काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात जाण्याचा योग आला कारण, मात्र पुरस्काराचे आयोजन होते. कोल्हापूर शहराविषयी खूप ऐकून असल्यामुळे तेथील मोजकेच पर्यटन ठिकाणे पाहण्याचा मोह अनावर झाला.
कोल्हापूरात म्हटलं की, कोल्हापुरी तांबडा रस्सा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरची भेळ, कोल्हापुरी साज, करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गुळाचा गोडवा, हुपरी येथील चांदीचे कलाकुसरीचे दागिने, कोल्हापुरी फेटा या साऱ्या गोष्टींबरोबरच ‘या पाव्हणं’ असं म्हणणारी कोल्हापुरी माणसं.दक्षिण काशी… म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी मातेचे मंदिर रंक असो वा राव साऱ्यांचे हात निस्सीम भक्तीनं जिथं जोडले जातात ती सर्व महाराष्ट्रासाठी आराध्य दैवतं असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी होय. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील हे कोरीव मंदीर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. नवरात्रातील रोषणाई या मुळे अप्रतिम सुंदर असणाऱ्या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलविते. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जाते. जुना राजवाडा आणि भवानी मंडप हे याठिकाणचे आकर्षण आहे.
नावलौकिक असणारे सर्व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणजे ज्योतिबा. दख्खनचा राजा म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर होय. ज्योतिबाच्या मंदिरात 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत. या ठिकाणी यात्रेच्यावेळी कित्येक टन गुलालासह खोबरे उधळले जाते. जवळच यमाई मातेचे मंदिर आहे. यात्रेत ज्योतिबाची पालखी यमाई मंदिरास भेट देते.
कोल्हापूर शहरात अगदी मध्यवर्ती ठिकाणी न्यू पॅलेस म्युझियम दिमाखात उभा आहे. काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापुरचे वैभव आहे. येथील छत्रपती शहाजी म्युझियम हे खास आकर्षण आहे. राजघराण्यातील वापरातील वस्तू, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, शिकार केलेले प्राणी, दुर्मिळ पत्रव्यवहार, घड्याळाचा मनोरा इत्यादी… या वास्तूचे वैशिष्ट्य आहे.कोल्हापूरच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेले स्थाळ म्हणजे रंकाळा तलाव. पाण्याने ओतपोत भरून असलेले सुंदर आणि निसर्गरम्य तळ्याच्या मध्यभागी रंगभैरवाचे मंदिर आहे. तलावाच्या एका बाजूला संध्यामठाचे शिल्प आहे. तर पश्चिमेस शालिनी पॅलेस आहे. ही वास्तू शिल्पकलेचा अद्वितीय नमूना आहे.
किल्ले पन्हाळगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहारच्या वेढ्यातून विशाळगडावर सुरक्षित पोहोचण्याच्या आणीबाणीप्रसंगी बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशिद यांनी पन्हाळगडावर सैन्याला थोपवून धरले तो पन्हाळगड होय.
किल्ले पन्हाळगड हा कोल्हापूरची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो. पुसाटी बुरुज, तबक उद्यान, नायकिनीचा सज्जा, तीन दरवाजा, धान्य कोठार, अंबरखाना, धर्मकोठी, हिरकणी बुरूज, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय तसेच येथून जवळच मसाई पठारावर बौद्धकालीन गुहा व लेणी पहावयास मिळतात. पांडव झरा येथे असून बारमाही पाणी असते. बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आणि वीर शिवा काशिद यांची समाधी याठिकाणी आहे.अशाप्रकारे महालक्ष्मी मंदिर , दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर, न्यू शाहू पॅलेस, रंकाळा तलाव आणि किल्ले पन्हाळगड पाहण्यात आले.
कोल्हापूर शहर हे आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे येथिल धार्मिक, सामाजिक, आणि नैसर्गिक वेगळेपणा बरोबरच खाद्यसंस्कृती, क्रीडा संस्कृती किंवा सिनेसृष्टीतील स्थान अशा वेगवेगळ्या स्तरांतून झळकत आलंय.
शेवटी, काय तर कोल्हापूर हे वैविध्यपूर्ण आणि मनमोहक पर्यटन स्थळांचा खजिना आहे जो प्रत्येक प्रवाशांच्या किंवा पर्यटकांच्या आवडीनिवडी पूर्ण करतो. तर इतिहासप्रेमींना येथील परिसरातील भूतकाळात नेऊन पुन्हा जिवंत करता येतो. कोल्हापूर शहर हे त्याच्या बहुआयामी आकर्षणांसह, पर्यटकांना त्याचे सौंदर्य शोधण्यासाठी, त्याचा इतिहास आत्मसात करण्यासाठी आणि तेथे मिळत असलेल्या आनंदात मग्न होण्यासाठी आवाहन करतो आहे.-रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211