समाज घडवतानाच पत्रकाराने स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे : आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे .

 

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद

 

नांदेड : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण माध्यमांकडे पाहतो. नेहमीच माध्यमाने समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे . शोषित , पीडित, वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीतून आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून लढा उभारणार्‍या पत्रकारांनी नेहमीच संघर्ष केला आहे. हा संघर्ष करत असताना आणि लोकशाहीला बळकटी देत असताना पत्रकारांनी स्वतःच्याही आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
मराठी पत्रकारितेची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या 86 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आज संग्रामजी पोमदे महापालिका रुग्णालय,जंगमवाडी येथे पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक गोवर्धन बियाणी , महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंग संधू , महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश बीसेन , विभागीय संघटक प्रकाश कांबळे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांनी केले तर आभार नरेश दंडवते यांनी मांडले.
आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात पत्रकारांच्या विविध रक्त चाचण्या करण्यात आल्या. नेत्र तपासणीही यावेळी करण्यात आली . या शिबिरात 45 पत्रकारानी सहभाग नोंदवला. दरम्यान यावेळी बोलताना आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे म्हणाले की, पत्रकारांचे जीवन हे सतत धावपळीचे आणि अस्थिर असे आहे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. खरे तर पत्रकार हा चोवीस तास कामावर असतो . परिणामी त्याला स्वतःच्याच आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा पत्रकार स्वतःकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यानंतर त्याचे दुषपरिणाम त्याच्या कुटुंबाला भोगावे लागतात. ही बाब लक्षात घेता पत्रकारांनी आपल्या अत्यंत व्यस्त दैनंदिन कामातूनही स्वतःसाठी किमान एक तास काढून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी . अशा शिबिरांचा लाभ घ्यावा . ज्यामुळे आपण सुखी राहिल्यानंतर आपले कुटुंब सुखी राहील याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक गोवर्धन बियाणी म्हणाले की , मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी राज्यभर पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे कार्यक्रम आयोजित केले जातात . नांदेड जिल्ह्यातही नांदेडसह तालुका पातळीवर ही अशी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली आहेत . खऱ्या अर्थाने पत्रकारांचा कणा म्हणून एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाकडे आपण पाहतो. त्यांच्या आदेशानुसारच आजचे हे शिबिर पार पडत आहे . खरे तर पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाचे आभाळ होते याची जाणीव ठेवण्याची आवश्यकता असल्याचे बियाणी यावेळी म्हणाले.
नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.हनमंत रिठ्ठे,डॉ.बद्दीओद्दीन, डॉ.कल्याण पवार यांच्यासह शेख रफिख,विनोद सोनकांबळे, स्वाती शेषेराव सरोदे,प्रभा रामचंद्र वाघमारे,अमोल दत्तात्रय कावळे,मनीषा मारोती मुनेश्वर, पुजा राजेंद्र दुधाडे,नसरिन मो.साब पिंजारी,महादेवी पंडित गजभारे,प्रविण चिंचोलकर, शिला देशमुख,राहुल दाचावार आदी महापालिका व महालॅबच्या आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर यांनी रक्तचाचणी व आरोग्य तपासणीसाठी परिश्रम घेतले. तर लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश लोटिया,सेक्रेटरी प्रविण अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबचे मॅनेजर (व्यवस्थापक) शेख सुलेमान यांच्यासह डाॅ.मंजेश्री पवार,डाॅ.वैशाली दगडे,राम शिंदे,गजानन शेंडेराव,सोमनाथ माने,नम्रता भुताडे आदींनी पत्रकारांची नेत्रतपासणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *