फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे टोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त टोचणे माहित असते.वेदना कळत नसतात. राजे महाराजे पद मिरवण्यासाठी नसते, तर रयतेचे संरक्षण करण्यासाठी असते. म्हणून राजांनी प्रजेला सुखी ठेवून लेकरा समान वागवावे परंतु हैद्राबाद संस्थांनाच्या जुलूमी निजामाने लोकांवरअन्याय अत्याचार केले. म्हणून हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा प्रतिगामी व पुरोगामी यांच्यातील संघर्षाचा लढा होता, निजामाची अनियंत्रित राजसत्ता आणि लोकशाही यांच्यातील एक तीव्र संघर्ष चालू होता त्यामुळे 13 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आणि 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला त्या मुक्ततेसाठी अनेक वीरांगना निजामाच्या विरोधात हातात बंदूक घेऊन उभ्या राहिल्या त्याची माहिती आपण येथे करून घेत आहोत. मनुष्याकडून मनुष्यावर होणाऱ्या शोषणाचा अत्याचाराचा अंत करणे हे या वीरांगनाचे अतिम ध्येय होते. महिला या कोमल असतात पण कमकुवत नसतात. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई ,
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई ,त्यागमूर्ती रमाई माता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे या महिलांनी समाजात मानाचे स्थान स्वतःनिर्माण केले. त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्तिसंग्रामात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आम्हीही तसूभरही पाठीमागे नाहीत. म्हणून हातात बंदूक घेऊन वीरांगना दगडाबाई शेळके, वीरांगना आशाताई वाघमारे, वीरांगना सुशीलाबाई दिवाण, वीरांगना डॉ.ताराबाई परांजपे, आणि वीरांगना गीताबाई चारठाणकर यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी करावा वाटतो. याशिवाय कावेरीबाई बोधनकर,पानकुंवर कोटीचा,त्रिवेणीबाई पाटलीण,सोनू बाई पाटलीन या महिलांनी सुद्धा हैद्राबाद मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग नोंदवला,15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला असला तरी 565 संस्थाने आणखीही स्वतंत्र नव्हती परंतु काही दिवसानंतर जवळजवळ 562 संस्थानाचे भारतात विलीनीकरण झाले.
परंतु जुनागड,आणि काश्मीर यांची स्थिती दोलायमान होती. कारण जनता आणि शासक यांच्यात एक वाक्यता येत नव्हती.तर हैद्राबाद हे स्वतंत्र इस्लामी राज्याची स्वप्न पाहत होते, त्यांची भाषा उर्दू होती तेव्हा या संस्थानांचा प्रश्न गंभीर बनला होता,चर्चेचे गुऱ्हाळ चालू होते. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण सूत्र आपल्या हातात घेऊन पोलीस कारवाई सुरू केली. तेव्हा 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबादचा निजाम शरण आला. कर्मयोगी संन्याशी स्वामी रामानंद तीर्थ, व अनेक वीरांगनानी अतिशय मोलाची कामगिरी बजावली त्यांच्याच कार्याची यशोगाथा आपण या ठिकाणी वाचकांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थानवर पोलीस ॲक्शन होऊन ते भारतात विलीन झाले. इतकी वर्ष होऊनही संपूर्ण मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील जनतेच्या मनात त्यांच्या स्मृती ताज्या व आजही जिवंत आहेत. त्यामुळेहैद्राबाद संस्थानातील जनतेनी अस्मितेचा,त्यागाचा,संघर्षाचा हा लढा लढला आहे.जनतेने प्रतिकूल परिस्थितीत, जुलमी, अत्याचारी,
अन्यायी निजामी राजवटीला तोंड देऊन महिलांनी प्रसंगी हातात ,बंदूक घेऊन लढा यशस्वी केल्या. त्यांच्या स्फूर्तीदायक आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे गोडवे गायले पाहिजेत हा मुक्ती संग्राम सन्मानाचा,शौर्याचा, स्वाभिमानाचा होता, परंतु जुनागढ, काश्मीर व हैद्राबाद हे तीन संस्थाने भारतात सामील होत नव्हती. संस्थानातले लोक स्वतंत्र झाले नव्हते. मराठवाड्यातील लोकांना स्वातंत्र्य होऊन भारतात विलीन व्हायचे होते,म्हणूनच 7 ऑगस्ट 1947 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची लढाई सुरू झाली.पुरुषांबरोबर महिलांनीही सहभागी झाल्या, मराठवाड्यातील त्या काळातील महिलांची सामाजिक परिस्थिती व शिक्षणाचा अभाव आणि समाजातील अनिष्ट प्रथा,रूढी,परंपरा यामधून बाहेर पडणे शक्य नव्हते, तरीसुद्धा काही वीरांगनानी स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता सर्वांचा विचार करून हातात शस्त्र घेऊन लढा देण्यास सज्ज झाल्या, त्यापैकीच……1) वीरांगणा दगडाबाई शेळके-
जालना जिल्ह्यातील धोपटेश्वर ता. बदनापूर येथील होत्या. यांनी पुरुषांच्या खांद्यांना खांदा लावून हातात तलवार घेऊन पुरुषी वेषभूषा धारण करून मुक्तीसंग्रामात उडी घेतल्या.भूमिगतांना अहोरात्र मदत केली. मिरवणुकी व मोर्चे काढल्या. सभा घेऊन लोकांचे विधायक कामे करून दिले.नंतरच्या काळात त्यांच्या पती देवराव बरोबर वाद निर्माण झाले.
तेव्हा सुद्धा त्या अजिबात डगमगल्या नाहीत,त्यांनी रेल्वेचे रूळ उखडणे,
पोलीस चौकीना आग लावणे,
शासकीय दप्तर जाळून टाकणे. कासीम रझवीच्या “रझाकार” संघटनेवर हल्ला करणे. असे धाडसी कृत्य त्या करीत असत. निजामाचे राज्य उलथून टाकावे हे त्यांच्या नसानसात भरले होते त्या अशिक्षित असल्या तरीही त्यांनी प्रत्यक्ष चमत्कार करून दाखविला.स्वतःच्या जीवाचे बरे वाईट होईल म्हणून तिने अजब निर्णय घेतला,नवऱ्याच्या पसंतीने मैनाबाई या स्त्री सोबत विवाह लावून दिले. ही पुरोगामी विचाराची नांदी ठरली या गोष्टीचा वाचकांनी आत्मपरीक्षण करावे. शौर्यशीलता, आत्मनिर्भरता ,परोपकारवृत्ती या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहेत.
.त्यांच्या लढाऊपणावर अनेक पुस्तक होऊ शकतात.
एवढी अफलातून त्यांनी कामगिरी केली आहे त्या 98 व्या वर्षी 2013 मध्ये दिवंगत झाल्या. त्यांचा अंत्यविधी धोपटेश्वर ता.बदनापूर येथे सरकारी इतमामात करण्यात आल्याची नोंद आहे. त्यांच्या डोळ्यांसमोर झाशीची राणी लक्ष्मीबाईचा आदर्श होता.
म्हणून त्या निर्भीड झाल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी जंगल सत्याग्रहात पुढे सरसावल्या.
म्हणूनच त्यांना “मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई” म्हणून ओळखले जाते.
2) *वीरांगना वाघमारे आशाताई*
नाशिक जिल्ह्यात जन्मलेल्या परंतु नोकरीच्या निमित्ताने मराठवाड्यात येऊन स्थायिक झालेल्या वाघमारे आशाताई यांनी सुद्धा मुक्तिसंग्रामात मोलाचे योगदान दिले. निजामाच्या संघटनांनी त्यांच्या पतीच्या पायात बेड्या ठोकून कैद्याचे कपडे दिले होते. हे प्रत्यक्ष वाघमारे आशाताईंनी पाहिले, तेव्हापासून त्यांच्या मनात निजाम सरकार विषयी मनात कायमस्वरूपी घृणा निर्माण झाली, आणि त्यांनी निजामाच्या विरोधात ‘पैय्यम’ निझमविजय’,रयत’ या वर्तमानपत्रातून मराठवाड्यात होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली.शस्त्रास्त्राची ने-आण करणे ,वेशांतर करून चिठ्ठ्या पोहोचविणे, जोखमीच्या सामानाची ने-आण करणे. कैद्यासाठी साक्षरतेचे वर्ग चालवणे ही महत्त्वाची कामे त्यांनी त्या काळात निर्भीडपणे केले. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. या सर्व गोष्टीची जाणीव ठेवून 1986 साली महाराष्ट्र शासनाने त्यांना
“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” पुरस्कार देऊन सन्मानित केले. यालाच म्हणतात. श्रमाच्या वेलीला यशाची फुले येतात. आणि लोक अशा महान वीरांगणाना नेहमी वंदन करतात.
3) *वीरांगना सुशीलाबाई दिवाण*:
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा हे गाव, स्वामी रामानंद तीर्थ यांची कर्मभूमी होय. येथेच सुशीलाबाई राहत असत, परंतु काही वर्षांनी त्या लातूर येथे स्थायिक झाल्या, त्यांच्या पतीला अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला, त्यामुळे त्यांच्यावर संसार सांभाळण्याची जबाबदारी आपोआपच येऊन पडली, त्यामुळे त्या काळात त्यांनी ‘महिला विद्यामंदिर’ या मराठी विद्यालयाची स्थापना केली व त्याचबरोबर मराठवाडा मुक्तिसंग्रामात उडी घेऊन आपले झुंजार व्यक्तिमत्व सर्वांसमोर सिध्द केले.म्हणूनच त्यांचे सामाजिक,शैक्षणिक व राजकीय योगदान अतिशय प्रेरणादायी आहे.
4) *वीरागंना ताराबाई परांजपे* :
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे आद्य प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ तसेच अच्युतभाई देशपांडे, गोविंदभाई श्राॅफ यांच्या विचाराचा पगडा डॉ.ताराबाई परांजपे यांच्यावर पडलेला होता.त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना एकत्रित करून गट सभा घेणे, निधी गोळा करणे, निजामा विरोधी पत्रक काढून वाटप करणे, धाडसी प्रसंगाला सामोरे जाणे, वेशांतर करून पोलिसाच्या समोरून पसार होणे, हैद्राबाद मुक्ती संग्रामात स्त्रीत्वामुळे काही संभाव्य धोके असतानाही त्यात जीव धोक्यात घालून कार्यरत राहिल्या, हैद्राबाद शहरात सूर्यपेठ वर्धनी हायस्कूलच्या शंभर विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली त्याचे नेतृत्व केले. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर त्यांनी सामाजिक कार्याला कायमस्वरूपी वाहून घेतल्या.5) *वीरांगना गीताबाई चारठाणकर*: मराठवाड्यातच गीताबाईचा जन्म झाला. विनायकराव यांच्याशी विवाह झाला ते वकील होते,परंतु वकिली न करता हैद्राबाद मुक्तिसंग्रामात उडी घेऊन भूमिगत कार्य करत असल्याने त्यांना वॉरंट काढून पोलिसांनी पकडले,त्यावेळी गीताबाईंनी वेशांतर करून पती विनायकरावाला मदत केली. दीनदुबळ्या गरीब समाजातील महिलांच्या विकासासाठी त्यांनी सतत कार्य केले. प्रौढ महिला शिक्षण संस्थेची स्थापना केली. पतीने सोडून दिलेल्या परीतक्त्या महिलांना ही मदत केली .ज्या महिलेचे पती मरण पावले त्या विधवा झालेल्या महिलां साठी शिक्षण वर्ग चालवून त्यांच्या मनात आत्मनिर्भरता तयार केली.
त्यामुळे त्या स्वतःच्या पायावर स्वतःउभ्या राहू लागल्या. त्यामुळे 1977 मध्ये गीताबाई चारठाणकर यांना “सुंदराबाई भोपटकर वीर महिला”पारितोषिक प्रदान करण्यात आले.
भारत देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात पुरुषाच्या बरोबरीने महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच हैद्राबाद मुक्तिसंग्रामामध्ये ही महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यानंतर लढ्याचे स्वरूप व्यापक बनले. लढ्यातील कार्यकर्त्याचे मनोबल वाढले. नव्या उमेदीच्या सक्रिय महिला कार्यकर्त्यां पुढे आल्या. त्यामुळे भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामा विरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला,आणि हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, लातूर, नांदेड ,धाराशिव, बीड, हिगोंली येथे अतिशय थाटामाटात झेंडावंदन केले जाते.
म्हणूनच या वीरांगनासाठी म्हणावे वाटते “भयचकीत नमावे तुज रमणी”! मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज झेंडावंदन करूनच सर्व क्रांतिकारकांचे,वीरांगणेचे स्मरण केले जाते,महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या मनात मुक्ती संग्रामात कार्य केलेल्या महिला विषयी सदैव अभिमान जागृत व्हावा, त्यांच्या तेजस्वी इतिहासाला उजाळा मिळावा, देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या रणरागिणींना आपण कधीही विसरू नये.त्यांचा ज्वलंत, प्रेरणादायी ,स्फूर्तीदायक इतिहास त्यागाने भरलेला पुढील पिढीला कळावा, व त्यांना प्रेरणा मिळावी. व त्याची आपणास सदैव जाणीव असावी, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कल्लाळीच्या शौर्यगाथेचा उल्लेख करावा लागतो आप्पासाहेब नाईकांच्या गढीवर तिरंगा फडकवला येथे झालेल्या बेछूट गोळीबारात 35 जणांना वीर मरण आले.म्हणूनच सर्व ज्ञात-अज्ञात बलिदान केलेल्या सर्व पुरुष, सैनिक,वीरांगनाच्या स्मृतीला आज हैद्राबाद मुक्तीसंग्रामदिनी विठूमाऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठान खैरकावाडी ग्रामस्थांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामातील शूरावीरांना विनम्र अभिवादन व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी.ता.मुखेड जि.नांदेड