गेले दोनेक दिवस आपल्या कडे अगदी गबरू थंडी पडली आहे. म्हणजे दुपारच्या भरगच्च उन्हातही बोचरे गारे वारे अंगापिंडाला टोचत आहेत.
या रविवारी सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे ऊठून मॉर्निंग वॉकला गेले. कपडे तेच आपले हलकेफुलके कारण स्वेटर वा तत्सम जाडजूड कपडे केव्हाचेच थंडीच्या नावाखाली डांबली जात आहे.म्हणूनच ही कपडे लाईफस्टाईलमधून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यावर जेव्हा गाठल्यासारखे वाटले. तेव्हा, हिवाळा ऋतू साजरा होऊ लागला आहे. बागेत गेल्यावर मास्क काढावा हा शिरस्ता पाळत तो काढला, पण न काढता कानावर चढवला. आणि त्या जागी हाताची घडी टाकली. पण तरीही नारळ पाणीवाला दिसताच सवयीने ते प्राशन करायला हाताची घडी बाहेर काढली. घरी परतताना आईसक्रीमचाही एक राऊंड झाला. त्यानंतर मग व्हायचे तेच झाले…
सकाळी कानातून चोरमार्गाने शिरलेली थंडी रात्र होता होता नाकातून बाहेर पडू लागली. म्हणून सोमवारी कसलाही आगाऊपणा न करता खास थंडीचा लुत्फ उचलायला म्हणून सुट्टी टाकली. पण सकाळचा गरमागरम कांदे पोह्यांचा नाश्ता झाल्यावर पुढे काय करायचा हा प्रश्न पडला. पावसाळ्यात चहा – कांदाभजी – चहा – समोसे – चहा – बटाटाभजी – चहा थालीपीठ – चहा यांव आणि त्यांव असे राऊंड घेता येतात. पण थंडीचे सुट्टी टाकून करतात काय हा प्रश्नच पडला. मग दुपारी मस्तपैकी दारे खिडक्या पडदे फॅन लाईट वगैरे सारे काही बंद करून मस्त चादर ओढून ताणून झोप काढली.
थोडावेळ छान झोप लागली. पण त्यानंतर चादरीतही थंडी शिरू लागली. मग पाय जवळ ओढून घेतले. चादर गच्च लपेटून घेतली. पण तरीही जेव्हा असाह्य झाले. तेव्हा ताडकन ऊठले आणि पाहते तर काय… बाहेर अजून ही गारवा व थोडे अंधुक धुके होते. मग काय बिचार्या थंडीचा हा सीजन आता नवीनच वाटायला लागला. माझी थंडी मात्र रात्र होत आली तरी जायचे नाव घेत नव्हती.
उलट रात्री पुन्हा गारठू लागले तसे मग वेळ घालवायला भूतकाळातल्या थंडीच्याच आठवणी काढून गरम होऊया म्हटले. यही मौका है, यही दस्तूर है, क्या पता, कल हो ना हो… म्हणतं आठवणींच्या थंडीत शिरले…
थंडी म्हटलं की मला सर्वात पहिले मला आमच्या चाळीतील पेटवली जाणारी शेकोटी आठवते. आहाहा, छोटीशी होळीच म्हणा ना.. ते कॅम्पफायर वगैरे ईंग्लिश शब्द मला फार उशीरा कळले. जेव्हा कळले तेव्हाही डोक्यात हेच पहिलं आले, अरे ही तर आमची शेकोटी…
म्हणजे नारळाच्या सुक्या करवंट्या, ज्या तेव्हा चाळीतील दर दुसर्या घरात सापडायच्या. अगदी आमच्या दारातही एक ड्रम भरून असायच्या. सोबत जमेल तसा लाकूडफाटा, जसे की आब्याच्या पेट्यांची फळकुटे वगैरे,. एक मोठठाला परातीईतका तवा, त्यात हा सारा लाकडी ऐवज जमा करायचा. आणि रॉकेल टाकून पेटवून द्यायचा. तेव्हा स्टोव्हच्या जमान्यात रॉकेलही प्रत्येक घरात सापडायचे. फार नाही, कपभर पुरायचे. दररोज हा कप आळीपाळीने एकेका घरातून यायचा. जेवणखान झाले की साधारण दहा-साडेदहाला शेकोटी पेटायची ते रात्री एकदिडलाच विझायची. तोपर्यंत आमच्यासारखे रातकिडे अखेरपर्यंत तिला सोबत द्यायचे. कधी मूड आला तर गाणीही व्हायची. पण खरी धम्माल शेकोटीवरील गप्पांची. आणि चाळीसारख्या जागी गप्पांच्या विषयाला कमी कधीच नसायची.
याच थंडीच्या सीजनमध्ये मग नाताळही यायचा. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागतासाठीची तयारीसाठी मग त्यावर चर्चा,खर्च्या असे खुप विषय निघायचे
अगदी साग्रसंगीत फटाक्यांसह हा कार्यक्रम पार पडायचा…असे नियोजन ही आखले जायचे…
शेकोटी विझत आली की मग अजून ती पेटवण्यासाठी लागणारे सुके गवत भाजीमार्केटमध्ये मुबलक आणि फुकटात मिळायचे. किंवा रस्त्यात पडलेले असायचे. गोणी गोणी भरून आणायचो. बरेचदा गोठ्यातील वाळलेला गवत जाळले जायचे. असा हा शेकोटी, नाताळ, थंडीचा सण जवळपास किमान महिनाभर तरी साजरा व्हायचा. आजकालच्या नव्या पिढीचा यावर विश्वास बसणे अवघडच.
मग मोठे होता होता ती थंडी हरवलीच. नाही म्हणायला कधीतरी जगाच्या पाठीवर बर्फ पडला तर वाहत्या वार्यांसोबत एखादी थंडीची लाट सर्वत्रच अवतरते.
बालपणीच्या थंडीच्या आता आठवणीच उरल्या आहेत. तुमच्याही असतील तर उगाळा याच धाग्यावर. तेवढेच त्या आठवणींच्या शेकोटीची ऊब…रूचिरा बेटकर नांदेड
9970774211