अमरनाथ गुहेतून भाग – १२ (लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर)

यात्रेचे शेवटचे २ दिवस उरले होते. त्यातला बहुतेक प्रवास रेल्वेने होता. अमृतसर येथून सकाळी पावणे पाच ला आमची शताब्दी एक्सप्रेस निघाली. अमृतसर सुटले की, एका यात्रेकरू चा फोन आला.त्याचे तिकीट हरवले असून टीसीने त्याला पकडले आहे.₹ २१०० फाईन फाडत आहे.मी जाऊन टीसीला समजावले. एकविशे रुपयाच्या ऐवजी हजार रुपयात मामला मिटला. अकरा वाजता आम्ही नवी दिल्लीला पोहोचलो. आम्ही उतरलो होतो प्लटफॉर्म नंबर एक वर. दिल्ली दर्शनाच्या आमच्या दोन एसी बसेस उभ्या होत्या प्लॅटफॉर्म नंबर १६ च्या बाहेर असलेल्या पार्किंग मध्ये. सर्व सामान एक किलोमीटर अंतरावर नेऊन बस मध्ये ठेवणे, दिल्ली दर्शनानंतर रात्री परत बस मधून सामान काढून नांदेडच्या रेल्वेमध्ये ठेवणे फारच अवघड होते.

जाताना एका सुटकेसला दीडशे रुपये व येताना परत दीडशे रुपये हमाली येथील हमाल मागत होते. त्यामुळे ओळखीच्या आठ स्टुडंट्सना बोलवून सामान मोजून त्यांच्या हवाली केले. बस मध्ये एसी चा गारवा पण बाहेर प्रचंड उकाडा या परिस्थितीत दिल्ली दर्शन काही भावले नाही. राजघाट, इंडिया गेट, कुतुब मिनार, अक्षरधाम, इंदिरा मेमोरियल या स्थळांना भेट देऊन रात्री आठच्या सुमारास आम्ही नवी दिल्ली स्टेशनला आलो.ते आठ स्टुडन्ट एकदम दक्षपणे सामानाची रखवाली करत होते. आम्ही आमचे सामान मोजून घेतले.प्रत्येकी दोन हजार रुपये त्यांना मोबदला दिला.

श्रीगंगानगर ते नांदेड एक्सप्रेस रात्री साडेअकराला नवी दिल्ली स्टेशनला आल्यानंतर सर्वजण व्यवस्थित बसले. उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे उपवासाचे पदार्थासाठी काहींना फोन लावला. सकाळी जाग आली,तेव्हा घड्याळात पाहिले असता साडेसात वाजले होते. सर्वांना उठवले. आषाढी एकादशी निमित्त आमच्या सोबत असलेल्या भगिनींनी विठ्ठल रुक्माई च्या मूर्तीची विधीवत पूजा केली. भजने म्हटली आणि आणि मग संपूर्ण रेल्वेत ग्यानबा तुकाराम म्हणत चक्क दिंडी काढली. रेल्वेतील इतर पॅसेंजर ही अनोखी दिंडी कुतूहलाने पाहत होते. या रेल्वेला वसमत स्टेशनला स्टॉप नाही. आमच्यासोबतचे चौदा यात्रेकरू वसमत चे होते. हिंगोलीला उतरावे की नांदेडला याबाबत त्यांची चर्चा चालू होती. मी त्यांना सांगितले की,अकोल्याला ड्रायव्हर आणि गार्ड बदलतात. तेव्हा आपण एक चान्स घेऊ या. अकोला स्टेशन आल्यानंतर मी पाच सहा जणांना सोबत घेऊन गार्ड कडे गेलो. आधी त्याला शाल व पुष्पहार आणि ट्रॉफी देऊन सत्कार केला. त्याने हा कशाचा सत्कार आहे असा प्रश्न केला असता मी सांगितले की, आम्ही अमरनाथ यात्रेहून परत येत आहोत आणि तुम्ही आम्हाला सुखरूप घरी सोडत आहात त्याबद्दलचा हा सत्कार आहे. गार्ड एकदम खुश झाला. त्यानंतर मी हळूच सांगितले, “सरजी आपकी थोडी हेल्प चाहिये. १३ दिन की अमरनाथ यात्रा करके हम यात्री थक गये है. कब घर आयेगा ऐसा लग रहा है.हमारेमेसे १४ यात्री वसमत के रहने वाले है. अगर आप एक मिनिट के लिए वसमत ट्रेन रुकाते हो तो बहुत सुविधा होगी.” त्याने संमती दर्शवल्यानंतर सर्वजण खुश होऊन म्हणाले की, छोटा मोदी याने की दिलीपभाऊ है तो सब मुमकिन है. टीसीने दिलेला शब्द पाळल्यामुळे वसमतचे यात्रेकरू दोन तास आधी घरी पोहोचले. लुधियानाचे सरदार कुलदीपसिंघ, केदारमल मालपाणी, हास्य कवी प्रताप फौजदार, प्रसिद्ध उद्योगपती प्रदीप शुक्ला, भोपाळचे आमचे होणारे व्याही प्रतापसिंह ठाकूर, डॉ. प्रिया त्रिमुखे, गणपतसिंह ठाकूर, अकोल्याचे खत्री परिवार, अमोल गोले, द्वारकादास अग्रवाल, मनोज शर्मा नागपूर,स्नेहलता जायसवाल हैदराबाद, द्वारकादास अग्रवाल, जगन्नाथ सोनवणे, गणपतसिंह ठाकूर,आनंद साताळे, अमर शिखरे पाटील यांच्यामुळे या दोन दिवसात खाण्यापिण्याची भरपूर चंगळ झाली. एकादशी… दुप्पट खाशी… या म्हणीचा साक्षात प्रत्यय आला. अन्नदानासाठी आलेल्या देणगीतून सात हजार रुपये उरले असून ते महाप्रसाद मध्ये टाकायचे असे सर्वानुमते ठरले.नांदेड स्टेशनवर येता येता रात्रीचे अकरा वाजले.

माझा छोटा भाऊ राजेशसिंह, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, कैलास महाराज तसेच सोनवणे परिवारातील सर्व सदस्य आणि यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी पुष्पवृष्टी करत जल्लोषात आमचे स्वागत केले. तुमच्यामुळे यात्रा सुखरूप झाली म्हणून कनिष्ठा सोबत ज्येष्ठ मंडळी देखील माझ्या पाया पडत असताना मी त्यांना नकार देत असे सांगितले की, तुम्ही सर्वजण चांगले होता म्हणून यात्रा चांगली झाली. टूर्नामेंट जिंकण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतलेली असते पण ट्रॉफी घ्यायचा मान मात्र कॅप्टनला मिळतो तसेच माझे सुद्धा झाले आहे. त्यानंतर एकमेकांच्या गळ्यात पडून सर्वांनी निरोप घेतला. (अमरनाथच्या गुहेतून या लेखमालेतील पुढच्या भागात यात्रेकरूंच्या प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे. आणि शेवटच्या भागात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येणार आहे .त्यामुळे ” अमरनाथच्या गुहेतून ” ही लेखमाला आपल्याला कशी वाटली याबाबत ९४२१८ ३९३३३ या क्रमांकावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून पाठवण्याची विनंती करून तूर्त इथेच थांबतो.)
*(क्रमशः)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *