—————————————————————-
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. – संपादक
—————————————————————-बुधवारची सकाळ सुरू झाली ती पावसानेच. आम्हाला देवगिरी पकडायची होती नांदेड स्टेशनवरून. सर्वांना सकाळी आठ वाजता प्लॅटफॉर्म नंबर चार वर या म्हणून निरोप दिला होता. पावसातच सोन्या मारुती मंदिर व स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेऊन अंदमान टूर यशस्वी करण्यासाठी साकडे घातले. आठ वाजून दहा मिनिटांनी स्टेशनवर पोहोचलो तर संदीप मैंद यांनी सर्वांना सूचना केली की, आज देवगिरी प्लॅटफॉर्म नंबर चार ऐवजी तीन ला येत आहे. आधीच पूर्व सूचना मिळाल्यामुळे सर्व लावाजमा प्लॅटफॉर्म नंबर तीन कडे रवाना झाला. आलेल्या सर्व टुरिस्टचे संदीप मैंद, जयश्री ठाकूर, विशाल मुळे, राजेशसिंह ठाकूर यांनी मोत्याची माळ घालून स्वागत केले. देवगिरी यायची वेळ झाली तरी डिस्प्ले वर कोच पोझिशन लावली नसल्यामुळे स्टेशन मास्तरकडे फोनवरून तक्रार नोंदवली. अवघ्या एका मिनिटात डिस्प्लेवर कोच पोझिशन दाखवल्यामुळे सर्वजण आपापल्या बोगीसमोर पोहोचलो.
नऊच्या सुमारास देवगिरी ने नांदेड स्टेशनवर प्रवेश केला. आमच्या सर्वांची एसीची तिकिटे कन्फर्म असल्यामुळे निश्चिंत होतो. बी वन ते बी फोर तसेच काहीजण ए वन कोच मध्ये बसले. आमच्या बी टू कोच चा एका साईडचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे सामान ठेवायला अडचण येत होती. बी वन मधून जाऊन पाहिले तर काय दरवाजा च्या मागे बेडरोल चे गठ्ठे टाकलेले होते. कोच अटेंडंट ला रागावलो. टी सी कडे आणि रेल्वे कंप्लेंन नंबर १३९ वर तक्रार दाखल केली. सहप्रवाशांनी एवढ्याशा गोष्टीसाठी तक्रार का करता असे विचारले. मी त्यांना म्हटले की, आपण गुपचूप बसलो तर सुधारणा होणार नाही. आपल्याला त्रास झाला तो इतरांना होऊ नये यासाठी हे करणे गरजेचे आहे. रेल्वेने तक्रारीची तात्काळ दखल घेतली. अर्ध्या तासाच्या आत सर्व बेडरोल दरवाजापासून हटवून दरवाजा मोकळा केल्याचे अटेंडंट ने येऊन सांगितले.
नांदेड ते सिकंदराबाद हा आमचा रेल्वे प्रवास सुरू झाला. सर्वांना माय हॉलिडेजच्या टीमने मिनरल वॉटर वाटले. दुपारचे जेवण प्रत्येकाने घरून आणलेले होते. महिलांनी एकमेकांना आपले खाद्य पदार्थ दिल्यामुळे मस्तपैकी अंगत पंगत झाली. जेवणानंतर पुरुषांनी वामकुक्षी घेतली तर महिलांनी गाण्याच्या भेंड्या खेळल्या. काहीनी गप्पांचा फड जमविला. राजकारण, क्रिकेट, चित्रपट या विविध विषयावर मनसोक्त चर्चा झाली प्रत्येकाने आपापली मते व्यक्त केली.तीनच्या सुमारास सिकंदराबाद स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नंबर ७ वर सर्वजण उतरलो. जयंत वाणी या टूर मॅनेजर ने सर्वांचे स्वागत केले.आमच्या बसेस प्लॅटफॉर्म नंबर दहाच्या बाहेरील रस्त्यावर उभ्या होत्या. सर्वांनी लाल रंगाची कॅप परिधान केलेली असल्यामुळे स्टेशन बाहेर पडायला कोणतीही अडचण आली नाही. दोन बस मधून आम्ही सर्वजण हॉटेल कडे निघालो. रस्त्यात चहा कॉफी साठी सर्वजण एका ठिकाणी थांबलो. दर्जेदार पेय घेतल्यानंतर आमची पुढे वाटचाल सुरू झाली. शमशाबाद भागातील विमानतळा जवळ असलेल्या सिडाडेल या फोर स्टार हॉटेलमध्ये सर्वांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.प्रत्येक जोडप्यासाठी स्वतंत्र रूमची व्यवस्था केलेली होती.भव्य हॉटेल व प्रशस्त रूम पाहून सर्वजण खुश झाले.
आमच्या इतर सर्व यात्रांमध्ये फक्त शाकाहारी भोजन देण्यात येते. पण ही काही धार्मिक यात्रा नसल्यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज ची प्रत्येक ठिकाणी सोय केलेली होती. रात्रीचे जेवण अतिशय स्वादिष्ट होते. जेवणानंतर मिळालेला मालपोवा व आईस्क्रीम चा आस्वाद सर्वांनी घेतला. सकाळी सहा चे विमान पकडायचे असल्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी रात्री दोन वाजता उठणे भाग होते. त्यामुळे सर्वांना रूम मध्ये जाऊन आराम करण्याच्या सूचना दिल्या. संदीप सोबत हॉटेल मध्ये फेरफटका मारला. तळमजल्यावर असलेल्या भव्य हॉलमध्ये बरीच लगबग दिसून येत होती. सहज चौकशी केली असता उद्या होणाऱ्या एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी दीड कोटीचे डेकोरेशन लावण्यात येत होते. याशिवाय प्रति व्यक्ती जेवणासाठी दोन हजार रुपये प्लेटचा दर होता. मनात विचार आला की, एका रात्रीत जितके पैसे खर्च करण्यात येत आहे तेवढ्या पैशात तर भाऊचा डबा दहा वर्ष सहज चालला असता.
हॉटेल मधील रूम आणि जेवण अप्रतिम असल्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन चांगले पडले होते. अंदमानच्या बेटावरून या सदराचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यामुळे अनेकांनी फोन करून पुढचा तुमचा अंदमानचा टूर कधी आहे याची चौकशी केली.संदीपजी बरोबर चर्चा केल्यानंतर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील अंदमानचा टूर काढण्याचे निश्चित केले. ज्यांनी चौकशी केली होती त्यांना निरोप दिल्यानंतर सहा जणांनी बुकिंग करण्यासाठी पैसे पाठवितो असे सांगितले. पंधरा दिवसात सर्व डिटेल्स काढून अधिकृत अंदमान टूरची घोषणा केल्यानंतरच आडवांस पाठवा असा त्यांना निरोप दिला. प्रशस्त रूममध्ये पडल्या पडल्या झोप कधी लागली हे कळाले देखील नाही.
(क्रमशः)