आज सकाळी फिरायला गेले होते तेव्हा माझ्यापासून 500 मिटर पुढे एक महिला गतीने चालत होती, बहुदा रोज नियमाने चालत असणार. निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या महिलेची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चालले तर नक्की त्या महिलेस ओलांडून मी पुढे जाईन असे वाटले.
मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागले. मला अजून १ मैल चालायचे होते आणि घराकडे परत फिरायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्या महिलेला नक्कीच पार करू याची खात्री मला होती. थोड्याच वेळात लक्षात आले की दोघींमधील अंतर कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागले. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती पाहून.
आणि तो क्षण आला, मी त्या महिलेला पार केले, मागे टाकले..!
हुर्र्ये.. हुर्र्ये.. हुर्र्ये..
मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा….! स्पर्धा..? याबद्दल त्या महिलेला तर काहीच माहीत नव्हते, ती या स्पर्धेचा भाग ही नव्हती. मात्र जिंकण्याच्या ओढीने मी माझा रस्ता सोडून पुढे निघून गेले होते, जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते, अचानक चिडचिड होवू लागली, अस्वस्थता आली. उलट जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता.
असेच होते ना आयुष्यात सुद्धा..? सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते; सहकारी ? शेजारी..? मित्र? नातेवाईक?, यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते. मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते. या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.” ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.
कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हे ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व आपण सुख गमावून बसतो.
कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की; कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच; कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार; कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच; कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच; कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच…
तेव्हा लक्ष आपल्यावर, आपल्या ध्येयावरच केंद्रित असुद्या. आपली गती आपल्या कालच्या गतीपेक्षा कशी आहे..? हे पाहा. आहे ते कसे उपभोगता येईल हे पाहा. आणि आनंदी रहा !
आपली स्पर्धा कालच्या आपल्याशीच आहे, काल आपण जसे होते त्यापेक्षा आज अधिक उत्तम असेल तर आपली स्पर्धा योग्य आहे. नाहीतर आपलं चालणं हे चालणं नसून एक सुप्त स्पर्धा असेल आपल्याही न समजणारी चाल असेल.
बाकी आयुष्य सुंदर आहेच; चालून आणखी सुंदर बनवु यात.रूचिरा बेटकर, नांदेड
9970774211