श्रीज्ञानेश्वरीतील दीपोत्सव

 

 

*दीपावली म्हणजे दीपोत्सव. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये दीप विषयक अनेक ओव्या दिल्या आहेत.*
*दीपावलीच्या या पवित्र सणादिवशी श्री ज्ञानेश्वरीतील साहित्यिक दीप लावून आपण ज्ञानरूपी प्रकाशाकडे जावूया..*

*येऱ्हवी तरी मी मुर्खु।*
*जरी जाहला अविवेकु।*
*तरी संतकृपा दीपकु। सोज्वळू असे ।*
अर्थ:- सहज पाहिले असता जरी मी अज्ञानी व विवेकहीन असलो तरीही संतकृपारुपी दीप सोज्वळ सदा तेवता आहे. त्याच्या साह्याने मी गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालो.

*जैसा मार्गेची चालता।*
*अपावो न पवे सर्वथा ।*
*का दीपाधारे वर्तता। नाडळीजे।*
अर्थः- ज्याप्रमाणे सरळ मार्गाने चालले असता कधीही अपाय पोहोचत नाही. किंवा दिव्याच्या उजेडात चालले असता अडखळत नाही. त्याप्रमाणे स्वधर्माने सर्व इच्छा पूर्ण होतात.

*जैसी दीपकळिका धाकुटी ।*
*परी बहु तेजाते प्रगटी ।*
*तैसी सद्बुद्धी हे थेकुटी। म्हणो नये।*
अर्थ:- ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहानच असते तरीपण सर्वत्र प्रकाश पाडते त्याप्रमाणे ही सुबुद्धी अल्प जरी असली तरी तिला लहान समजू नये.

*जैसा निर्वातीचा दीपु ।*
*सर्वथा नेणे कंपु ।*
*तैसा स्थिरबुध्दी स्वस्वरुपु । योगयुक्तु।*
अर्थ:- ज्याप्रमाणे निवाऱ्यातील दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही, ज्याप्रमाणे योगमुक्त म्हणजे जो स्थिरबुध्दी आहे तो आत्मस्वरुप समाधीमध्ये निश्चलपणे रत असतो.

*मी अविवेकाची काजळी ।*
*फेडूनि विवेकदीप उजळी।*
*ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर।*
अर्थ:- विवेकदीपास आलेली अविवकेरुप काजळी झाडून तो विचाररुप दिवा प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना निरंतर (पुढती अस्तवेना असा अद्वैतरुप) आनंदमय दिवाळीचा दिवस उगवतो.

*ऐसे सर्वज्ञानाचा बापु।*
*जो कृष्णु ज्ञानदीपु।*
*तो म्हणतसे सकृपु। ऐक राया ।*
अर्थ:- संजय म्हणतो राजा धृतराष्ट्र ऐक, ज्ञानीजनांचे जनक जे केवळ ज्ञानदीपच जे असे भगवान श्रीकृष्ण ते अशा रीतीने मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले.

*जैसी पूर्वदिशेच्या राऊळी ।*
*उदया येताचि सूर्यदिवाळी।*
*की येरीहि दिशा तियेची काळी। काळिमा नाही।*
अर्थ:- पूर्वदिशेच्या घरी सूर्य उगवताच प्रकाशाचा -दिवाळीचा सण सुरु होतो. त्यामुळे त्याच वेळेस इतर दिशांचाही अंधार नाहिसा होतो. त्याप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणवृत्तीत जीवब्रम्हैक्य ज्ञानाचा उदय झाला पण त्याची परिणती मात्र सर्व जगत् ब्रम्हरुप आहे अशा अपार बोधसागरात होतेे.

*परि तो रसातिशयो मुकुळी ।*मग ग्रंथार्थ दीपु जवळी।*
*करी साधुहृदय राऊळी । मंगल उखा ।*
अर्थ:- परंतु तो रसालंकारयुक्त विस्तार आटोपता घे, आणि गीताग्रंथाचा अर्थरुपी दीप प्रज्वलित कर व साधुजनांच्या हृदयरुपी मंदिरात मंगलदायक (अद्वैत दिवसाचा) उषःकाल कर.

*ते बुध्दीही आकळिता साकडे ।*
*म्हणोनि बोली विपाये सापडे।*
*परि निवृत्तिकृपादीप उजियडे । देखैन मी।*
अर्थ:- ते बोलणे बुध्दिलाही आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दामध्ये कदाचित ते व्यक्त होईल. परंतु श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या कृपारुप दीपाच्या उजेडाने मी पाहीन व सांगेन.

*दीपा आणि प्रकाशा ।*
*एकवंकीचा पाडु जैसा।*
*तो माझ्या ठायी तैसा। मी तयामाजी।*
अर्थ:- ज्याप्रमाणे दिवा आणि त्याचा प्रकाश यांच्यात एकत्व असते, त्याप्रमाणे तो माझ्याठिकाणी व मी त्याच्याठिकाणी ऐक्यतेने आहोत.

*जो सर्वज्ञतेचा वोलावा।*
*जो यादव कुळीचा कुळदीवा।*
*तो कृष्णजी पांडवा । प्रती बोलिला।*
अर्थ:- तो सर्वज्ञतेचा जिव्हाळा व यादवकुळाचा कुलदिपक असा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाला असे बोलला.

*जैसा दीपु ठेविला परिवरी।*
*कवणाते नियमी ना निवारी।*
*आणि कवण कवणिये व्यापारी। राहाटे तेहि नेणे।*
अर्थ:- ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा कोणास अमूक एक काम कर असा नियम घालून देत नाही किंवा कोणी काही करीत असल्यास ते करु नको असे म्हणत नाही. आणि कोण काय व्यापार करण्यास प्रवृत्त आहे हेहि जाणत नाही.

*जैसा दीपे दीपु लाविजे।*
*तेथ आदील कोण हे नोळखिजे।*
*तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मीचि होऊनी ठाके।*
अर्थ:- ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो सर्वभावांनी मला भजतो तो मद्रूपच होऊन राहतो.

*तया तत्वज्ञा चोखटा।*
*दिवी पोतासाची सुभटा।*
*मग मीचि होऊनी दिवटा। पुढा पुढा चाले।*
अर्थ:- अर्जुना! त्या शुद्ध आत्मज्ञानी भक्ताकरिता ज्ञानरुपी कापराची ज्योत पाजळून मशालजी बनून त्याच्या पुढे पुढे मीच चालतो.

*ती अक्षरे नव्हती देखा।*
*ब्रम्हसाम्राज्य दिपिका।*
*अर्जुनालागी चित्कळिका।* *उजळलिया कृष्णे।*
अर्थ:- माऊली म्हणतात, तुला दिव्य दृष्टी देतो ही अक्षरे नसून ब्रम्हसाम्राज्यास, ऐश्वर्यास आत्मतत्वाने दाखविण्याऱ्या ज्ञानरुपी ज्योतीच श्रीकृष्णाने अर्जुनासाठी लावल्या असे समज.

*का घरीचिया उजीयेडू करावा।*
*पारखिया अंधारु पाडावा।*
*हे नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा।*
अर्थ:- अर्जुना! आपल्या घरच्या लोकांना तेवढा उजेड पाडावा व परक्यांना मात्र अंधार पाडावा, हे ज्याप्रमाणे दिवा जाणतच नाही.

*का स्नेहसूत्रवन्ही।*
*मेळू एकिचि स्थानी।*
*धरिजे तो जनी। दीपु होय।*
अर्थ:- अथवा तेल, वात व अग्नि यांचा संयोग करुन एकत्र ठेवणे म्हणजे तोच दिवा होय. असे लोकांत म्हणतात.

*नातरी केळी कापूर जाहला।*
*जेवी परिमळे जाणो आला।*
*कीं भिंगारी दीपु ठेविला। बाहेरि फाके ।*
अर्थ:- अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासावरुन ओळखता येतो किंवा भिंगात तावदानात ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश ज्याप्रमाणे बाहेर सभोवार पसरतो.

*काळ शुध्दी त्रिकाळी।*
*जीवदशाधूप जाळी।*
*ज्ञानदीपे वोवाळी । निरंतर।*
अर्थ:- उत्तम, पवित्र वेळ हेच शिवाच्या पूजेचे तिन्हीकाळ असे मानून त्यात जीवपणारुपी धूप जाळतो व ज्ञानरुप दिव्याने जो गुरुरुपी श्रीशंकरास निरंतर ओवाळतो.

*श्रीगुरु वोवाळिजती।*
*का भुवनी जे उजळिजती ।*
*तया दीपाचिया दीप्ती। ठेवीन तेज।*
अर्थ:- आपल्या देहातील तेज त्या दिव्यातील तेजात नेवून मिळवीन की, ज्या दिव्यांनी लोक श्रीगुरुंना ओवाळतील अथवा जे दिवे श्रीगुरुंच्या मंदिरात प्रकाश करीत असतील.

*म्हणोनि सद्भाव जीवगत।*
*बहेरी दिसती फाकत।*
*जे स्पटिकगृहीचे डोलत। दीप जैसे।*
अर्थ:- म्हणून अंतर्यामी शुध्द मनोवृत्ती झाली म्हणजे बाह्य इंद्रिय व्यापाराद्वारा ती तशीच प्रकट झालेली दिसून येते. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरांत लावलेले दिवे व त्यांच्या प्रकाश ज्योती आतल्याप्रमाणे बाहेरही लखलखीत रुपाने हालताना दिसतात.

*उदक होवूनी उदकी।*
*रसु जैसा अवलोकी।*
*दीपपणे दीपकी । तेज जैसे ।*
अर्थ:- हे बघ, रस ज्याप्रमाणे उदकामध्ये उदकरुप होवून राहतो, तेज ज्याप्रमाणे दीपामध्ये दीपपणाने राहात असते.

*दीपाचिये कोंडी जैसे ।*
*एकचि तेज सरिसे ।*
*तैसा जो असतुचि असे। सर्वत्र ईशू।*
अर्थः- पुश्कळ दिवे जरी असले तरी त्या सर्वांचे तेज एकच असते. त्याप्रमाणे पूर्वीपासून (अनादि अनंत असा) जो परमात्मा तो सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे.

*दीपकाची अर्ची ।*
*रहाटी वाहे घरीची।*
*परी वेगळीक कोडीची। दीपा आणि घरा।*

अर्थ:- दीपज्योती आपल्या उजेडाने घरातील सर्व व्यवहार चालवित असते. परंतु दिवा आणि घर यात वास्तविक दृष्ट्या अंतर आहे.

*नातरी दीपमूळकी।*
*दीपाशिखा अनेकी।*
*मीनलिया अवलोकी। होय जैसे।*
अर्थ:- किंवा मूळच्या दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ दिव्यांच्या ज्योती एकत्र केल्या म्हणजे त्याचे तेज त्या मूळ दिव्यातच मिळते असे समज.

*नातरी येथिचा दिवा।*
*नेलिया सेजिया गावा।*
*तो तेथे तरी पांडवा। दीपची की।
अर्थ:- किंवा बाबारे ! एका गावातील दिवा शेजारच्या गावास नेला असता तेथेही त्या दिव्याचा उजेड व दिवा जसा सारखाच दिवाच असतो.

*पै होऊनि दीपकलिका।*
*येरु आगी विझो का।*
*जेथ लागे तेच असका। तोचि आहे।*
अर्थ:- अग्नीमुळे दिव्याची ज्योत पेटल्यावर तो पहिला अग्नी जरी विझला तरी काही हरकत नाही. कारण तो ज्याठिकाणी लागला असेल त्याठिकाणी अग्निरुपाने तो पूर्वीचाच सगळा असतो.

*जैसा भिंगाचेनि घरे ।*
*दिपप्रकाशु नावरे।*
*का न विझेचि सागरे। वडवानळु।*
अर्थ:- ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला असता त्याचा उजेड आवरत नाही, बाहेर येतोच अथवा वडवानळ नावाचा अग्नि हा समुद्राच्या पाण्यातही विझला जात नाही.

*सूर्ये अधिष्ठिली प्राची।*
*जगा राणीव दे प्रकाशाची ।*
*तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।*
अर्थ:- तसेच सूर्याने पूर्व दिशेचा अंगिकार केला म्हणजे तो सर्व जगाला प्रकाशाची राज्यसंपन्नता देतो. त्याप्रमाणे त्याची वाणी (उपासकाची) त्याच्या तोंडून निघणाऱ्या भाषणद्वारा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते.

*तया चक्रवाकांचे मिथुन ।*
*सामरस्याचे समाधान।*
*भोगवी जे चिद्गगन। भुवनदिवा।*
अर्थ:- त्या बुध्दी व बोधरुपी चक्रवाक पक्ष्यांचे जोडप्याला चिदाकाश रुपी भुवनातील ह्या श्रीगुरु रुपी सूर्याेदयाच्या प्रकाश ज्योतीमुळे एकत्र मिळवून ऐक्याचे समाधान भोगवितो.

*नातरी ठेविले देखावया।*
*आदर कीजे दिविया।*
*का शाखा फळे यावया। सिंपिजे मूळ।*
अर्थ:- किंवा अंधारात ठेवलेली वस्तु दृष्टीस पडावी म्हणून जसा हातात दिवा घ्यावा लागतो अथवा झाडाला फांद्या व फळे यावीत म्हणून जसा कोणी झाडाच्या मूळाला पाणी घालतो.

*की सव्विसे गुणज्योती ।*
*इही उजळून आरती ।*
*गीता आत्मया निजपती । निरांजना आली ।*
अर्थ:- किंवा या सव्वीस गुणरुपी वाती लावून जणु काय गीता ही आपला पति जो आत्मा या पतीस ओवाळण्याकरिता आरती घेवून आली आहे.

*आता रिता कुंभ समुद्री रिगे ।*
*तो उचंबळत भरोनि निगे।*
*कां दशी दीपसंगे । दीपुचि होय ।*
अर्थ:- आता हे पहा ! रिकाम्या घागरीने समुद्रात प्रवेश केला असता ती जशी पाण्याने भरुन निघते किंवा वात दिव्याच्या संसर्गाने दीपस्वरुपच होते.

*पै एक दीपु लावी सायासे ।*
*आणिक तेथे लाऊ बैसे ।*
*तरी तो काय प्रकाशे । वंचिजे गा ।*
अर्थ:- एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने पहिल्यांदा दिवा लावतो आणि त्या दिव्यावरुन जर दुसरा कोणी आपला दिवा लावू लागला तर आयता दिवा लावणारा मनुष्य पहिल्या दिव्याच्या प्रकाशा कडून फसविला जाईल काय?
त्यांच्या घरी तो दिवा कमी प्रकाश पाडणार नाही.

*आंधारी अभंगु दिवा।*
*आवडी समर्थु बोळावा।*
*तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभी ।*
अर्थ:- मग अंधारात केव्हाही न विझणारा दिवा असावा त्याप्रमाणे अथवा अरण्यातून सोबत पोहोचविण्यासाठी बलवान सोबती असावा त्याप्रमाणे कर्मारंभीचा प्रणवोच्चार समजावा. कर्मारंभीचा ओंकार विनियोग केला असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडते.

*जयजय देवैकरुप।*
*अतिकृतकंदर्प सर्पदर्प ।*
*भक्तभाव भुवनदीप । तापातह ।*
अर्थ:- हे अविकार, एकच रुप असणाऱ्या देवा ! कामरुपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणाऱ्या वा भाविक भक्तांचे श्रध्दापूर्ण हृदयरुपी मंदिरातील दीपा! संसारतापाचा बाध (नाश) करणाऱ्या श्रीगुरुदेवा ! तुमचा जयजयकार असो.

*का नापादिता गती ।*
*चरणी जैसी आथी ।*
*नातरी ते दीप्ती । दीप बींबी।*
अर्थ:- अथवा गति अन्यत्र कोठून संपादन – स्वीकार न करता ती जशी आपोआपच पायात स्वाभाविक आहे. किंवा दिव्याच्या ज्योतीचे ठिकाणीच तिचा प्रकाश स्वाभाविक आहे.

*तेविचि वन्हित्व अंगी।*
*आणि उबे उबगणे आगी।*
*की तो दीपु प्रभेलागी। द्वेषु करील काई।*
अर्थ:- अग्नीच्या अंगी अग्नित्व असून तो उष्णतेला कसा बरे कंटाळेल? किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील काय?

*तैसे मन हेतु पांडवा।*
*होय कर्मसंकल्पभावा।*
*तो संकल्पु लावी दिवा। वाचेचा गा।*
अर्थ:- अर्जुना ! मन हे कर्म विषयीचा संकल्प होण्यास कारण आहे आणि तोच कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो म्हणजे वाचेने बोलण्याच्या रुपाने बाहेर पडतो.

*जे मुक्ताते निर्धारिता।*
*लाभे आपलीच मुक्तता।*
*जैसी दीपे दिसे पहाता। आपली वस्तु।*
अर्थ:- जसे आपली वस्तु अंधारात दिव्याच्या साह्याने पाहिली तर ती आपल्याला दिसते. तसेच मुक्ताच्या स्वरुपाविशयी विचार करु लागले असता आपलीच स्वाभाविक नित्यासिध्द असणारी मुक्तता आपल्यास प्राप्त होते.

*मग आपुले ठेविले जैसे ।*
*आइतेचि दीपे दिसे।*
*गुणभिन्न कर्म तैसे । शास्त्र दावी।*
अर्थ:- मग आपली ठेवलेली वस्तु जशी दिव्याच्या उजेडाने सहजच दिसते तसे गुणांनी वेगवेगळे झालेले कर्म शास्त्र स्पष्टपणे दाखविते.

*मग घरीचाचि ठेवा।*
*जेवी डोळया दावी दिवा ।*
*तरी घेता काय पांडवा। आडळु असे।*
अर्थ:- अर्जुना ! दिवा जसा आपल्या घरात आलेलाच ठेवा आपल्या डोळयास दाखवितो तेव्हा तो घेण्याविशयी काही प्रतिबंध असतो काय?

*जेणे जग हे समस्त ।*
*आत बाहेरी पूर्ण भरित।*
*जाले आहे दीपजात। तेजे जैसे।*
अर्थ:- दिवा जसा एकमेव तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो तसे त्या परमात्म्यानेच हे सर्व जग अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे.

*उदयताचि दिनकरु।*
*प्रकाशुचि आते अंधारु ।*
*कां दीपसंगे कापुरु। दीपुचि होय।*
अर्थ:- सूर्य उगवताक्षणी जसा अंधःकाराचा प्रकाशच होतो. किंवा दिव्याच्या संगतीने ज्योतीस कापूर लागताच तो दिवाच होेतो.

*तैसा वैराग्याचा वोलावा।*
*विवेकाचा तो दिवा।*
*काढीची तो ।*
अर्थ:- त्याप्रमाणे तो साधक वैराग्यरुपी तेल भरण-आश्रय मिळाला असता विवेकरुप दीप प्रज्वलित होतो. त्याच्या प्रकाशाने आत्मरुपी ठेवा तो क्रमाक्रमाने काढतोच.

*पहावे दिसे तववरी।*
*विठीते न संडी दीप जरी।*
*तरी के आहे अवसरी। देखावया*
अर्थ:- आपल्याला जी वस्तु पहावयाची आहे ती दिसेपर्यंत जर दिव्याने डोळयांची सोबत सोडली नाही तर मग ती वस्तु दिसण्यास किती बरे उशीर लागणार?

*दीपातें दीपे प्रकाशीजे।*
*ते न प्रकाशणेचि निपजे।*
*तैसे कर्म मिया किजे। ते करणे कैचे।*
अर्थ:- दिव्याने दिव्याला प्रकाशिले असता ते प्रकाशन न करणेच होय. त्याप्रमाणे मद्रूप होवून कर्म करणे, ते कर्म करणे कसे होईल?

*दीपें दीप लाविला।*
*तैसा परिश्वंगु तो जाला।*
*द्वैत न मोडिता केला। आपणपे पार्थु।*
अर्थ:- एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता जसे दिव्याचे प्रतीतीमात्र द्वैत कायम राहून प्रकाश दृष्ट्या ऐक्य मोडत नाही. तसाच प्रकार या अलिंगनाचा होवून द्वैत न मोडता देवाने पार्थाला आपले स्वरुपी मिळवून घेतले.

*कां दीपासन्मुखु।*
*ठेविलया दीपकु।*
*कोण कोणा अर्थिकु। कोण जाणे।*
अर्थ:- अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणता प्रकाशक व कोणता प्रकाश्य आहे हे कोण जाणावे?

*कां घरा आतुल एकु।*
*दीपांचा तो अवलोकु।*
*गवाक्षभेदे अनेकु। आवडे जेवी।*
अर्थ:- अथवा घरात असलेल्या एकाच दिव्याचा प्रकाश वेगवेगळया झरोक्यातून पाहिला असता जसे त्याचे अनेक दीपप्रकाश आहेत असे वाटते.

*येथ गुरुत्वा येतसे उणे।*
*ऐसे झणे कोण्ही म्हणे।*
*वन्हि प्रकाश दीपपणे। प्रकाशी आपला।*
अर्थ:- या उदाहरणाने गुरुत्वाला उणेपणा येतो असे कदाचित कोणी म्हणेल तर म्हणू नये कारण अग्नी आपलाच प्रकाश दिव्याच्या रुपाने प्रकाशित करतो म्हणून दीपाची प्रशंसा केल्यास ती अग्नीचीच होते.

*दीपा आगिलु मागिलु।*
*सूर्यु धाकटा वडिलु ।*
*अमृतसिंधु खोलु। उथळु कायसा।*
अर्थ:- दिव्यामध्ये अगोदरचा व मागचा असा भेद कसला! व सूर्याकडे पाहिले असता धाकटा किंवा वडिल कोणता? हे समजत नाही. आणि अमृृत समुद्राला खोल किंवा उथळ असा भेद कसला? कारण सगळयाची फळे एकच आहेत.

*प्रकाशाच्या या पवित्र उत्सवात आयुष्यात नवनवीन यशाची श्रीमंती,आनंदाची समृद्धी आणि सुखाचे वैभव लाभो.*
*तुमच्या जीवनात नेहमीच आनंदाची रोषणाई फुलत राहो,आणि प्रत्येक क्षण आनंदाने उजळून निघो.*
दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

*शुभेच्छुक : – एन एम तिप्पलवाड (एन टी सर बरबडेकर)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *