महिलांची वाटचाल उन्नतीच्या दिशेने

“जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी” असे म्हणतात. खरोखरच महिला या कोमल आहेत. पण कमकुवत नाहीत. याचा प्रत्यय अनेक ठिकाणी सध्या येत आहे. प्राचीन काळामध्ये मैत्री,लोपामुद्रा गाग्री या महिला विद्वान होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेले कार्य अजरामर आहे.त्यानंतर हळूहळू महिलांमध्ये सामाजिक, शैक्षणिक सुधारणा होऊ लागल्या. समाजामध्ये सध्या महिलांना काही प्रमाणात चांगली वागणूक मिळत आहे. महाराष्ट्रामधील रायगड किल्ल्यावरून हिरकणी रात्रीच्या वेळी खाली उतरून आली. तिचे शौर्य आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई,महाराणी येसूबाई यांच्या कार्यातून अनेक महिलांनी आदर्श घेतला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी क्रांती ज्वाला बनवून महिलांचा आदर्श बनल्या. पुढील काळामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे ,ताराबाई शिंदे,आदर्श माता रमाई आंबेडकर या सर्व महिलांनी महिलांमध्ये सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थेची स्थापना करून क्रांतीकारक बदल व परिवर्तन घडून आणले आहेत. या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे,स्वामी विवेकानंद,
लोकहितवादी,सानेगुरूजी,गोपाळ गणेश आगरकर, ईश्वरचंद्र विद्यासागर अशा विचारवंतांनी महिलांना सहकार्य केल्या मुळे पुढील काळात नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.तसेच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची मुंबई येथे स्थापना करण्यात आली. नोकरी करत करत महिलांना शिक्षण घेता यावे म्हणून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली. त्यामुळे महिला या उन्नतीच्या दिशेने आज सर्वत्र जाताना दिसत आहेत. सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, कर्णाम मल्लेश्वरी या चाणाक्ष हुशार तेजस्विनी महिलांचे विचार व कार्य इतर महिलांना प्रेरणादायी आहेत.

म्हणून महिलांचा आज राजकारणा मध्ये सुद्धा चांगला सहभाग वाढलेला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा सदस्य पदी 21 महिला निवडून आल्या आहेत हे उन्नतीच्या दिशेचे टाकलेले पाऊल आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका ,नगरपालिका, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा मध्ये सुध्दा अनेक महिला सदस्य पदी विराजमान झालेल्या आहेत.देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मू असून महिलांची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे. खरोखरच महिला सुशिक्षित झाल्या.त्यांनी आता सामाजिक सुधारणे मध्ये लक्ष घालावे. विवाहित महिलांनी सासू-सासर्‍यांचा आदर करावा. मुलांना शिक्षण द्यावे. तसेच मालिका, चित्रपट, नाटक
,रील्स,वैयक्तिक, सांघिक खेळ हे सर्व करताना नैतिक मूल्याची जपवणूक करावी.आपल्या आदर्श संस्कृतीचे जतन करावे. आपल्या हातून कोणतीही गंभीर चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. संरक्षण खात्यामध्ये मोठमोठ्या उच्चस्थ पदावर काम करणाऱ्या महिलांनी सुद्धा आपआपल्या संस्कृतीची जपवणूक करावी. आणि आपले जीवन कार्य नेटाने पुढे चालू ठेवावे. अनेक महिला शिक्षिका असून त्यांनी ही नैतिकतेची जाणीव ठेवून विद्यार्थी घडवावेत.आपल्या आई-वडिलांना कोणी नाव ठेवणार नाही? याची दक्षता घ्यावी. किंवा समाजामध्ये इतर लोक आपल्याला काही वाईट बोलणार नाहीत याचे भान असू द्यावे. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील महिलांनी कोणत्याही प्रकारची लाच न घेता आपले कर्तव्य नि:स्वार्थीपणे चोखंदळ बजवावे. तसेच आज शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजना महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत.महिलांसाठी शासनाने अनेक कायदे केलेले आहेत.पती पासून विभक्त राहणाऱ्या महिलांना पोटगी दिली जाते. 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 1975 ते 1985 हे महिला दशक म्हणून साजरे झाले. प्रत्येक योजनेचा वापर चांगला करून घ्यावा. आपापल्या संसारासाठी एक एक रुपया महत्त्वाचा आहे.
याची जाणीव प्रत्येक महिलांनी ठेवावी. मिळालेल्या शासनाच्या योजनांचा गैरफायदा न घेता ते वेळेवर हप्ते भरून टाकावेत.सर्व क्षेत्रातील महिला आता खरोखरच प्रगतीपथावर व पुरोगामी विचाराकडे जात आहेत. जात, पात, लिंग, वंश ,धर्म या सर्व गोष्टीची जाणीव त्यांना आता येत आहे.म्हणून सर्वत्र महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. ऑलिंपिकच्या सामन्यांमध्ये सुद्धा काही महिलांनी चांगली कामगिरी बजावली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून अनेक हुशार महिला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपली चांगली ओळख निर्माण केल्या आहेत. व काकडा आरती ,हरी कीर्तन ,भारुडे,पारायण वाचन यामध्ये सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने भजन करीत आहेत.पायलट,चालक,संचालिका, डॉक्टर या क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय कार्य केलेले आहेत.आजपर्यंत लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल अशा अनेक गायिका सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही संस्थानिक पाठीमागे राहिले होते. कोणत्या देशात सामील व्हावे हे त्यांना कळत नव्हते.
त्यावेळेस हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन होण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करीत होते.त्यासाठी दगडाबाई शेळके, ताराबाई परांजपे अशा अनेक महिलांनी हातात शीर घेऊन धाडसी पणाने कार्य करून दाखविले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा डॉ.आनंदीबाई जोशी पासून अनेक वैद्यकीय अधिकारी म्हणून महिला कार्यरत आहेत. जलतरणपटू पासून ते अवकाश यात्री पर्यंत महिलांनी उत्तम कार्य केले आहे. परंतु अलीकडच्या काळात महिला थोड्या अंधश्रद्धाळूही झालेल्या दिसत आहेत. देवदासी प्रथा, वेगवेगळ्या अंधश्रद्धा, मनात भरून किंवा एखादा बुवा, बाबा यांच्या सांगण्यानुसार चुकीच्या पद्धतीने त्यांच्या आहारी जात आहेत. असे न होता सदसदविवेकबुद्धीने आपण एखाद्या गोष्टीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. कोणाचीही आपण शिकार होऊ नये. वेगवेगळ्या विधी करण्यासाठी समाजात महिलांना फसवले जाते. कोणाच्याही आमिषाला बळी न पडता सर्वच्या सर्व महिला सुधारण्याचा प्रयत्न करतील. तेव्हाच महिला उन्नतीच्या दिशेने पुरोगामी विचाराकडे वळल्या असे आपल्याला ठामपणे म्हणता येईल. शूरवीर महिलांच्या कार्याला विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड यांच्या वतीने सलाम.

*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष : विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *