- नाशिक- सुप्रसिद्ध साहित्यिक,वक्ता, एकपात्री नाट्य कलाकार डॉ. प्रतिभा जाधव लिखित ‘महामाता रमाई’ ह्या चरित्र ग्रंथास मराठा मंदिर साहित्य शाखा, मुंबई ह्या लौकिक प्राप्त संस्थेद्वारा प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. डॉ. जाधव यांना ‘चरित्र-आत्मचरित्र-व्यक्तिचित्र’ ह्या साहित्य प्रकारात हे पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘महामाता रमाई’ ह्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन वैशाली प्रकाशन, पुणे यांनी केले असून ह्या ग्रंथास वाचक, ग्रंथालये यांचेकडून उत्तम असा प्रतिसाद लाभत आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ प्रमुख अतिथी डॉ.आनंद नाडकर्णी (साहित्यिक तथा प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ) यांच्या हस्ते शुक्रवार दि. २० डिसेंबर २०२४ रोजी सायं. ५.०० वाजता मराठा मंदिरच्या श्री. जिवाजीराव शिंदे सभागृह, मराठा मंदिर इमारत, २ रा मजला, डॉ.नायर डेंटल हॉस्पिटलसमोर, मुंबई सेन्ट्रल (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे आहे.
पुरस्कार्थी साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव सामाजिक अंगाने विविध नामांकित वृत्तपत्रांत विचारप्रवृत्त करणारे परखड वैचारिक स्तंभलेखन नियमितपणे करत असतात. ‘साहित्यसखी महिला साहित्यिक मंचच्या त्या संस्थापिका अध्यक्षा आहेत तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र, मुक्त विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासनाच्या सल्लागार समिती सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य आहेत. त्यांची ललित, नाट्य, काव्य, वैचारिक, समीक्षा या साहित्य प्रकारात आजवर चौदा पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या ‘संवाद श्वास माझा’ ह्या काव्यसंग्रहाची इंग्रजी व हिंदी भाषेतील अनुवादित पुस्तके दिल्ली येथील नामवंत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहेत.