नाशिक- येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, वक्ता व एकपात्री नाट्य कलाकार डॉ.प्रतिभा जाधव यांना बीड येथे क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार २०२४ नुकताच प्रदान करण्यात आला. गेल्या १६ वर्षांपासून प्रबोधन व परिवर्तनवादाच्या अंगाने भरीव कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक शिक्षकांना सदर पुरस्काराने गौरविण्यात येते. मुप्टा संघटनेच्या परिवर्तनवादी शिक्षक चळवळीकडून बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सदर पुरस्कार प्रोफेसर डॉ.वाल्मिक सरवदे (प्र कुलगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ.संभाजीनगर) यांचे हस्ते डॉ.प्रतिभा जाधव यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर मुप्टा संघटनेचे संस्थापक सचिव प्रा.सुनील मगरे , मेटाचे राज्याध्यक्ष तथा पुरस्कार सोहळा संयोजक प्रा.प्रदीप रोडे , प्रसिद्ध कायदेतज्ञ जयमंगल धनराज(मुंबई) हे मंचावर उपस्थित होते. ह्या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव मागवले जात नाही तर राज्यभरातून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक , शैक्षणिक वा इतर क्षेत्रांत उल्लेखनीय प्रबोधन, परिवर्तनाचे कार्य करणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांना क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. डॉ.प्रतिभा जाधव ह्या दोन दशकाहून अधिक काळ सातत्यपूर्ण लेखन, एकपात्री नाट्य प्रयोग, व्याख्याने याद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांची आजवर एकूण १४ पुस्तके प्रकाशित असून ‘मी अरुणा शानबाग बोलतेय!’, ‘मी जिजाऊ बोलतेय!’ व ‘मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय!’ ह्या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण त्या करत असतात. अगदी सिंगापूर, मॉरिशस येथे देखील त्यांनी निमंत्रित म्हणून एकपात्री प्रयोग सदर केलेले आहेत. महाराष्ट्रभारत आजवर त्यांनी ८०० हून अधिक प्रबोधनपर व्याख्याने दिलेली असून त्यांचे ५० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचे विद्यार्थी विविध मनाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या आजवरच्या ह्या समग्र कार्याची दखल घेऊन सदर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.