Post Views: 118
भाद्रपद पौर्णिमेनिमित्त महिलांच्या सहभागाने रंगली काव्यपौर्णिमा; भिक्खूनी शामावती यांची प्रमुख उपस्थिती
नांदेड – बौद्ध धम्मात वर्षावास पर्वास खूप महत्त्व आहे. या काळात बौद्ध भिक्षू अभ्यास, चिंतन आणि मनन करतात. तर उपासक उपासिका हे आपल्या परिसरातील विहारात ग्रंथपठण करीत असतात. या पावन पर्वावर येथील सप्तरंगी साहित्य मंडळाची ८७ वी काव्यपौर्णिमा भिक्खूनी शामावती यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महिलांच्या सहभागाने चांगलीच रंगली. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कवी थोरात बंधू, शाहीर आ. ग. ढवळे, शाहीर अशोक चौरे, खोबराजी सावंत, गंगाधर हटकर, मंडळाचे कार्याध्यक्ष तथा काव्य पौर्णिमेचे संकल्पक साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, गझलकार चंद्रकांत कदम, ग्यानोबा नरवाडे यांची उपस्थिती होती.
भाद्रपद पौर्णिमेनिमित्त शहरातील तरोडा बु. परिसरातील सांची नगरात सप्तरंगी साहित्य मंडळाच्या काव्य पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. याच ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे दररोज वाचन सुरू आहे. दररोज ग्रंथाचे वाचन आणि अर्थनिर्वचन उपासक बाबुराव थोरात हे करतात. वाचनाचे सत्र संपल्यानंतर कविसंमेलनास प्रारंभ झाला. यात
भिक्खुनी शामावती, कौशल्या उबाळे, थोरात बंधु, चंद्रकांत कदम, नागोराव डोंगरे, आ. ग. ढवळे, अनुरत्न वाघमारे, कविता गायकवाड,
प्रज्ञाधर ढवळे, पंचफुला वाघमारे, सुमनबाई गच्चे, संघमित्रा लोखंडे, छाया लोखंडे, शाहीर अशोक चौरे, शाहीर आ. ग. ढवळे यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपासकांच्या याचनेवरुन भिक्खूनी शामावती यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. वर्षावास पावन पर्वावर बुद्धं सरणं गच्छामिचा स्वर निनादला! त्यानंतर ग्रंथवाचन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी काव्यगितांमुळे कविसंमेलन रंगतदार झाले. चंद्रकांत कदम यांच्या गझलांनी कविसंमेलन अधिकच बहारदार झाले. महिलांच्या वतीने कवींचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन आ. ग. ढवळे यांनी केले तर आभार थोरात बंधू यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाबाई पंडित, गिरजाबाई कोकाटे, महानंदा गोवंदे, शकुंतला वाठोरे, सावित्री घोडके, संघमित्रा खंदारे आदींनी
परिश्रम घेतले.