कंधार : प्रतिनिधी
गणेशोत्सवात शहरातील शांततेला गालबोट लागू नये, यासाठी ईद मिलादुन्नबी निमित्त सोमवारी दि १६ रोजी काढण्यात येणारी जुलूसे मोहम्मदी मिरवणूक २१ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतल्याचे जामा मशिदीचे इमाम शेख मुराद यांनी सांगितले. सोमवारी शहर व परिसरात ईद मिलादून्नबी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आले.
ईदनिमित्त दरवर्षी कंधारमध्ये जुलूसे मुहम्मदीचे आयोजन केले जाते. यंदा गणेशोत्सवात ईद मिलादुन्नबी आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात जातीय सलोखा बिघडू नये, शहरातील एकता व अखंडता अबाधित राहावी, या जाणिवेतून मुस्लिमांनी ईद मिलादुन्नबी निम्मित काढण्यात येणारी मिरवणूक २१ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ईदनिमित्त बहादरपुरा येथे सामाजिक कार्यकर्ते युवा मंच बहाद्दरपुरा तर्फे दि १५ रोजी रविवारी सालम चाऊस फंक्शन हॉलमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जिवन चरित्रावर प्रमुख वक्त्यांचा संवाद आणि नात स्पर्धा, भाषण स्पर्धा, प्रश्न उत्तर स्पर्धा घेण्यात आली १६ सप्टेंबर रोजी रक्तदान करण्यात आले या शिबिराचे आयोजक हैदर महबूबसाब लखेरे उद्घाटक म्हणून हाजी सयाह सरवरे मगदूम चे वंशज मूर्तुजा हुसेनी साहब यांनी उद्घाटन केले प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोस्ट मास्तर मिया पठाण शेख खमरुद्दीन जमील बेग बहादरपुरा ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी शंकर खरात मुस्तफा पठान अहमद खान पठाण कलिम लखेरे शेख फारुख सय्यद बाबा नागनाथ बाबन लखेरे बालाजी जवादवाड व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात एकूण ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
जुलूसे मोहम्मदी मिरवणूक दि २१ रोजी सकाळी आठ वाजता सुलेमान टेकडी येथून मिरवणुकीस सुरवात होणार आहे. ही मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत छत्रपती शिवाजी चौकात येईल. येथे मौलाना मुराद पैगंबर मोहम्मदांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतील. तेथून मिरवणूक सुलतानपुरा, छोटी दर्गाह, बडी दर्गाह, तलाब कट्टा, जुनी नगर पालिकामार्गे गांधी चौक असे मार्गक्रमण करून जामा मशिदीत पोचेल. येथे फतेहाखाणीनंतर मिरवणुकीची सांगता होणार असल्याचे इमाम शेख मुराद यांनी सांगितले.