कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे दहा दिवसाचे शिबिर असतात.
त्या शिबिरातूनच परिश्रम काय असते? ते विद्यार्थ्यांना शिकवले जातात. अनेक विद्यार्थी तेथूनच पुढे चांगल्या पदावर काम करण्यासाठी जातात. याचे अनेक उदाहरणे आपणाला पाहण्यास मिळतात. आजच्या तरूणांना जेवढं काम कमी लागेल तेवढे आपण सुखी आहोत. अशी वृत्ती निर्माण झाली आहे. युरोप खंडातील रोम हा सुधारलेला देश परंतु लोकांची प्रवृत्ती परिश्रमाचा तिरस्कार करू लागली. त्यामुळे रोम साम्राज्य लयाला गेले. चीन या देशांमध्ये *कसेल त्याची जमीन* हा प्रयोग करण्यात आला. परंतु नंतर लोक आळशी झाली त्यातून तो प्रयोग अयशस्वी झाला. जपानी लोकांची उत्पादन क्षमता आणि कठोर परिश्रम यांनी देशाला मोठं व सक्षम केले आहे. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये नेहमी पद तालिकेत तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर जपान असतो.
छोटा देश असून महान कार्य करतो. पदकाची लयलूट करून घेऊन जातो. कारण त्यांनी त्यांच्या संस्कृतीमध्ये श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजविले आहे.
आपला देश 140 कोटी लोकसंख्येचा असून यावर्षी सुवर्णपदक एक ही मिळाले नाही,ही खंत मनाला लागत आहे .श्रम किती महत्त्वाचे आहेत याचा विचार करा.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन जमिनीवर बसून स्वतः बूट पॉलिश करत असत.
त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही. आपण कामाचा कंटाळा करू लागलो की काम करणाऱ्यांना आपण क्षुद्र समजू लागलो. सध्या परिश्रम न करणारे लोक पुढे पुढे करू लागले आहेत. कारचा दरवाजा सुद्धा काही लोक स्वतः उघडत नाहीत.
खाली पडलेला रुमाल सुद्धा उचलून द्यावा लागतो.जागेवर पाणी पिण्यासाठी आणून द्यावी लागते. आंघोळीचा टॉवेल सुद्धा सोबत नेत नाहीत. कोलगेट हातात नेऊन द्यावी लागते. घरातील कपडे शोधून द्यावे लागतात हे ताजी व ज्वलंत उदाहरणे आहेत
यामधूनच उच्च नीचतेची भावना समाजात निर्माण झाली. मालक नोकर तयार झाले .
त्यासाठी श्रमप्रतिष्ठा मूल्य सर्वत्र रुजविणे अतिशय गरजेचे आणि तितकेच महत्त्वाचे आहे.
आज लोकांची क्रयशक्ती कमी होत आहे. काम केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.असे लोकांना सध्या वाटत नाही. काम कोणतेही असो, काम करत रहा. नेहमी मनगटे मातीत घासा,असे अन्टू धीस लास्ट या पुस्तकात रस्किनने सांगितले आहे. प्रत्येक माणसाला काम केलेच पाहिजे, याची जाणीव टॉलस्टायने आपल्या लिखानातून केलेली आहे,
जो माणूस अंग मेहनतीचे काम करत नाही, त्याला अन्नग्रहण करण्याचा कोणताही अधिकार नाही,
असे स्पष्ट त्यांनी सांगितले आहे.
जिवंत राहण्यासाठी काम केलेच पाहिजे म्हणून आज शाळा विद्यालया तून श्रमप्रतिष्ठा हे मूल्य जास्तीत जास्त रूजविले पाहिजे. महात्मा गांधीजी स्वतः चरख्यावर सूत कातत असत, आपल्या श्रमाला कृतीची जोड असावी, श्रम करणाऱ्या व्यक्तीला कोणीही तुच्छ समजू नये, पंडित जवाहरलाल नेहरू हे एकदा दिल्ली येथील स्टेशनवरून जात असताना त्यांना एक झाडूवाला दिसला त्यांनी त्या झाडू वाल्याला जवळ जाऊन मिठी मारली, सगळ्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. कष्टकऱ्याविषयी आपुलकी दाखवून एक प्रकारे श्रम प्रतिष्ठेला मान्यता दिली,अशी उदाहरण आहेत. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली, श्रम शिबिरे भरवली, आपल्या जीवनामध्ये त्यांनी सेवेला महत्व दिले.घाम गाळून जमिनीचे नंदनवन करण्याचा यशस्वी प्रयोग करून कुष्ठरोग्यांची प्रतिष्ठा वाढविली.
म्हणून श्रमप्रतिष्ठचे मूल्य रुजविणे अतिशय महत्त्वाचे आहे. भारतरत्न मदर तेरेसा यांनी संपूर्ण आयुष्य गरिबांची सेवा करण्यासाठी वेचले.
आज शारीरिक श्रमाची कामे कमी झालेली आहेत,त्यामुळे बऱ्याच जणांना काम करावे वाटत नाही. शेतीमध्ये अगोदर अवजारे नव्हती बैलांच्या साहाय्यांना कामे केली जात होती.आता ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची कामे करून घेतली जात आहेत,
त्यामुळे माणसे आळशी होत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. विहिरी,चर, नाल्या,कालवे खोदणे हे सगळे काम श्रमाची होती परंतु अलीकडे यांत्रिक युगामुळे हे सगळी कामे कमी झालेली आहेत. त्यामुळे कष्ट नको असे अनेकांना वाटत आहे.
कष्टविना फळ नाही। कष्टविना राज्य नाही असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर श्रम केले, त्यामुळे त्यांच्या कीर्तीचा सुगंध आजही दरवळत आहे, प्राचीन भारतामध्ये गुरुकुल पद्धती होती, त्यामध्ये विद्यार्थ्यांना कष्ट करावे लागत होते, शारीरिक कष्टाची काम करून विद्यार्थी शिक्षण शिकत होते, परंतु आज ही परिस्थिती राहिली नाही, घरातील छोट्या छोट्या वस्तू सुद्धा आई-वडील मुलांना उचलू देत नाहीत, त्यामुळे विद्यार्थी व मुले आळशी होत आहेत, डॉ.झाकीर हुसेन यांनी पुस्तकी शिक्षणाबरोबर श्रमाला अतिशय महत्त्व दिले.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सुद्धा सांगितले की श्रम हीच पूजा आहे .कर्मवीर भाऊराव पाटलांनी ‘कमवा आणि शिका’ असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्वाभिमान निर्माण केला. म्हणून मातीत मनगटे घासा तेव्हा तुम्ही जिवंत रहाल, ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ग्रंथ बायबल मध्ये सुद्धा असे म्हटले आहे की *निढळाचा घाम काढून तू आपली भाकरी खा, म्हणून कोणीही श्रम करते वेळेस लाजू नये. श्रमप्रतिष्ठा मूल्य आपल्यामध्ये रुजल्यानंतर कामाची लाज वाटत नाही,म्हणून हे मूल्य अतिशय महत्त्वाचे आहेत. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वच्छता करण्यासाठी घालवले हे उदाहरण आपल्याला सर्व काही सांगून जाते.व्यवसाय कोणताही करा.लाजू नका, साधू संतांनी सुद्धा आपापले कर्तव्य कर्म केले. म्हणून व्यवसायाने ते ओळखले जायाचे, जुन्या काळामध्ये प्रत्येकाचा व्यवसाय होता, संत नामदेव शिंपी, संत नरहरी सोनार,संत सावता माळी ,संत सेना न्हावी, संत गोरोबा कुंभार,संत रोहिदास चांभार अशा पद्धतीने कर्मावरून ते मोठे झाले,बारा बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती.त्यांच्या श्रम प्रतिष्ठेला महत्त्व प्राप्त झाले, म्हणून श्रमाची श्रीमंती नेहमी फलदायी असल्याने श्रमाच्या वेलीला मधुर फळे, फुले येतात. कष्टकरी, शेतकरी, कामकरी, श्रमकरी यांचे नाव आज सुद्धा आपण घेतो, शारीरिक सुदृढता ही फार महत्त्वाची आहे.आधी कष्ट करा. नंतर तुम्हाला फळ मिळते, म्हणून कष्टाशिवाय फळ नाही,आजची पिढी कष्टाकडे दुर्लक्ष करत आहे. आमच्या लहानपणी आम्ही चार किलोमीटर वरून दळण दळून आणायचं, शाळेला पायी चालत जायचं, झाडावर चढणे, विहीरीत पोहणे, शेतीची काम करू लागणे, हे करत करत आम्ही शिक्षण घेऊन आज नोकरी करीत आहोत, हीच कामे आता मुलांना सांगितल्या नंतर कमीपणाची वाटतात, तेव्हा गावात सोईसुविधा नव्हत्या ,परंतु आज घरा जवळच पिठाची गिरणी, किराणा दुकान जवळ आले, हात फिरे तिथे लक्ष्मी फेरे असे म्हणतात.
संपूर्ण जगामध्ये कामगारांच्या अनेक समस्या आहेत .कामगारांच्या संघटना ही आहेत म्हणून राबते हात असल्या मुळे आपण आज पोटभर अन्न खात आहोत,आपला देश कृषीप्रधान आहे म्हणून येथील शेतकरी राबराब राबतो.
त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता पाळणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून नेहमी कष्ट करत चला, कष्टाशिवाय आपण मोठे होत नाही. मोठमोठ्या पदावर जाणारी अधिकारी श्रम केल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून श्रमाला अतिशय प्रतिष्ठा लाभण्यासाठी स्वतः कष्ट करावे लागतात दिवसभर काम करून रात्र शाळेला जाणारी सुद्धा विद्यार्थी आहेत त्यातून सुद्धा ते आपले नशीब आजमावतात हे कष्टाशिवाय होत नाही. गळ्यातील मोत्याच्या हारापेक्षा कपाळावरील घामाच्या धारा अधिक शोभून दिसतात. महामहीम राष्ट्रपती द्रोपदीजी मूर्मू यांनी अथंग परिश्रमातून मुख्यमंत्री, राज्यपाल आणि आता थेट देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत.अतिशय श्रमातून,संघर्षातून तिथपर्यंत गेलेल्या आहेत ही गोष्ट वाखण्याजोगी आहे. स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेले क्रांतिकारक,
समाजसुधारक, शाहीरांनी सर्वांनी आयुष्यभर परिश्रम केले आपले हाडे उगाळून देश सेवा केली म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी त्यांचे स्मरण होते, पद्मश्री मा. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी हे गाव परिश्रमामधून उभे करून देशाच्या नकाशावर आणले जल व्यवस्थापन, कुऱ्हाड बंदी, नसबंदी ,चराईबंदी, दारूबंदी केली,त्यामुळे ते आदर्श झाले. पद्मश्री मा.पोपट पवार यांनी सुद्धा हिवरे बाजारला देशाच्या नकाशावर आणले तसेच बीज माता राहीबाई सोमा पोपेरे यांनी सुद्धा श्रमातून बी-बियाणे संकलन केले म्हणूनच श्रमाच्या वेलीला यशाची फुले येतात.
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
संस्थापक: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी. ता.मुखेड जि.नांदेड