नांदेड दि. 6 जानेवारी :- बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) अर्थात कुत्रीम बुध्दीमत्ता वापरुन दैनंदिन कामे अधिक गतीमान व अचूक करण्यावर भर देण्यात येत आहे.माध्यम प्रतिनिधीनीही गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने पत्रकारितेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज सोमवारी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध पत्रकार संघटना व जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनाला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांसाठी आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बातमीदारी’, या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह नांदेड येथील ज्येष्ठ संपादक, वरिष्ठ पत्रकार, वार्ताहर, जिल्हा प्रतिनिधी ,विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी, समाज माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापरासाठी हे तंत्रज्ञान सकारात्मकतेने व प्राधान्याने आत्मसात केले पाहिजे.आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला अनेक कामे सहज, सुलभ झाले असून एका क्लिकवर अनेक विषयाची माहिती खूप कमी कालावधीत मिळू शकते. तसेच अनेक श्रमाची कामे, बौध्दिक कामे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करणे शक्य झाले आहे. विविध विषयाच्या माहितीचा डाटा कमी वेळेत संकलित करणे शक्य झाले आहे. माहितीपूर्ण बातमी देण्यासाठी वाचकांना अधिक शिक्षित करण्यासाठी व अतिरिक्त माहिती देण्यासाठी, बातमीतील गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा वापर करावा. यातील फायदेशिर बाबीचा विचार करुन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चितच गतीशील बातमीदारीसाठी फायदा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चॅटजिपीटी, जेमीनी, मेटा अशा काही प्राथमिक ॲपच्या वापराला नवपत्रकारांनी सुरुवात करावी, सरावातून यावर प्राविण्य मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सोबतच त्यांनी यातील धोक्याची जाणीव करून दिली. बहुतांश डाटा हा विदेशातील असल्यामुळे, माहिती कोणाकडून निर्माण झाली असावी याबाबतही तपासणी करणे खूप आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अस्मिता, परंपरा, संस्कृती भंजन होणार नाही. तसेच आपली लिखाणाची शैली गमावली जाणार नाही. आपली बातमीवरील लिखाणावरील व्यक्तिगत छाप कमी होणार नाही याचीही काळजी घेणे एक बातमीदार म्हणून आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनीही संबोधित केले. बातमीदारीला रंगत आणते ते स्पॉट रिपोर्टिंग, ग्राउंड रियालिटी हे स्पॉट रिपोर्टिंग मधून समजते. त्यामुळे आपल्या बातमीदारीत कॉपी-पेस्टची निरसता येणार नाही, याची काळजी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. काळानुसार माध्यमात खूप बदल घडत आहेत. परंतु स्थानिक पातळीवरील महत्वाची कामे किंवा बातमीतील भाव, कॉपी राईट, ॲपमध्ये संकलित करण्यात येत असलेले माहितीचे वर्गीकरण, याबाबत अनेक फायदे व तोटे आहेत. त्याचे वर्गीकरण करण्याचे प्राविण्य मिळवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
#आर्टिफिशियलइंटेलिजन्स प्रणालीचा शासनात वापर करण्यात येत असून नुकतेच नागपूर येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर सुरु केले आहे. पोलीस विभागाच्या तपासात सुध्दा याचा उपयोग मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. सर्व माध्यमाद्वारे आपण सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या जवळ पोहोचलो आहोत. यांचा चांगला कायदेशिर वापर करुन करणे काळाची गरज असल्याचे मत शेवटी त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी खिळे लावण्यापासून सुरू झालेल्या पत्रकारितेला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नव्या आयुधाच्या वापराला सामोरी जावे लागत आहे. त्यामुळे या बदलाला समजून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना ज्यांच्याकडे उत्तम ज्ञान आहे, वाचन आहे, समज आहे, परिणामाची जाणीव आहे, अशाच पत्रकारांना या नव्या तंत्रज्ञानाचा अधिक वापर होणार आहे. त्यामुळे पत्रकारितेतील मूलभूत आणि पायाभूत अशा बाबींसाठी प्रशिक्षण, वाचन आजही आवश्यक असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी, या कार्यक्रमाची सुरुवात करताना मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री. संतोष पंडागळे यांनी पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे स्वागत केले. तर प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार श्री.मकरंद दिवाकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे स्वागत केले.
00000
#दर्पणदिन
#पत्रकारदिन