नांदेड- देशासह राज्यात आपली सत्ता आहे, त्यामुळे जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवू असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केलय. भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेताना कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते.
या कार्यक्रमाला संजय कौडगे आ.भीमराव केराम ,आ.तुषार राठोड,आ जितेश अंतापूरकर,किशोर देशमुख,संतुक हंबरडे,चैतन्य देशमुख,देविदास राठोड,प्रवीण साले,किशोर स्वामी,बालाजी बच्चेवार ,सचिन उमरेकर, गोविंदराव नागेलीकर,शीतल खांडील,विजय गंभीरे यांची उपस्थिती होती. यावेळी खा. चव्हाण बोलताना म्हणाले की , आपली ताकत शहरात आहे, जिल्ह्यात आहे. आम्ही घटक पक्षाच्या विरोधात नाही मात्र आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला अधिकार आहे. त्यात गैर मानण्याचे काहीच कारण नाही. देशात राज्यात आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत.
आगामी काळात सर्व आघाड्यांवर सर्व मतदारसंघात आपली तयारी असली पाहिजे. तुम्ही म्हणाल तर आपण स्वबळावर निवडणुका लढवू तुम्ही सांगाल त्याप्रमाणे निवडणुका लढवू पण तयारी करा ऐनवेळी सांगू नका ,परिस्थिती प्रमाणे आपण निर्णय घेऊ असे खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद, नगर पालिका आणि पंचायत समितीच्या सर्वधिक जागा भाजपच्या निवडून आल्या पाहिजेत, अशा माझ्या सूचना इथल्या कार्यकर्त्यांसाठी आहेत. तसेच आगामी काळात भाजपचा बालेकिल्ला हा नांदेड जिल्हाच राहणार असल्याचे ते या कार्यक्रमाच्या शेवटी म्हणाले.