गडचिरोली दि.18: : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आज भेट देऊन रुग्णालयातील विविध विभाग आणि सुविधा यांची पाहणी केली. भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधून रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांबाबत माहिती घेतली. त्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक विभाग, अपघात विभाग, ट्रॉमा वार्ड, बाह्य रुग्ण विभाग, डायलेसिस युनिट, केमोथेरपी विभाग, ऑक्सीजन प्लांट आणि औषध भांडार यासह रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. त्यांनी आकस्मिक आणि अपघात विभागातील उपलब्ध उपकरणे आणि सुविधा तपासून पाहिल्या. बाह्य रुग्ण विभागातील औषध पुरवठा व त्याची वैधता याबाबत सविस्तर चर्चा केली आणि औषधीची वैधता व त्यांचे परवाने प्रमाणपत्र तपासूनच पुरवठा करण्याचे निर्देश दिले.
एनसीडी विभागामध्ये तपासणीसाठी शुगर आणि रक्तदाब तपासणी किट उपलब्ध असल्याची खात्री केली. दंत चिकित्सा विभागामध्ये उपलब्ध रूट कॅनल, बॉयोप्सी आदी सेवा तसेच उपकरणांची कार्यक्षमता तपासली. रुग्णालयाच्या ऑक्सीजन प्लांटची माहिती घेऊन त्याच्या कार्यक्षमतेची खात्री केली.
याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील डायलेसिस युनिटच्या विस्ताराची आवश्यकता ओळखून तालुकास्तरावर अधिक खाटांची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव सुचवला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालयात मेडिकल स्टोअर निर्माण करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठात्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत उपविभागीय
अधिकारी राहुल मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी एच. विके (किलनाके), तसेच सामान्य रुग्णालयातील प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. मनिष मेश्राम, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी ( बाहय संपर्क )बागराज धुर्वे, तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.