15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.आणि 26 जानेवारी 1950 ला सर्व प्रजेच्या हाती सत्ता आली.म्हणून आपण मोठ्या अभिमानाने दरवर्षी प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहाने साजरा करीत आहोत.राष्ट्रगीत, चलन,मुद्रा,सार्वभौम व धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपण गुण्या गोविंदाने,सुखाने आज नांदत आहोत.
विविध भाषा,पोशाख,चालीरीती, रूढी परंपरा या सर्वांना एकत्रित करून भारत हा बलाढ्य देश आज जगात सन्मानाने वावरत आहे पण. ..
अलीकडच्या काळात ब-याच ठिकाणी भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला दिसून येत आहे.
अनेक कार्यालयात लाच घेण्याचे प्रकार वाढतच आहेत.अक्षरशः न्यायाधीश सुद्धा लाच घेण्यास मागे पुढे पाहत नाहीत.यावरून आपण स्वातंत्र्याचा अभिमान ठेवला आहे काय? तुमचे मन तुमच्या ताब्यात राहिले नाही. याचा अर्थ सर्व सामान्य लोकांनी काय घ्यावा.आधुनिक शिक्षण व्यवस्था, त्यात होणारे पावलोपावली बद्दल,अंतर्गत गुण, परीक्षा पद्धती यावर भाष्य करणे नकोच वाटते. आधुनिक राजकारण स्वच्छ व निर्मळ राहिलेले नाही. समाजाविषयी व पक्षाविषयी काही लोकप्रतिनिधी मध्ये निष्ठा राहिली नाही,निष्ठेवर पक्ष चालतो,आणि मोठा होतो.जर प्रत्येक पंचवार्षिक मध्ये पक्ष बदलणारे लोकप्रतिनिधी असतील तर ते स्वार्थापोटी की जनतेच्या भल्या साठी हे प्रत्येकानी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.या ठिकाणचा शेतकरी राजा हा बळी चा राजा म्हणून हिणवणी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा इतरांनी हात लावू नये.असे आदेश काढले होते.आणि आज आपण शेतकऱ्यांची दैन्यावस्था करून टाकली आहे.अनेक शेतीसाठी असलेल्या योजना काही शेतकऱ्या पर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी होत नाहीत.
निसर्गाचा लहरीपणा बोगस बी-बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या,नेहमी भावात होणारे बदल,शेतीमालाला भाव न देणे अशा अनेक गोष्टी त्यांच्यासशी संबंधित आहेत. म्हणून भारत अधोगतीच्या दिशेने जाण्याची वाटचाल करतो की काय? अशी मनात भीतीदायक वातावरण निर्माण होत आहे. दर चार वर्षांनी भरणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला एक,दोन सुवर्णपदक मिळतात.देशाची लोकसंख्या आज 140 कोटी झाली आहे. त्यातील खेळाडूच्या अंगी कौशल्य का दिसत नाहीत.
मंगल देशा,पवित्र देशा,
कणखर देशा,दगडांच्या देशा,
दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा. असे वर्णन आपण देश भक्ती पर गीतातून गातो. याचा ही विचार करण्याची वेळ आली.अक्षरशः काही वेळेस आपल्याला ऑलिम्पिक स्पर्धेत मध्ये एकही सुवर्णपदक मिळालेले नाही. हे चिंतन करण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान युगाचा आरंभ सुरू झाला. कामासाठी वेगवेगळ्या मशीन तयार झाल्या. त्यामुळे मानवी श्रम कमी होऊ लागले.त्यातून बेकारी निर्माण झाली. बेकरांना काम मिळत नसल्या मुळे खेडी ओस पडून शहरे अगडबंब फुगू लागली,त्यात झोपडपट्टीचा प्रश्न निर्माण झाला.
गलिच्छ वस्तीतून वेगवेगळे अवैध व्यवसाय सुरू झाले. माणुसकी,सहिष्णुता,मानवता, आपुलकी इथून दूर निघून गेली. लोकसंख्येच्या दृष्टीने आपण आज एक नंबर वर आलो आहोत.
ही गोष्ट लांच्छानास्पद झाली आहे. आजही अनेक ठिकाणी दहशतवाद तळ ठोकून उभा आहे. आपलेच लोक आपल्यावर अन्याय करत आहेत.
आणि खंडणीच्या माध्यमातून यम सदनी पाठवत आहेत. त्यामुळे अनेक भागात सर्वसामान्य जनता जीव मुठीत घेऊन दबावाखाली जीवन जगत आहे. हे भारतीय लोकशाही समोरील फार मोठे आव्हान आहे. आधुनिक भारतात ज्या महिला आधुनिक म्हणून वावरत आहेत त्यापैकी 60% महिला झेंडावंदन करण्यासाठी घराबाहेर येत नाहीत.
हे कटू सत्य आहे. फक्त महिला कर्मचारी उपस्थिती दर्शवतात.पुस्तक प्रकाशन, व्यसनमुक्ती, बेरोजगाराच्या समस्या, शिक्षक- पालक सभा. इतर मेळावे या विषयावर व्याख्यान ऐकण्यास दहा% सुद्धा महिला हजर राहत नाहीत.आणखी समाजात जाणीव जागृती झाली नाही. महिला अंधश्रद्धेच्या बाबतीत फार आघाडीवर आहेत. तुमचं थोडं भविष्य पाहतो?कोणीतरी असे म्हटल्यानंतर त्या लगेच तयार होतात.आणि फसव्या बोलण्याला बळी पडतात.श्रद्धेबरोबर अंधश्रद्धा खूप खोलवर रुजलेली आहे.संत नामदेव,संत गाडगे महाराज,संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज,संत कबीर,संत रोहिदास महाराज,संत चोखामेळा,संत सोयराबाई,संत जनाबाई यांनी अभंगाच्या रूपाने अंधश्रद्धेवर ताशेरे ओढले;परंतु आजही बरेच लोक सुधारलेले नाहीत.भानामती, भूतबाधा, करणी,या गोष्टी चालूच आहेत. शकुन अपशकुन,अंधश्रद्धे मधून बुवा-बाबा पैशाचा पाऊस पाडतात, व्रतवैकल्ये, उपवास,वा-या याच्या महिला अक्षरशः खूप आहारी गेल्या आहेत.हजारो रुपये देऊन नंतर फसलो म्हणून सांगतात. त्यामुळे अनेक समाज सुधारकांनी महिला सुधाराव्यात. म्हणून आयुष्यभर महिलांसाठी शिक्षण व्यवस्था सुरू केली. महिला विद्यापीठ स्थापन
केले आणि महिला सुशिक्षित होऊन सुद्धा अशा अंधश्रद्धेच्या बळी पडत आहेत. याबद्दल काय बोलावे ?अनेक चित्रपट, मालिका, रील्स, आधुनिक काळात दाखवल्या जात आहेत. त्यातून ज्ञान कमी चाळे अधिक दाखवले जात आहेत. हुंडा पद्धती हा समाजाला लागलेला कलंक आहे. काही वर पक्ष हुंडा कमी घेऊन जास्त सांगत आहेत. आणि नंतर ते घटस्फोटाच्या वेळी कुटुंबाचे तीन तेरा वाजत आहेत.असे उदाहरणे काही ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. व्यसनाधीनता तर आता शिगेला पोहचवली आहे. काही सरकारी कार्यालये यांचे कोपरे अक्षरशः घाणीने भरून गेले आहेत, तसेच तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाऊन उद्याच्या भवितव्याची चिंता त्यांना राहिली नाही. तिशी ओलांडून गेलेले अनेक तरुण मोबाईलच्या आहारी जाऊन रात्रंदिवस आपला अमूल्य वेळ वाया घालवत आहेत .त्यामुळे कुटुंब व्यवस्थेला आता घरघर लागली आहे. हम दो हमारे दो म्हणण्याची वेळ येऊन ज्येष्ठांचा अनादर होत आहे. तसेच विवाह पद्धती बदलल्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान राहिला नाही.
मुलांच्या शिक्षणाच्या नावाखाली हजारो घरे विभक्त झाली आहेत .
सर्व काही फोटोग्राफी, प्री-वेडिंग ऑनलाइन व्हॉट्सअप,अनाठायी खर्च,महागड्या पत्रिका, कृत्रिम सांजसृगार, कृत्रिम फळे, फुले,उसने हसू ही सगळी थट्टा भारताच्या आधुनिक जडणघडणीला कारणीभूत आहे. असे मला वाटते. मुली शिकल्या सुधारणा झाल्या.असे असले तरी शिकलेल्या काही मुली सुशिक्षित झाल्या हे मात्र खरे…..
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
संस्थापक: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड