वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाले असल्यामुळे सर्वजण खुश होते.श्रीहरी कुलकर्णी यांच्यातर्फे असलेला नाश्त्याचा आस्वाद घेऊन आम्ही जम्मू कडे निघालो.रघुनाथ मंदिराचे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासात माझे स्नेही शासकीय कंत्राटदार नागेश शेट्टी यांच्यातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. अमृतसरला पोहोचेपर्यंत रात्रीचे साडे आठ वाजले होते. हॉटेल नय्यर रेसिडेन्सी व नय्यर इन मध्ये सर्वांच्या राहण्याची व्यवस्था केलेली चालली होती. हॉटेल मधील प्रशस्त वातानुकूलित खोल्या पाहून अनेकांनी इतक्या कमी टूर कॉस्ट मध्ये तुम्हाला हे कसे परवडते असे विचारले. ना नफा न तोटा या तत्त्वावर अमरनाथ यात्रा सुरू असल्यामुळे आणि भोलेबाबाच्या आशीर्वादाने हे सुरळीत पार पडत असल्याचं मी सांगितले.पूर्वीच कल्पना दिल्यामुळे डॉ. हिवरेकर व डॉ.नखाते यांनी ठेवलेले रात्रीचे जेवण तयारच होते.
सकाळी निवांत आठ वाजता उठले. रामेश्र्वर वाघमारे व प्रकाश शिंदे यांनी सर्वांना आग्रहाने चहा नाश्ता दिला. दहाच्या सुमारास आम्ही अमृतसर दर्शनाला सुरुवात केली. आमच्या बसेस जरी एसी असला तरी अमृतसर येथे प्रचंड उकाडा होता की अक्षरशः लोक वैतागले होते. पण तेव्हढ्या उकाड्यातही जलियान वाला बाग पाहण्याचा उत्साह दिसून आला. अहिंसा या मंत्रामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे जे आपल्या डोक्यात फिट्ट बसवले गेले होते त्याला तडा गेला. जालियनवाला बाग नंतर स्वर्ण मंदिर येथे दर्शनासाठी पोहोचलो. दरवर्षी प्रमाणे त्या परिसरातील दुकानात पगडी बांधण्यासाठी गेलो असता दुकानदाराने पगडी बांधण्यास नकार दिला.मी कारण विचारले असता त्यांनी असे सांगितले की, शीख धर्मीयां व्यतिरिक्त इतरांना पगडी बांधण्यास गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने मनाई केली आहे. त्यामुळे निराश होऊन पगडी न बांधताच मी इन्फॉर्मेशन ऑफिस मध्ये गेलो. नेहमीप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार व माझे स्नेही सरदार चरणजीतसिंघ अरोरा हे खास आमच्यासाठी तिथे आले होते.
पीआरओ सरदार रणभिरसिंघ यांची भेट घेतली.” दिलीपसिंह आज पगडी नहीं बांधी क्या ?” या प्रश्नावर मी त्यांना दुकानदाराबद्दल सांगितले. त्यावर त्यांनी अरे भाई जो लोग सिग्रेड,बिडी,तंबाखू लेते उनके लिये मनाई है,आप तो गुरु घर के सेवादार हो ” असे सांगून त्यांनी पगडी मागवून मला बांधायला लावली. सर्वांना धार्मिक पुस्तके भेट दिली.
विशेष दर्शनाची व्यवस्था केली. मथ्था टेकून आम्ही बाहेर पडलो. दुर्गायणी मंदिर चे दर्शन घेतले. पंजाबी खास भोजन द्यायचे या उद्देशाने सव्वाशे वर्षांची परंपरा असणारे सरदार कुलवंतसिंघचे प्रसिद्ध कुलचे, रामचरण हलवाई यांचे मालपुवा,छोटुमल मारवाडीचा पुलाव आणण्यासाठी मला एक तास लागला. गार्डनमध्ये सर्वांना मधुकर पाष्टे व आशुतोष मुखाने यांच्यातर्फे वनभोजन दिले.
सर्वांना वेध लागले होते अटारी बॉर्डरचे.गोल्डन टेम्पल कडून आमची शिफारस आली असल्यामुळे ९० व्हीआयपी पास मिळाले होते. रेखा भताने हिचे भाऊजी बिएसएफचे दिगंबर जंगिलवाड हे प्रत्यक्ष उपस्थित असल्यामुळे म्युझियम सह पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंत जाऊन फोटो काढता आले. संपूर्ण स्टेडियम मध्ये देशभक्तीचे वातावरण इतके तापले होते की, ४६ डिग्री असलेल्या ऊन देखील मागे पडले.हिंदुस्तान पाकिस्तान च्या सैनिका तर्फे करण्यात आलेल्या संयुक्त संचालनाच्या वेळी दोन्ही बाजूंनी जोरजोरात घोषणा देण्यात येत होत्या. आमच्या महिलांनी हातात झेंडे घेत पळत पळत स्टेडियमला राउंड मारला. देशभक्तीपर गीतावर फक्त महिलांना नाचण्याची परवानगी आहे. ग्रुपमधील महिलांनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन भांगडा, गरभा, फुगड्या खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोळ्याची पारणे फिटणारी ही कवायत पाहून अंगात वीरश्री निर्माण झाली. आमचा सर्व ग्रुप अमरनाथ यात्री संघाचे टी-शर्ट घालून एकत्रित बसला असल्यामुळे उठून दिसत होता. भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद यासारख्या घोषणा बुलंद आवाजात देण्यात येत होत्या. कडक उन्हात दोन तास कधी संपले हे कळाले देखील नाही. परतीच्या प्रवासात अरोरा मंगल कार्यालयात आमच्या सर्वांची एखाद्या रिसेप्शन प्रमाणे जेवणाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे सरदार जागीरसिंघ यांच्यातर्फे करण्यात आली होती. त्यांचे आदरतीथ्य पाहून सर्वजण भारावून गेले. यावेळी १३ दिवसाच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कामगिरी केलेल्यांचा व अन्नदात्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
*(क्रमशः)*