नांदेड – खेळाडूंमध्ये शारिरीक क्षमता अधिक असते. त्यासोबतच त्यांच्या मनाचा व बुध्दीचा विकास अधिक होऊन एका सांघिक भावनेने राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देण्याचे काम नेहमीच खेळाडू करतात असे प्रतिपादन भोकरच्या आ.ॲड.श्रीजयाताई चव्हाण यांनी आज येथे केले.
ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशन ऑल नांदेड जिल्हा वुसू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील यशवंत महाविद्यालयाच्या ऑडिटेरियममध्ये आयोजित 22 व्या राज्यस्तरीय सिनियर वुशु अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी त्या उदघाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संत बाबा बलविंदरसिंघजी हे होते. तर व्यासपिठावर शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस.कटके, वुसू असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.हसंराज वैद्य, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे, माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे, सरदार मनमोहनकौर जंगी, वुशुचे जिल्हा सचिव डॉ.राजेश जांभळे, सहसचिव डॉ.प्रमोद वाघमारे, डॉ.शीतल भालके, विनोद जमदाडे यांची उपस्थिती होती.
आ.चव्हाण पुढे म्हणाल्या की, वुशु खेळ प्रकारामध्ये शारीरिक क्षमतेसह योगाभ्यासाचे धडे दिले जातात. दक्षिण आशियामधील हा अत्यंत लोकप्रिय खेळ असून या खेळाच्या माध्यमातून अनेक होतकरू खेळाडूंना आरक्षीत जागेंवर काम करण्याची संधी मिळते. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच वुशु खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके अनुभवली. राज्यभरातून आलेल्या सर्व खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचे आपण स्वागत करतो व त्यासोबतच या खेळ प्रकाराच्या समर्थनासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
प्रारंभी संत बाब बलविंदरसिंघजी व आ.श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या प्रशिक्षकांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. आजपासून सुरु झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप 10 जानेवारी रोजी होणार आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार वुशु खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे यांचे समयोचित भाषण झाले