लासलगाव कॉलेजच्या मराठी विभागाची क्षेत्रभेट संपन्न*

 

लासलगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाची शैक्षणिक क्षेत्र भेट नुकतीच नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या स्मृती जागवत कुसुमाग्रज स्मारक व कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे भेट दिली तसेच सार्वजनिक वाचनालय, नाशिक, दादासाहेब फाळके स्मारक, पेरूची वाडी येथेदेखील विद्यार्थ्यांनी डॉ. प्रतिभा जाधव व प्रा. प्रांजली ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली भेट दिली. सार्वजनिक वाचनालयासोबत महाविद्यालयाने सामंजस्य करार केलेला असून त्या अंतर्गत वाचनालयातील संदर्भ विभाग, वस्तुसंग्रहालय याबद्दल श्री.बोरसे व सौ.जोशी यांनी सविस्तर माहिती दिली. भाषाविषयक अभ्यास व संशोधनाच्या दृष्टीने सावाना भेट अत्यंत उपयुक्त असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.
कुसुमाग्रज स्मारकामध्ये कुसुमाग्रजांच्या समग्र साहित्यिक प्रवासावर आधारित लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला तसेच ग्रंथालयाची माहिती देण्यात आली. स्मारकाचे व्यवस्थापक रामदास जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान मधील तात्यासाहेबांच्या वापरातील वस्तू त्यांचे विविध पुरस्कार, ग्रंथ हे सर्व बघताना विद्यार्थी भारावून गेले तर सार्वजनिक वाचनातील संदर्भ विभाग, वस्तू संग्रहालय बघून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली. आनंददायी अभ्यासभेट व स्नेहभोजनाने विद्यार्थी आनंदित झाले. मराठी भाषा व साहित्यविषयीच्या जिज्ञासा जागृतीसाठी हा उपक्रम उपयुक्त व आनंददायी ठरला आहे. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *