नांदेड -राजकारणासह सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायला हवा. नांदेडच्या नवतरुणांनी धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त महावंदनेचा केलेला हा उपक्रम भारतामध्ये एक आदर्श कृती म्हणून गणले जाईल आणि ह्या कृतीमुळे इतरांनी अनुकरण करुन सर्वत्र धम्माविषयी लोकांच्या मनामध्ये गोडी निर्माण होईल. आंबेडकरी युवा चळवळीपासून दूर जाता कामा नये कारण प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा असे अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी केले. ते महाबुद्धवंदना कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह भदंत विनय बोधिप्रिय, भदंत पंय्यारत्न, भदंत रेवत बोधीसह भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थिती होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त हजारो उपासक, उपासिकांच्या उपस्थितीमध्ये ‘महा बुद्धवंदने’चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अडीच हजार वर्षांपेक्षा जास्त देदीप्यमान असा वारसा लाभलेल्या बौद्ध धम्माचा, आपल्या समृद्ध परंपरांचा उत्साह तेवत ठेवणेसाठी, भगवान बुद्धाच्या शिकवणींचा आदर करण्यासाठी आणि सुसंवाद, करुणा आणि सजगता वाढविण्यासाठी नांदेड शहरातील आंबेडकरवादी युवकांनी पुढाकार घेत महा बुद्धवंदनेचे अशोक विजयादशमी दिनी पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीत आयोजन केले होते. नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक चळवळीचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. तसेच हजारो अबाल वृद्ध, श्रद्धावान उपासक, उपासिकांच्या उपस्थितीमध्ये हा महा बुद्धवंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला.
महावंदनेनंतर भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य संपन्न झाले. भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. एम. वाघमारे, रविकिरण जोंधळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नांदेड शहरातील आंबेडकरवादी युवकांनी सहभाग नोंदवत या महा बुद्धवंदनेचे उत्कृष्ट नियोजन केले. तसेच जिल्हा पोलीस प्रशासन, महानगर पालिका प्रशासन यांचे यथोचित सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. पी. गायकवाड यांनी केले तर या कार्यक्रमाची प्रस्तावना रोहन कहाळेकर यांनी केली. आभार प्रशिक गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी महामानवाला अभिवादन करण्यासाठी जिल्हाभरातून बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आतिश ढगे, साई पाटील, किरण सदावर्ते, लक्ष्मण वाठोरे, योगेश सोनाळे, अनिकेत सोनवणे स्वप्निल नरबाग, गब्बर सोनवणे, नितेश हनुमंते, दिनेश येरेकर, अनिकेत सोनवणे, कपिल ढवळे, अभिमान राऊत, कपिल सदावर्ते, योगेश सोनुले, लखन कारले, लखन वाठोरे, कपिल वावळे, संजय सोनकांबळे, शुक्लोधन गायकवाड, आतिश ढगे, वृषभ महाबळे आदींनी परिश्रम घेतले.