नांदेड, दि. 25 ः नांदेड जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला हाेता. परंतु, केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात महायुती सरकारने केलेल्या लाेककल्याणकारी कामांमुळे नांदेडमध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीसाठी जनतेच्या माध्यमातून अच्छे दिन आले असून विधानसभेत सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा विक्रम महायुतीने केला आहे. महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाची आॅनलाईन सदस्य नाेंदणी सुरु झाली असून नांदेड जिल्हा यामध्येही आघाडीवर असेल. राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी चा विक्रम जिल्ह्याच्या नावावर आपण करु, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशाेकराव चव्हाण यांनी येथे व्यक्त केला.
नांदेड उत्तर ग्रामीण भाजपाच्या वतीने येथील कुसुम सभागृहात आयाेजित केलेल्या भाजपा सभासद नाेंदणी कार्यशाळेचे उदघाटन करताना ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर या माेहिमेचे समन्वयक माजी आ. गजानन घुगे, आ. भीमराव केराम, जिल्हाध्यक्ष किशाेर देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती किशाेर स्वामी, महामंत्री प्रवीण गायकवाड, किशन मिराशे, संदीप केंद्रे, प्रवक्ते संताेष पांडागळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्याताई राठाेड, स्वागत आयेनीवार, भगवान हुर्दुके, सुधाकर कदम, विलास साबळे, बाबुराव केंद्रे, बालाजी गव्हाणे, जगदीश भाेसीकर, विनाेद चिंचाळकर, छत्रपती कानाेडे, भगवान दंडवे, उद्धव पवार, संजय आउलवार, रामराव भालेराव आदींची उपस्थिती हाेती.
यावेळी बाेलताना खा. चव्हाण म्हणाले, की महायुती सरकार अधिक गतीने काम करत आहे. विराेधकांनी या सरकारविराेधात अनेक वावड्या उठवल्या. परंतु, मतदारांनी मात्र महायुतीला घवघवीत यश दिले. जनतेने आपल्याला डाेक्यावर घेतले आहे. परंतु, विजयाची ही हवा डाेक्यात जाऊ देऊ नका. लाेकसभा आणि विधानसभा निवडणुका संपल्या. आता कार्यकर्त्यांसाठीच्या महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिकांच्या निवडणुका आहेत. विजयाचा निकष व पक्षनिष्ठा या बाबी लक्षात घेऊन निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे आपआपसात भांडणे न करता स्थानिक स्वराज्य संस्था हातात घेण्यासाठी कार्य़कर्त्यांनी आता कामाला लागावे.
प्रत्येक विधानसभेसाठी 50 हजार सभासद नाेंदणीचे पक्षाने उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्टापेक्षा अधिकची सभासद नाेंदणी करुन नांदेडचे नाव कार्यकर्त्यांनी अधिक माेठे करावे, असे आवाहन खा. चव्हाण यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात आ. भीमराव केराम, माजी आ. गजानन घुगे, किशाेर देशमुख, प्रवीण गायकवाड यांनी सभासद नाेंदणीसंदर्भात त्यांच्या भाषणातून सविस्तर माहिती सांगितली. सूत्रसंचालन प्रवक्ते संताेष पांडागळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार महामंत्री संदीप केंद्रे यांनी मानले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.