नागपूर, दि. २० डिसेंबरः
भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड, अर्धापूर आणि भोकर तालुक्यांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर एकूण १२० कामांपैकी केवळ २७ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित ९३ कामे अद्याप प्रलंबित आहेत किंवा सुरुच झालेली नाहीत. उर्वरित कामांसाठी प्रथमतः १५० कोटी रुपयांचा निधी देऊन ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी आ. श्रीजयाताई चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.
नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी आज हा महत्वपूर्ण विषय विधानसभेत उपस्थित केला. यावेळी त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत भोकर विधान मतदारसंघातील मुदखेड तालुक्यातील ३२ कामांपैकी १३ कामे पूर्ण झाली असून, ४ कामांकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे. अर्धापूर तालुक्यातील २८ कामांपैकी १० कामे पूर्ण झाली असून, ९ कामे तांत्रिक कारणास्तव बंद आहेत, तर ९ कामे सुधारित प्रशासकिय मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. भोकर तालुक्यातील ६० कामांपैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली असून, ९ कामे प्रगतीपथावर आहेत, तर १५ कामे बंद आहेत आणि ३१ कामे सुधारित प्रशासकिय मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. या सर्व कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.