नांदेड, दि. 17 –
आजचे युग स्पर्धेचे आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा करावी लागते. पण याच स्पर्धेतून गुणवत्ता सिद्ध करण्याची स्पर्धकांना संधी मिळते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुसुम महोत्सवांतर्गत फेबु्रवारी महिन्यात जिल्हास्तरीय शालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी कुसुम सभागृहात उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी विजेत्यांचा पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाला पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह आ. बालाजीराव कल्याणकर, आ. माधवराव जवळगावकर , आ. रावसाहेब अंतापूरकर, आ. मोहन अण्णा हंबर्डे, आ. शामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षाताई धबाले, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, महिला व बाल विकास कल्याण समितीच्या सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, मनपातील सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले , माजी आ. हनुमंत पाटील बेटमोगरेकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना ना. चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. पण त्यांना व्यासपीठ मिळत नव्हते. कुसुम महोत्सवाच्या माध्यमातून ते व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यात नेत्यांची टीम घडवली. त्यांची हीच प्रेरणा घेवून गुणवंत व कलावंतांसाठी कुसुम महोत्सवाच्या माध्यमातून एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
खा. हेमंत पाटील विकासाभिमूख नेताप्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते. चांगल्याला चांगलेच म्हणावे, विधायक कामांचे नेहमी स्वागतच केले पाहिजे. खा. हेमंत पाटील यांचे कार्यही कौतुकास्पद आहे. खा. पाटील यांनी परभणी-सिकंदराबाद ही नवीन रेल्वे सुरु करून मराठवाड्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर केली आहे. मराठवाडयाच्या विकासासाठी झटणारा लोकप्रतिनिधी म्हणून खा. हेमंत पाटील यांच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाबाबत बोलतांना ना. चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. पण त्यामुळे संसर्गावर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे. मी पालकमंत्री आहे. तसाच कुटुंब प्रमुखही आहे. त्यामुळे मला आपली काळजी आहेच. त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, मी काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वासही ना. चव्हाण यांनी दिला. जिल्ह्यातील रुणसेवा अधिक चांगली करण्यासाठी पॅरॉमेडीकल स्टॉफ उपलब्ध करणार आहे. त्यासाठी नर्सींग कॉलेज सुरु करायचे आहे. तसेच नवीन अद्ययावत असे भव्य दिव्य नागरी दवाखाना (सिव्हील हॉस्पीटल) सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही ना. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
मराठवाड्याचे वाळवंट झाले असते-आ. शिंदेजलनेते डॉ. शंकरराव चव्हाण यांनी तत्कालीन विरोध पत्करून जायकवाडी धरण बांधले नसते तर औरंगाबादसह, जालना, परभणी जिल्ह्यातील प्रमुख शहरांचे वाळवंटात रूपांतर झाले असते. मराठवाड्याचा टँकरवाडा झाला असता, असे सांगून आ. श्यामसुंदर शिंदे म्हणाले की, डॉ. शंकररावांनी राजकारणही सकारात्मकपणे केले. शिवराज पाटील चाकूरकर, गणेशराव दुधगावकर, विलासराव देशमुख, सुरेश वरपूडकर यांच्या सारख्या दमदार नेत्यांची टीम नव्या पिढीला दिली. केवळ महाराष्ट्रा पुरतेच डॉ. शंकरराव चव्हाण यांचे कार्य मर्यादित नव्हते, तर चिघळलेला पंजाबचा प्रश्न त्यांनी शांततेच्या मार्गाने सोडवला. कडक शिस्तीचे भोक्ते असलेले डॉ. शंकरराव चव्हाण हे एक पारदर्शी व प्रामाणिकपणाचे मुर्तीमंत उदाहरण आहेत, असेही आ. श्यामसुंदर शिंदे म्हणाले. मराठवाडा विकास मंडळ सुरु करण्याची मागणी करतांना गरज पडल्यास मराठवाडयातील सर्वपक्षीय आमदार आपल्या पाठिशी उभे करू, असेही आ. शिंदे म्हणाले.
मुलांच्या सुप्त गुणांना व्यक्त होण्यासाठी कुसुम महोत्सव हे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगून आ. मोहनअण्णा हंबर्डे म्हणाले की, अशा स्पर्धा नियमीत होण्याची गरज आहे. त्यातून गुणवंतांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. आ.बालाजीराव कल्याणकर यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यामुळे नांदेडला आजवर पाणीटंचाईचा समाना करावा लागलेला नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारच्या वतीने वर्षभर नांदेडसह राज्यात विविध उपक्रम घेण्यात आले. त्यांचे राजकारणात व समाजकारणात मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या या कार्याची प्रेरणा घेवूनच आपण वाटचाल करीत आहोत.
प्रारंभी काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी प्रास्ताविकातून कुसुम महोत्सवातील विविध उपक्रमांची माहिती दिली. 15 हजार स्पर्धकातून केवळ 52 स्पर्धक पारदर्शीपणे निवडलेल्या मुख्य परिक्षक तथा ज्येष्ठ रंगकर्मी जगदीश जोगदंड (परभणी) यांचे त्यांनी कौतूक केले. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला कसलेही गालबोट लागले नाही, याबद्दल आ. राजूरकर यांनी समाधान व्यक्त केले. मिडीया पार्टनर लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कारकिर्दीचा अगदी मोजक्याच शब्दात मोठा गौरव केला. देशाच्या विकासात डॉ. शंकरराव चव्हाण यांचे योगदान मोठे आहे. नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत आपल्या कर्तृत्वाने पोहचणारे डॉ. शंकरराव चव्हाण यांचे कार्य पुढच्या पिढीला नेहमीच प्रेरणार देणारे राहील, असेही सोनटक्के म्हणाले.
दुसरे मिडीया पार्टनर दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुसुम महोत्सवांतर्गत वर्षभर खाद्य महोत्सव, विविध मान्यवरांच्या मुलाखती, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आदी उपक्रम घेतल्याचे सांगितले. सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांमधून कलाध्यापक संघाच्या 15 परिक्षकांनी केवळ 52 स्पर्धक निवडले. स्पर्धकांची स्पर्धा घेण्यासाठी योगदान दिलेल्या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, कलाध्यापक संघ, शिक्षक -पालकांचे त्यांनी आभार मानले. मान्यवरांच्या सत्कार, स्वागतानंतर इयत्ता दहावीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळविणार्या सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या स्नेहल मारुती कांबळे या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला. तसेच विजेत्या स्पर्धकांची निवड करणारे मुख्य परिक्षक जगदीश जोगदंड, समन्यवक कैलाश राखेवार, सुरेश जलदावार, अनिल कुमठेकर, चंद्रकांत नागठाणे, सुनील कोमवाड, संजय बावस्कर, विलास धोंगडे, शे. जाकीर शे. अहमद, प्रकाश देशमुख, शे. एजाज शे. बाबू, सदाशिव गायकवाड, निळकंठ कंधारे, सुभाष जगताप, संजय माहूूरकर तसेच चित्रकल व रंगभरण स्पर्धा आयोजनात योगदान देणारे शिक्षणाधिकारी (निरंतर) दिलीप बनसोडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (मा.) बी. आर. कुंडगीर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत कार्यक्रमाला पालकांनी शिस्तीत उपस्थिती लावली होती. कार्यक्रमासाठी नगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.