लोहा ; प्रतिनिधी
जनावरांना लाळ्या खुरकत या संसर्गजन्य रोगाची लागण होत असते. त्यामुळे प्रतिबंधक उपाय योजना म्हणून जनावराचे लसीकरण करणे आवश्यक आहे. केंद्रशासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभाग संसर्गजन्य आजार पसरू नयेत व जनावरांचे आरोग्य अबाधित रहावे, याकरिता 16 ऑगस्ट 2024 पासून पाचव्या फेरीचे लाळ्या खुरकत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. 45 दिवसाच्या कालावधीत संपूर्ण लसीकरण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
लोहा तालुक्यातील गोवंश व म्हैस वर्ग लहान व मोठ्या जनावरांना 78500 लसीकरणाच्या मात्रा प्राप्त झालेल्या आहेत. तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत पशुपालकांनी लसीकरण करून घेण्याचे आव्हान तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. आर एम पुरी यांनी केले आहे.
जनावरांना हिवाळ्यात या रोगाची संसर्ग होत असतो. त्यामुळे सर्व पशुपालकांनी लसीकरण करून घ्यावे. खुरकत या रोगाची लागण झाली की जनावर हे शांत राहते, नियमितपणे चारा खात नाही, पाणी पिणे बंद करते तर दुभते जनावरांचे दुधाचे प्रमाण कमी होते जनावरांच्या तोंडापाशी आतील भागाला तसेच जिभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तर पायांच्या मध्यभागी फोड येतात तर गाभण जनावरांच्या मागच्या पायात हे फोड येतात संसर्गजन्य रोग असल्याने कळपातील इतर जनावरांना देखील लागण होत असते.
रोगाची लागण होऊ द्यायची नसेल तर एकमेव उपाय म्हणजे या रोगाचे प्रतिबंधक लसीकरण होय तालुक्यातील पशुपालकांनी या आजारावर मात करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखाना मार्फत होणाऱ्या लसीकरणला प्रतिसाद देऊन लसीकरण करून घेण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील डॉ.आर. दि.पडीले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नांदेड, डॉ. बि. यू. बोधनकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ.आर. एम. पुरी तालुका पशुधन अधिकारी यांनी केले आहे.