नांदेड :- देगलूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात 23 नोव्हेंबर 2024 रोजी चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच पेडपल्ली या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, तात्काळ प्रतिबंधात्मक व उपचारात्मक प्रभावी काम कसे करायचे, या बाबतीत आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
तसेच प्रतिबंधासाठी मरखेलचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. योगिता चामले, आरोग्य सहाय्यक डी. एल. कुलकर्णी, आरोग्य सेवक ए.एस. खांडरे, आरोग्य सेविका श्रीमती येदगिवार या वैद्यकीय पथकाद्वारे गावात रुग्णांवर उपचार केला जात आहे. चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. तो विशेषतः एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस प्रजातींद्वारे पसरतो. हे डास जेव्हा विषाणूने आधीच संक्रमित व्यक्तीला चावतात तेव्हा ते संक्रमित होतात. विषाणू प्राप्त केल्यानंतर, डास त्यांच्या चाव्याव्दारे इतर मानवांमध्ये पसरवू शकतात.
चिकुनगुनियाची लक्षणे साधारणपणे संक्रमित डास चावल्यानंतर 4 ते 8 दिवसांनी सुरू होतात. सामान्य लक्षणांमध्ये अनेकदा अचानक आणि 102°F (39°C) पर्यंत पोहोचू शकते. सांध्यामध्ये तीव्र वेदना, विशेषत: हात आणि पाय जे अनेक दिवस टिकू शकतात. सामान्यत: स्नायूत वेदना होतात. सौम्य ते गंभीर डोकेदुखी अत्यंत थकवा आढळून येतो.
चिकनगुनियासाठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडीची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना केल्या जात असून, चिकुनगुनियाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घर परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. दर आठवड्यास शनिवारी कोरडा दिवस पाळावा. घर परिसरात फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादीची वेळीच सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. पाण्याचे साठे झाकणाने घट्ट झाकून ठेवावेत. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा बांधावा. तसेच ग्रामपंचायतीने गावातील पाणी साचणारे खड्डे बुजवून घ्यावेत. तुंबलेली नाली व गटारी वाहत्या कराव्यात. चिकुनगुनियाची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख यांनी केले.
#नांदेड