लोकाभिमुख प्रतिसरकारचे प्रवर्तक: क्रांतिसिंह नाना पाटील  3 ऑगस्ट जयंती विशेष

 

 

जिद्दीला कर्तृत्वाची जोड आणि समन्वयाची साथ मिळाल्यास समग्र जीवन फलदायक होऊन जाते,हे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या वर्तना वरून आपल्याला सांगता येते.

त्यांचे जीवन तरुण पिढीसाठी मार्गदर्शक व योग्य दिशा दाखवणारे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ते संघर्षमय जीवन जगले. त्यावेळी समाज अज्ञानी व निरक्षर असला तरी स्वाभिमानी होता, त्यांना कोणत्याही प्रकारचा लोभ नव्हता, इंग्रजांनी त्यांच्यावर कितीही बक्षीसे ठेवले तरी एकाही व्यक्तीने फितुरी केली नाही, हेच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. म्हणून त्यांचे विचार समाजात दीपस्तंभा प्रमाणे आज तेवत आहेत.त्यांची संपूर्ण जीवन निष्ठा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी होती म्हणून ते काही वेळा भूमिगत राहून या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत झगडले, बीजाने गाडून घेतल्याशिवाय कोंब तरारून वर येत नाही. प्रहार सोसल्याशिवाय गळ्यात हार पडत नाहीत. पायाच्या दगडा शिवाय मंदिरावर कळस चढत नाहीत. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही,तसे क्रांतिसिंह नाना पाटलांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात धगधगता यज्ञ कुंड पेटविला, कठोर दिव्यातून ते पुढे आले, अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास भोगला, त्यामुळे आज आपण स्वातंत्र्याची मधुर फळे सर्व जण चाखत आहोत.

अन्याय,अत्याचार ,जुलूम,शोषण या मार्गाने इंग्रजांनी भारतीयांच्या स्वाभिमानावरती घाव घातला; आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीयांच्या मनात क्रांतीची नवी पालवी फुटली. इंग्रजांनी साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करून क्रांतिकारकाचे कार्य दडपण्याचा प्रयत्न केला; मात्र क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मन देशभक्तीने ओतप्रोत भरलेले होते. अशावेळी सनदशीर मार्ग सोडून त्यांनी सशस्त्र उठाव करण्याचा संकल्प केला. आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने त्यांनी नवीन इतिहास घडविला त्या असामान्य व्यक्तीचे स्मरण व्हावे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती नवीन पिढीला व्हावी,त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी व त्यांच्यासारखे असामान्य कार्य नवीन पिढीच्या हातून घडावे, पारतंत्र्याच्या जुलमी गुलामगिरी तून आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्या साठी प्राणाची पर्वा न करणा-या क्रांतीसिंह नाना पाटील यांची माहिती आपण आजच्या लेखात करून घेणार आहोत. 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथे आई

गोजराबाई व वडील रामचंद्र यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना तालमीत जाण्याची व कुस्ती खेळण्याची आवड होती, त्यामुळे परिसरातील यात्रा,जत्रा त्यांनी जवळून पाहिल्या होत्या ते अतिशय हुशार व चुणचुणीत होते, त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले नंतर त्यांना तलाठी या पदावर नोकरी केले, ज्या वेळेस महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली तेव्हापासून त्यांच्या मनात देशभक्तीचे वारे भरले ,एखाद्या नर रत्नाने केलेले कार्य हे ठराविक शब्दात व्यक्त करणे ही गोष्ट शक्य नाही, या भूमीत घडलेल्या सर्व क्रांत्यामधील क्रांतिसिंह नाना पाटलांनी केलेली क्रांती फारच प्रेरणादायी आहे. ती सर्व लिहिण्यासाठी शेकडो पाने लागतील म्हणून आपण थोडक्यात त्यांच्या कार्याचा स्फूर्तीदायी इतिहास येथे अभ्यासणार आहोत.

1942 मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे प्रतिसरकार स्थापन केले. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी *तुफान सेना* उभारली, आपली स्वतःची न्यायव्यवस्था सुरू केली ,कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवणे, गोरगरीब जनता, सावकारच्या पाशात अडकू नये. सावकारांनी त्यांना लुबाडू नये म्हणून सावकार शाही विरुद्ध जोरदार प्रचार केला. समाजातील पीडीत,अशिक्षित, लोकांना त्यांनी जागृत केले. जातीभेद निर्मूलन साक्षरता, विद्यार्थ्यांच्या व मुलांच्या मनावर राष्ट्रभक्तीचा संस्कार करण्यासाठी अनेक संघटना स्थापन केल्या हे सर्व करणारे धैर्यवान पुरुष म्हणजे वीर क्रांतिसिंह नाना पाटील होय. त्यांनी अठरापगड जातींना एकत्रित करून स्वाभिमानाने जीवन जगायला लावले व समाजाला नवीन दृष्टी दिली म्हणूनच रयतेला नवीन दृष्टी देणारे देशभक्त, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील झुंजार नेते असेही त्यांना म्हटले जाते.
त्यांनी लोकांच्या हृदयात माया ,ममता दातृत्व, निर्माण केले, त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी स्वतः हुन उड्या घेतल्या, त्यांच्या चरित्रातून आपणाला स्फूर्ती घेऊन त्यांच्या कार्य कर्तृत्वाच्या इतिहासावर अनेक शाहीरांनी पोवाडे गायले, *क्रांतीचा पेटला कुंड ,उभारूनी बंड, ठोकून दंड, प्रखर ज्वालामुखी झाला तयार, केले सातारा येथे स्थापन प्रति सरकार जी रं जी रं जी..* यामुळेच अफाट जनसमुदायाने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली 8 ऑगस्ट 1942 रोजी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात पास झाला. संसदेमध्ये मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते,लोकाभिमुख नेता म्हणून रयत त्यांच्याकडे पाहत होती, कमीत कमी पंधराशे गावामध्ये पत्री सरकार स्थापन झाले होते, आणि स्वतः कारभार करत होते. याचे सगळे श्रेय क्रांतिसिंह नाना पाटील यांना दिले जाते .

समाजात जनजागृती करण्या साठी हुंडाबंदी, दारूबंदी, अस्पृशता निवारण, या विधायक कार्याकडे त्यांचे लक्ष होतं त्यांनी सत्यशोधक समाजाचे काम हाती घेतले होते, समाज सुधारल्या शिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, आपण एकत्रित झाल्याशिवाय यश मिळणार नाही ,असे ते ठामपणे सांगत असत, इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडले, त्यावेळी इंग्रजांनी धसका घेतला ,तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना पकडण्यासाठी त्यांच्यावर इनाम लावले; परंतु एकाही व्यक्तीने त्यांची माहिती इंग्रजांना दिली नाही. असे हे लोकांच्या हृदयातले क्रांतिसिंह नाना पाटील होते. आज आपण परिस्थिती पाहिली तर देशासाठी कोण काय करत आहे? हा संशोधनाचा विषय आहे. जे देशासाठी लढले। ते अमर हुतात्मे झाले।। म्हणून क्रांतिसिंह नाना पाटलाच्या समोर फक्त देश आणि देशातील जनता यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले होते, रयत सुखी तर आपण सुखी हा एवढाच ध्यास त्यांना होता. म्हणून आजही लोक त्यांचे नाव मोठ्या हौशने घेतात. इंग्रजांनी त्यांची जमीन बळकावली, त्यांच्या तारुण्यात त्यांची पत्नी मरण पावली. आईचे निधन झाले तरीही त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी बरोबर आपले कार्य चालू ठेवले
भूमिगत राहून त्यांनी जनजागृती केली या देशासाठी आठ ते दहा वेळा तुरुंगवास भोगला; तरी ते डगमगले नाहीत, हा देश माझा आहे म्हणून त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून देशाचा संसार केला, अशा या थोर व्यक्तीने केलेल्या कार्यामुळेच आपण आज गुण्यागोविंदाने देशात नांदत आहोत. त्यांच्या कार्याचे विस्मरण तरुणांनी होऊ देऊ नये.

 

प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी साताऱ्यात पत्री सरकार स्थापन करून ब्रिटिशांचे सरकार बरखास्त केले .त्यामुळे सूर्य, चंद्र, तारे असे पर्यंत त्यांचं नाव अजरामर झाले, आजीला अग्नी देण्यासाठी येत आहेत ही माहिती इंग्रजांना कळाली, तेव्हा सर्व बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली,तरीही स्वतः तिरडीवर झोपून स्मशान भूमी पर्यंत पोहोचून अंत्यविधी पूर्ण करून पोलिसांच्या हातावर दिवसाढवळ्या तुरी देऊन ते सही सलामत तिथून निसटून गेले, स्वतःच्या लग्नाच्या मंगलाष्टिका त्यांनी स्वतः म्हटल्या,असे ऐकण्यास मिळते. निर्भीड मनाचे व धिप्पाड देहाचे हे व्यक्तिमत्व प्रसंगी वरून कठोर पण आतून मायेचा सागर होते, क्रांती हा मनुष्याचा निसर्ग दत्त हक्क असून स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे, या ध्येयासाठी आणि या निष्ठेसाठी आमच्या वाट्याला येणाऱ्या कोणत्याही हाल अपेष्टांचे आम्ही स्वागतच करू,संघर्ष केल्यानंतर एक अमूल्य संपत्ती विकसित होते, त्याचे नाव आत्मविश्वास आहे असे ते म्हणत असत. नियती त्यांची सत्वपरीक्षा घेत होती,संघर्षाच्या आणि संकटाच्या मालिका एकापाठोपाठ येत होत्या, तरी त्यांनी त्या सर्व मोडून काढल्या जीवनाबद्दलची निष्ठा, देशावरील प्रेम प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छा शक्ती, कठोर परिश्रम आणि विधायक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठी झेप घेतली म्हणून त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा, जयंतीच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम.

शब्दांकन
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
*अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि.नांदेड*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *