अष्टपैलू शिक्षक बाबाराव विश्वकर्मा यांना जि.परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार ‘

जगातील काही अतिप्राचीन संस्कृती पैकी एक प्राचीन व समृद्ध संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीला जगात सर्वोच्च स्थान आहे. याचा अनुभव आपणास वेगवेगळ्या सण, उत्सव, प्रथा व परंपरामधून येत असतो. भारतीय संस्कृतीच्या अनेकविध तत्वांपैकी एक आदर्श जीवनतत्व म्हणजे, या संस्कृतीने ‘गुरु’ या व्यक्तीला दिलेले अन्यन्य साधारण महत्व होय.

गुरुर्र ब्रम्हा, गुरुर्र विष्णु, गुरुर्र देवो महेश्वर : |
गुरुर्र साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नमः ||
या काव्योक्ती प्रमाणे ब्रम्हा , विष्णू महेश एवढेच नाही तर गुरू हा परब्रम्हाचे स्वरूप आहे,असे आपली संस्कृती सांगते. म्हणुनच भारतीय समाजाने गुरूला नेहमीच सर्वोच्च स्थान व सन्मान दिलेला आहे .
आपल्या देशाचे भुतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी आपला जन्मदिवस ‘ शिक्षक दिन ‘ म्हणुन साजरा करावा व अध्यापन कार्यकुशल, गुणवान शिक्षकांचा गौरव करावा, अशी ईच्छा व्यक्त केली. यासाठी ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस भारतात ‘शिक्षक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर व जिल्हास्तरावर ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते .

जिल्हा परिषद, नांदेड प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, उपक्रमाशील, शिक्षकांसह ज्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय संपादणूक चाचणीचा (NAS) प्रतिसाद ८०% पेक्षा जास्त आहे. अशा शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन ४ ऑक्टोबर २०२४, शुक्रवार या दिवशी गौरव करण्यात आले .

यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जि.प.कें.प्रा.शाळा, शिराढोण ता.कंधार येथे कार्यरत असलेले उपक्रमशील, विद्यार्थी प्रिय, व साहित्यिक शिक्षक श्री बाबाराव बालाजी विश्वकर्मा यांची निवड झालेली आहे.
बाबाराव विश्वकर्मा यांचा जन्म १५.१२.१९७७ रोजी लोहा तालुक्यातील टाकळगाव येथे सर्वसामान्य गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या घरी आर्थिक संपन्नता जरी नसली; तरी त्यांच्या कुटुंबात सात्विक गुणांची संस्कार श्रीमंती मात्र खूप होती. कुटुंबातील धार्मिक वातावरणामुळे बालपणापासून संतसाहित्य, आध्यात्मिक विचार व सुसंस्कृत अशा मानवीय मूल्यांचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत.
सर्वसामान्याप्रमाणे त्यांच्याही पाचवीला आठरा विश्व दारिद्रय पूजलेलेच होते. पण तशाही प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी प्राथमिक शिक्षण जि.प. प्रा.शा. टाकळगाव , येथून तर माध्यमिक शिक्षण श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, सिडको नांदेड येथून आणि डि.एड्. श्रीदत्त शासकीय अध्यापक विद्यालय हदगाव येथून पूर्ण केलेले आहे.
बाबाराव विश्वकर्मा यांची २७.११.१९९९ रोजी कुदळा (तांडा) कें.हळदा ता.भोकर येथे सहशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. तेथेही त्यांनी शाळातील १००% विद्यार्थी प्रगत करून आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला होता. आतापर्यंत त्यांनी वडगाव, उमरा, तलबीड, किनवट सारख्या दूर्गम भागातील मोहपूर या ठिकाणी यशस्वी सेवा केलेली आहे. ते सध्या शिराढोण ता.कंधार येथे ‘सहशिक्षक’ म्हणून कार्यरत आहेत.
१) सेवांतर्गत वाढवलेली शैक्षणिक अर्हता :
————————————————————
बाबाराव विश्वकर्मा हे स्वतःचे अध्यापन कौशल्य अद्ययावत व दर्जेदार राहावे यासाठी, ते स्वतः सेवांतर्गत शिक्षणात नेहमीच अध्ययनरत राहतात. त्यांनी आतापर्यंत शिक्षणशास्त्रातील डी.एड् , बी.एड्, एम.ए. मराठी, एम.ए. (शिक्षणशास्र), एम.ए. (शैक्षणिक संप्रेषण), यांसह डि.एस.एम. (शालेय व्यवस्थापन पदविका ) यांसारख्या विषयांचे शिक्षण घेत पदवी आणि पदव्युत्तर पदव्या प्राप्त केलेल्या आहेत.
२) गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले शैक्षणिक उपक्रम :
—————————————————————
बाबाराव विश्वकर्मा हे एक संवेदनशील, निर्व्यसनी व उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षक आहेत. ते ज्या शाळेत सहशिक्षक म्हणून रूजू होतात, तेथील वातावरण सकारात्मक ऊर्जेने व कार्यक्षमतेने बदलून टाकतात. ज्या वर्गावर ते अध्यापन करतात, त्या वर्गातील विद्यार्थ्यांना ते आईची माया व वडिलांचा धाक दाखवून शिक्षणाचा लळा लावतात. त्यामुळे ते नेहमीच विद्यार्थ्यांच्या गराड्यातच दिसत असतात. विश्वकर्मा सर त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक ज्ञान, सुसंस्कारासह मानवीय मूल्यांनी रूजवण सतत करत असतात. हे त्यांच्या अध्यापनशैलीचे एक वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी बाबाराव विश्वकर्मा यांनी शाळा व वर्गस्तरावर आतापर्यंत १) चाकलेट हंडी (नाविण्यपूर्ण उपक्रम) २) रद्दितून संदर्भ साहित्याची निर्मिती उपक्रम. ३) दत्तक मित्र (कार्यानुभव उपक्रम) ४) एक मूल, एक झाड (पर्यावरणीय उपक्रम) ५) शिक्षणाचा नवा मंत्र, डिजिटल तंत्र (तंत्रज्ञानात्मक उपक्रम) ६) वाचन : एक अमृतानुभव (भाषिक उपक्रम), ७) ‘योग’ : एक अमृतानुभव’ (शारीरिक उपक्रम) ८) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (शैक्षणिक उपक्रम) ९) जागर श्यामच्या कथांचा : प्रकट वाचन (संस्कारक्षम उपक्रम) १०) क्षेत्रभेट : चिकित्सक अभ्यास (कृतीशील उपक्रम) असे विविध शालेय व सहशालेय उपक्रम राबविलेले आहेत.
अध्ययन- अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर :
————————————————–
२१ व्या शतकातील ‘भविष्यवेधी शिक्षण संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अनुभवातून शिक्षण, सहाध्यायी शिक्षण, कला एकात्मिक शिक्षण, खेळाधारीत शिक्षण, अध्ययनात तंत्रज्ञानाचा वापर करून स्वयंअध्ययन करणे अशा अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून, विद्यार्थ्यांना आव्हाने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या वर्गातील ९०% विद्यार्थ्यांच्या पायाभूत वाचन व संख्याज्ञान क्षमता विकसित झालेल्या आहेत.
शैक्षणिक संशोधन:
—————————
बाबाराव विश्वकर्मा सरांनी सेवांतर्गत मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत असतांना अनेक विषयांवर संशोधन केले आहे.१) शाळाबाह्य कामांचा नांदेड शहरातील जि.प.शिक्षकांच्या अध्यापनावर होणारा परिणाम: एक अभ्यास. २) शिक्षणातील नवीन विचार प्रवाहांचा अध्ययन अध्यापनावर झालेला परिणाम : एक अभ्यास ३) माध्यमिक स्तरावरील इयत्ता गणिताच्या अध्यापनासाठी पारंपरिक पद्धती व प्राप्ती प्रतिमानाद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादणूकीवर होणारा परिणाम : एक अभ्यास ४) शालेय व सहशालेय उपक्रमातून पर्यावरण संरक्षण व संवर्धन : एक अभ्यास यांसारखे शैक्षणिक संशोधन केलेले आहेत.

४) साहित्यक्षेत्रातील योगदान :
——————————————————–
संत साहित्याचे व शिवचरित्राचे अभ्यासक असलेले बाबाराव विश्वकर्मा उत्कृष्ट वक्ते असून, त्यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या साहित्य संमेलननात कवी, परिसंवादातील वक्ते, व निवेदक म्हणून सहभाग नोंदवलेला आहे. आज प्राथमिक शिक्षकांना विविध शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचा प्रचंड ताण असतांनाही बाबाराव विश्वकर्मा यांची १) विश्वरंग (काव्यसंग्रह) २) विश्वार्त (काव्यसंग्रह) ३) गावामातीचे अभंग, (ग्रामविकास संकल्पना ) ४) ज्ञानबीजांची पेरणी ( शैक्षणिक ) ५) माझी शाळा,माझे उपक्रम (शैक्षणिक) यांसारखे पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. त्यांची वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून पुस्तक परीक्षणे, शैक्षणिक लेख, गौरव लेख सातत्याने प्रकाशित होत असतात. हे त्यांच्या जिज्ञासू आणि अभ्यासूवृत्तीचे आणखी एक वैशिष्ट्ये आहे.

५) सामाजिक व राष्ट्रीय कार्य :
——————————————
शिक्षणाबरोबर ते सामाजिक कार्यात वेळोवेळी सहभागी होत असतात. राष्ट्रीय जनगणना, निवडणूक आयोगाचे दिलेले राष्ट्रीय (BLO) कार्य, Covid-19 च्या लशीकरण मोहिमेत ‘आरोग्य स्वयंसेवक’ म्हणून कार्य केलेले आहे. ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, कीर्तन, प्रवचनकार अशीही विश्वकर्मा यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे अशा सामाजिक कार्यात सहभागी होतात. थोर महापुरुषांच्या जयंती निमित्त व्याख्याते, उत्कृष्ट निवेदक म्हणूनही ते सर्व परिचित आहेत.

६) प्रशिक्षणातील उत्कृष्ट सुलभक :
————————————————
आजपर्यंत सी.सी.आर.टी. दिल्ली यांच्याकडून शिक्षकांना दिले जाणारे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण बाबाराव विश्वकर्मा यांनी गुवाहाटी (आसाम) येथे २१ दिवस व एस.आर.टी. विद्यापीठ, नांदेड (महाराष्ट्र) येथून ११ दिवसाचे राष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी राज्यस्तरावरील विविध प्रशिक्षणे घेतलेले असून विभागीयस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर विविध प्रशिक्षणात उत्कृष्ट सुलभक म्हणून यशस्वी कार्य केलेले आहे. आजपर्यंत प्राथमिक,उच्च प्राथमिक , माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना त्यांनी वेळोवेळी प्रशिक्षित केलेले आहे.

अशा सर्वगूण संपन्न, सामाजिक जाणीव असलेल्या, होतकरू,अभ्यासू , अष्टपैलू शिक्षकांची नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दखल घेऊन, त्यांच्या पाठीवर पुरस्काराच्या रूपाने प्रेरणेची थाप देण्यात येत आहे. हे नांदेड जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदनीय कार्य आहे. त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे जाहीर आभार व आदर्श शिक्षक बाबाराव विश्वकर्मा यांना भावी शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *