@शिक्षक हा कामगार नाही – शिल्पकार आहे.

 

दिनांक 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आपण भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त
‘शिक्षक दिन’ म्हणून हा दिवस साजरा करतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अतूट असं नातं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे विद्यार्थी, पालक, समाज या दिवशी शिक्षकांविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त करतात. आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या भविष्याला सामोरे जाण्यासाठी शिक्षक तयार करत असतात. काही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये उपजत असतात पण शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या अंगभूत असलेल्या गुणांचा विकास होतो.

विद्यार्थी व शिक्षकांच्या पवित्र बंधनाला आणखी दृढ करणारा ‘शिक्षक दिन’ हा दिवस! भारतीय संस्कृतीत याची परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे.
जगभरात शिक्षक दिन वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो.
एक ‘उत्कृष्ट शिक्षक’ हा आपल्या अंगभूत गुणांमुळे व व्यासंगी वृत्तीमुळे आदर्श ‘वस्तुपाठ’ आपल्या समोर ठेवतो.
परंतु आजच्या सद्यस्थितीमध्ये काही शिक्षकांच्या गैरवर्तनूकीमुळे
इतर शिक्षकांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्या जात आहे. हे चुकीचे असले तरी याला जबाबदार कोण? याचा ही विचार होणे गरजेचे आहे.

वर्तमान काळात ‘शिक्षक’ हे केवळ अध्यापनकर्ता न राहता तो
अर्थजनार्थी झालेला असल्यामुळे कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती हा शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात उतरत असल्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा दर्जा हा खाली घसरत आहे.
आणि जे शिक्षक रीतसर शैक्षणिक पात्रता पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात आहेत अशा शिक्षकांवर मात्र संस्थाचालकांचा किंवा पालकांचा एका वेगळ्या प्रकारचा दबाव शिक्षकांवर राहत आहे, त्यामुळे शिक्षक हा शिक्षक आहे, तो कामगार नाही याची प्रचिती संस्थाचालकांना आणि पालकांना असायला हवे. शिक्षक हा शिल्पकार आहे. पालकत्वाची जबाबदारी तो पेलत असला तरी आपल्या ‘पाल्याचे’ यशाचे श्रेय शिक्षकाला क्वचित प्रमाणातच देत असतो. परंतु एक पालक विसरत चालला आहे की, आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञान-निष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, सहकार्य, समाजाभिमुखता, साहस या गुणांनी युक्त व्यक्तिमत्तवाची नितांत आवश्यकता देशाला व समाजाला आहे. याची पूर्तता करणारे व्यक्ती म्हणजे हा शिक्षक होय.

शिक्षक हा मार्गदर्शक, समुपदेशक असल्याने शिक्षकांचे व्यक्तिमत्व जितके विनयशील, संपन्न, व्यासंगी असेल तितकाच परिणाम पुढील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि मिळणार्‍या प्रेरणेवर होत असतो. म्हणून तत्त्वज्ञान कितीही बदलले, अध्ययन,अध्यापनाच्या प्रक्रियेत बदल झाला तरी संस्कारक्षम शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही.
याचबरोबर, माहिती तंत्रज्ञानाचा ‘विस्फोट’ झालेल्या काळात विद्यार्थी पूर्वीसारखा माहितीसाठी शिक्षकांवर अवलंबून राहिला नसला तरी तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. त्या शिक्षकांचे स्थान काल, आज, उद्या समाजात व देशात अटळ राहील.

काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक असायला पाहिजे.
माहिती-व्यवस्थापन’ करत ‘कुतूहल’ व ‘जिज्ञासा’ जागृत करण्याचे काम शिक्षकांचे आहे. झपाट्याने बदलणार्‍या काळात सतत अद्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक व समर्थ केलेच पाहिजे.
‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ या विधानानुसार शिक्षकत्वाच्या आदर्शाचा राजपथ तयार करणे गरजेचे आहे. प्रत्येक शिक्षकाने खर्‍या अर्थाने सुशिक्षित, सुसंस्कृत, विज्ञाननिष्ठ आणि उद्यमशील भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे.

शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण, जीवघेणी स्पर्धा, अध्यपन-अनुसंधानाविषयी सरकार व शिक्षकांची उदासीनता अशा अत्यंत विचित्र परिस्थितीत डॉ. राधाकृष्णन यांचा ‘जन्मदिन’ साजरा करताना तो केवळ शिक्षकांचे स्तुतिपर कार्यक्रम, परंपरा, रिवाज म्हणून न करता शिक्षक, समाज, राज्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी, जबाबदार पालकांनी अंतर्मुख होऊन नवीपिढी, नवा देश घडविताना आपण आपल्या कर्तव्याचे पालन कितपत प्रामाणिकपणे करत आहोत, हे स्वतःला विचारले पाहिजे. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याला रोजगार मिळावा, मूलभूत नागरी व वैयक्तिक मूल्ये विकसित व्हावीत. म्हणून आजच्या ‘शिक्षक-दिनी’ आपणाला संस्कारमय बनविलेल्या सेवेतील व्रतस्थ महान शिक्षकांना साष्टांग दंडवत करून, त्यांच्याप्रमाणे आपणही आयुष्याचे सार्थक करू या, हीच आजच्या शिक्षक दिनी प्रार्थना!

सौ.रूचिरा बेटकर नांदेड
मो.9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *