लोहा कंधार मध्ये शिवसेनेची मशालच पेटणार- शिवसेना नेते खा. संजय राऊत

 

लोह्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या शिवसंवाद मेळाव्यास जनसागर उसळला एकनाथ दादा पवार यांचा फिक्स आमदार म्हणून सर्वत्र बोलबाला

*कंधार / प्रतिनिधी संतोष कांबळे*

लोहा -कंधारचा आमदार हा शिवसेनेचा होणार व मशाल पेटणार असे प्रतिपादन शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी लोहा येथे शिवसंवाद मेळाव्यात केले.
लोहा येथील राधाई मंगल कार्यालयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंवाद मेळाव्याचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या शिवसंवाद मेळाव्यास प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन लोहा व कंधार तालुक्यातील हजारो शिवसैनिक, नागरिक,शेतकरी कष्टकरी, महिला भगिनींनी उपस्थित होत्या.
यावेळी शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, कार्यक्रमांचे आयोजक तथा शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार, माजी आमदार अनुसयाबाई खेडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जनाबाई नाकाडे,, जिल्हाप्रमुख माधवराव पावडे, ॲड मुक्तेश्वर धोंडगे, भुजंगराव पाटील,लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील काळे,‌शिवसेनेचे लोहा -कंधार विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पाटील कदम, लोहा तालुकाप्रमुख संजय पाटील ढेपे, कंधार तालुका प्रमुख सचिन पेटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी भैय्या परदेशी, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक योगेश पाटील नंदनवनकर,माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल शेटकर ,लोहा शहर प्रमुख खंडू पाटील पवार, शेषराव पाटील दिघे, माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, माजी पं.स.सभापती दिलीप पाटील गाडेकर, युवा सेनेचे अधिकारी गजानन पाटील मोरे, सतीश पाटील बाबर, रुद्रा पाटील भोस्कर, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, लोह्यात शिवसंवाद मेळावा आहे मी बऱ्याच शिव संवाद मेळाव्यास उपस्थित राहिलो.ज्या मतदार संघात शिवसेनेचा आमदार नाही तेथे आम्हाला शिवसेनेचा आमदार निवडून आणायचा आहे.
लोहा -कंधारच नाहीतर संपूर्ण मराठवाडा भगवामय झाल्याशिवाय राहणार नाही.मराठवाड्याला उजेडात आणायचे आहे एकनाथ दादा पवार तुम्हाला तुमच्या मेहनीतीचे फळ मिळेल.
एकनाथ दादा पवार यांनी ३५ वर्ष भाजपात काम केले व ते एक वर्षापासून शिवसेनेत काम करीत आहेत त्यांना भाजपा पेक्षा शिवसेना चांगली वाटते. येथे शिवसेनेत मायेचा ओलावा आहे.देशासाठी, राज्यासाठी, जनतेसाठी भाजपाची भूमीका स्वार्थी आहे. खोटे बोलण्याची आहे. भाजपाला राज्यात पोस्टर चिटकावयला माणूस नव्हता . शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सोबत घेतले. पण भाजपाचे काम हे काम सैरो वैद्य मरो असे आहे.
शिवसेना स्थापनेनंतर १८० सेना स्थापन झाल्या व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १८१ वी सेना आहे.
पण आता देशात दोनच सेना शिल्लक आहेत एक देशाच्या सिमेवरील सैनिकांची सैना व एक शिवसेना .
लोहा -कंधार मध्ये रस्ते नाहीत,पाणी नाही. येथील पिढी ही निझामासोबत लढली पण येथे विकास झाला नाही. सध्याचा आमदार व पुर्वीचा आमदार हा खोकेवाला आहे.
आता विकासासाठी लोहा -कंधारसह राज्यात मशालीचा यज्ञ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यज्ञ पेटविला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राज्यात कुठेच कोसळला नाही पण राजकोट येथे कोसळला आहे . साडेपाच ते दहा कोटी रुपये खर्चून हा पुतळा समुद्रापासी उभा केला तो कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागतात त्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मते मागता येतात पण चांगले पुतळे करता येत नाहीत. येथे अनेक लाडक्या बहिणी आहेत. त्यांना तुम्ही जे दीड हजार रुपये देता ते जनतेचे आहेत जनतेने भरलेल्या करातील आहेत. लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देता व आणि आमदारांना ५० कोटी १०० कोटी देता.
आमचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणीला दीड हजारच काय आम्ही तीन हजार रुपये देऊत.
यावेळेला लोहा -कंधार सहित राज्यात शिवसेना महाविकास आघाडीचे १८० आमदार निवडून येतील लोहा – कंधार मध्ये मशाल पेटेल असे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. यावेळी कार्यक्रमांचे सुत्रसंचलन विक्रम कदम सर यांनी केले.

———————————————————-

शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार म्हणाले की, भल्या भल्याना पाणी पाजविणारे शिवसेनेचा ढाण्या वाघ खा. संजय राऊत या मतदार संघाला १९९५ ची शिवसेना करुन जातील. येथे स्वातंत्र्याच्या ७८ वर्षात रस्ता झाला नाही, पिण्याचे पाणी नाही. येथील शेतकरी आत्महत्या करीत आहेत . येथे नेतृत्व करणाऱ्यांनी कलंबर साखर कारखाना, भूविकास बॅक विकून खाली, एकनाथ पवार पुण्याचा नाही लोहयाचा आहे. पुण्याला पोट भरायला गेलो. मी पोट भरायला राजकारण करीत नाही. येथील चित्र बदलण्यासाठी काम करतो. येथील लोक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विठ्ठल रुक्मिणी सारखे पुजतात. येथे लबाडाची डिग्री ही चिखलीकर कुटुंबाला द्यायाची आहे. आम्हाला घराणेशाहीला मतदान करायचे नाही तर एका शेतकऱ्यांच्या मुलांना मतदान करायचे आहे. कंधार शहर सायंकाळी ७ वाजता बंद होते. कंधार मध्ये अंधार आहे येथे मशाल पेटवायची आहे असे एकनाथ दादा पवार म्हणाले.

—————————————————————–

शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहा न.पा. तील काँग्रेसचे माजी गटनेते पंचशील कांबळे , माजी सैनिक साहेबराव कांबळे, हिप्परगा येथील सामाजिक कार्यकर्ते माधवराव अन्नकाडे, गुंडेवाडीचे सरपंच दिगंबर गुंडे, भुत्याच्या वाडीचे सरपंच माधव भुते, लोहा न.पा.चे माजी पाणी पुरवठा सभापती रूस्तुमराव पवार ,गोळेगावचे सुनील कपाळे, यांच्यासह अनेक गावचे सरपंच , उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *