भारतीय समाजात असलेल्या वाईट, रूढी,परंपरा,प्रथा,वेडगळ समजुती या चालूच आहेत.अनेक भगत,भोंदू बाबा यांच्याकडून काही लोक दरवर्षी दिवसाढवळ्या लुटले जात आहेत. त्यामुळे एका बाजूला महासत्ताची स्वप्न पाहत आहोत आणि दुसरीकडे प्रथा,परंपरा जुन्या रुढीत गुरफटलो आहोत. म्हणून या विज्ञान युगात वाईट विचाराचे दहन करून आधुनिक विचाराचे सोने लुटूया! प्रत्येक पुरुषाने महिलांना समानता द्यावी. आपल्या घरापासून सुरुवात करावी.
तिला असणाऱ्या बुद्धीचा सत्कार्यासाठी उपयोग करून घ्यावा. कारण निर्मात्याने तिला परिपूर्णता दिली आहे. ती आदिशक्ती आहे. नवरात्रीत आपण तिला रणचंडिका, रणरागिनी, दुर्गा ,शारदा, रेणुका, जगदंबा ,येडेश्वरी, महालक्ष्मी ,भवानी अशा कितीतरी नावाने तिचा गौरव केला आहे. त्यासाठी तुम्ही तिचा सामाजिक दर्जा ढासळू देऊ नका. एक स्त्री शिकली तर सात पिढ्या शिकतात. म्हणून आधुनिक विचाराचे सोने आज आपणाला लूटायचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जायाचे आहे. त्यासाठी आधुनिक ज्ञान विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक शिकणे महिलांना गरजेचे आहे.याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. देवीने वाईट विचारांचा राक्षसाचा वध केला आहे .म्हणून पुढे येणाऱ्या वाईट विचारांच्या राक्षसांचा प्रत्यक्ष वध करायचा आहे. बुरसटलेले विचार सोडून द्यावयाचे आहेत.
तिच्या हातात लेखणी देऊन वेडगळ समजूती काढून टाकायच्या आहेत. आणि तिच्या मनात कायमस्वरूपी आधुनिक विचारांची पेरणी करायची आहे. तिला आत्मनिर्भर बनवायचे आहे यामुळे तिला खरे खोटे, वाईट चांगले ,सुख दु:ख या गोष्टी कळणार आहेत. यासाठी आधुनिक विचाराचे सोने भरपूर लुटायचे आहे. प्रत्येकाने आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकले की समाज प्रगल्भ होईल.पुरुषाची अहंकारी वृत्ती कमी होईल तेव्हा तिच्यावर हल्ले होणार नाहीत .दररोज एका तरी महिलेवर अन्याय होतो हे काल्पनिक नसून सत्य आहे .त्यामुळे या अहंकार रूपी राक्षसांच्या विचारांचा अंत करायचा आहे. त्यासाठी ग्रंथ वाचन करणे काळाची गरज आहे .कथा ,कादंबऱ्या मधून न्याय, अन्याय,अत्याचार, बळजबरी या गोष्टी समजतात .
म्हणून वाचन करून आधुनिक विचाराचे सोनं लुटण्याचा आज विजयादशमीचा दिवस आहे.
इतर देश चंद्रावर पोहोचले पण आपण फार पाठीमागे राहिलो आहोत. त्यासाठी शिक्षण हे सर्वांगीण सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे.
आजही अनेक खेड्यापाड्यात सोयी सुविधा नाहीत.आणि महिलांची कुचंबणा होते. सुशिक्षित मुलींना अनपढ व्यक्तीना दिले जाते. त्यामुळे दोघात नेहमी शाब्दिक चकमक उडतात.प्रतिगामी विचारांचा पती असल्यानंतर पत्नीवर दररोज संशय घेतो .दोघांची विचार जुळत नाहीत मग हीच परिस्थिती अनेक ठिकाणी पहावयास मिळते. पुरुष क्षमा मागत नाहीत. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण जास्त वाढले आहे. यासाठी आपणाला कुविचाराचे दहन करावयाचे आहे आणि आधुनिक प्रगत राष्ट्राबरोबर जायाचे आहे. तेव्हा आपण वाईट गुणांवर विजय मिळवून विजयादशमी साजरी केल्याचे आत्मिक समाधान लाभेल.गोड खाऊन कडू बोलणे किंवा दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला सोनं सोनं म्हणणे आणि दुसऱ्या दिवशी पायदळी तुडवणे ही पद्धत बरोबर नाही म्हणून सदैव आधुनिक विचारांची पेरणी करून विजयादशमी साजरी करूया. विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
शब्दांकन
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव*