होते. त्यांना मंत्र वगैरे येत असे असं लोकं आज ही सांगतात. माझ्या बाबांचा जन्म पारतंत्र्यात म्हणजे 14 सप्टेंबर 1941 रोजी झाला. याच पारतंत्र्याच्या काळात प्राथमिक शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर रझाकारचा काळ त्यांनी अनुभवला. शिक्षण पूर्ण करतांना त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीमुळे शिक्षण पूर्ण करू शकले.

आंध्र आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर राहत असल्याने त्यांना तेलगू आणि मराठी दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे जमतात. अगदी सुरुवातीला महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी त्यांनी तेलगू भाषेतील शाळेत शिक्षकांच्या नोकरीस प्रारंभ केला होता. मात्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रात येणे पसंद केले आणि महाराष्ट्राचे नागरिक बनले. शिक्षकांच्या नोकरीचा काळ ही काही सुखाचा नव्हता कारण त्याकाळी रस्ते नव्हते, दळणवळणाची सुविधा नव्हती त्यामुळे जेथे नोकरी आहे, त्याच गावी राहावे लागत असे. 20-25 वर्षे त्यांनी आपले घर सोडून विविध नोकरीच्या गावी राहिले. घरची परिस्थिती खूपच बेताची होती त्यामुळे घरून काही मदत मिळेल याची काहीही आशा नसायची. अंगावर पांढरा पोशाख सोबत काळी छत्री,

सायकल आणि शबनम असा त्यांचा पेहराव पूर्वी होता असे सांगितले जात. गावाकडे बदली झाल्यानंतर त्यांनी सायकलवर शाळा केल्याचं मला आज ही आठवते. बाबांचे अक्षर खूप सुंदर आणि वळणदार आहे. त्यांच्यासारखे अक्षर लिहिता यावे असा माझा नेहमी प्रयत्न असायचा. त्यांना वाचण्याचा खूपच छंद. त्यांच्या हातात एखादे पुस्तक आले की ते पुस्तक संपल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. माझे वृत्तपत्रात लेख प्रकाशित होऊ लागले तसे गावाच्या पत्त्यावर अनेक वाचकांचे पत्र येत असत. ते सारे पत्र मी गावी येईपर्यंत ( शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने मी दहा वर्षे बाहेरगावी होतो.) ते सांभाळून ठेवत आणि मला देत असत. त्यानंतर माझे प्रकाशित झालेली लेखांची साप्ताहिके आणि मासिके घरी येऊ लागली आणि त्यांना ते वाचण्यासाठी मिळू लागली. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी माझ्या वडील भावाकडे असलेले सर्वच पुस्तके वाचून काढली आहेत.

माझे वडील बंधू म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखा व्यवस्थापक या पदावर काम करणारे डॉ. सुरेश येवतीकर, यांना ही वाचण्याचा विलक्षण छंद. ते जिथे जात तेथून दोन पुस्तकं हमखास आणत असत. पहिल्या पानावर आपली सही करून पुस्तक आणलेली तारीख त्याखाली लिहून ठेवण्याची त्यांची खूप जुनी सवय आज ही कायम आहे. मला थोडाफार वारसा या दोघांकडून मिळाला आहे. शब्दकोडे सोडविण्याचा छंद देखील त्यांना गप्प बसू देत नाही. दैनिक पुण्यनगरी आणि दैनिक चौफेर या दोन वृत्तपत्रातील सारीच कोडे सोडविल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. सकाळी पेपर लवकर आले नाही की ते नेहमी विचारत पेपर आलं नाही का अजून ? 

नेहमी पेपरमध्ये डोळे लावून बसलेले माझे बाबा मात्र माझ्या आईला नकोसे वाटते. उतरत्या वयात थोडा आराम करावा असे तिला वाटते पण त्यांना कोडे सोडविल्याशिवाय करमत नाही. बाबांना शेती करण्याची फारच हौस. सध्या शरीर साथ देत नसल्याने ते शेताकडे जास्त लक्ष देत नाहीत मात्र शेतीची खूप माहिती त्यांना आहे. लहानपणापासून अनुभव असल्याने निसर्गाच्या सर्व गोष्टी त्यांना माहीत आहेत. सहज बोलताना निसर्ग आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी ते सांगत असतात. घरातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचे सारखेच प्रेम. कुणावर ही तसूभर प्रेम कमी केलं नाही. आज त्यांना दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असे जवळपास पंधरा ते वीस लोकांचा गोतावळा त्यांच्या भोवताली आहे. त्यांच्या हातात लक्ष्मी आहे असे कधी कधी माझी आई बोलते.

ते खरोखरच आहे. त्यांच्या अर्थ साहाय्याने अनेक कुटुंबाचे भले झाले आहे हे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. आर्थिक देवाणघेवाणीत त्यांना अनेक लोकांनी दगा देखील दिला आहे तरी देखील ते गरजू व्यक्तीला आर्थिक मदत केल्यावाचून राहत नाही. माझे बाबा टक्केवारीने पैसे देतात असे लोकं म्हणत असतील कदाचित पण याच आर्थिक मदतीमुळे एखाद्याचे भले झालेले पाहून मनाला समाधान देखील होते. काहीजणांचे भले झाले आणि काही जणांनी बाबांना दगा दिला मात्र अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून तर फेब्रुवारी 2013 मध्ये सर्पदंश झाल्यावर मृत्यूच्या छायेतून सहीसलामत सुखरूप परतले.

या घटनेला आज साडे सात वर्षे होत आहेत. डॉक्टरांनी देखील त्यांचे जीव वाचण्याचे पन्नास टक्के खात्री दिली होती. त्यामुळे आम्ही सर्व चिंतातुर झालो मात्र अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांना लाभले आणि हा संकटाचा काळ निघून गेला. सर्वांच्या आशीर्वादामुळे ते आमच्या सोबत आहेत. माझ्या जीवनात त्यांचे अनमोल स्थान आहे. दहावीमध्ये आणि बारावीत चांगल्या मार्काने पास झालो आणि त्यानंतर डी एड साठी ते नेहमी माझ्या पाठीशी होते. मला डी एड करायचे नव्हते मात्र ते यावर ठाम होते. त्यांच्या निर्धारामुळे माझे डी एडचे शिक्षण पूर्ण झाले.

डी एड झाल्यावर शिक्षक म्हणून किनवट तालुक्यात लागलेली नोकरी मला करावेसे वाटले नाही तेंव्हा त्यांनी मला समजावून सांगितले, समुपदेशन केले म्हणून ती नोकरी टिकली आणि मी पुढे गेलो. नाहीतर बदलत्या काळानुसार आणि नियमानुसार मला नंतर नोकरी लागली असती का नसती ? हे विचार करून आज ही अंगावर काटा उभा राहतो. माझे बाबा सर्वांवर नकळत प्रेम करायचे. शहरातून किंवा बाहेरून कोठून येताना ते नेहमी सोबत काही ना काही खाऊ आणत असत. माझ्या नजरेत माझे बाबाच माझे हिरो आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य प्रदान करो हीच यानिमित्ताने प्रार्थना. 

नागोराव सा. येवतीकर
नागोराव सा. येवतीकर


– नागोराव सायन्ना येवतीकर, 

येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

9423625769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *