गावाकडची सकाळ

 

माणिक महाराज आमचं ग्रामदैवत. गावाकडं महाराजांची जत्रा सुरू आहे. त्यानिमित्त दोन दिवसांचा पडाव पडलेला. जत्रा म्हणजे सालभरातला गावाचा उत्सव! महोत्सव! आपल्या पोटासाठी, नोकरी, काम धंद्यासाठी मुलुखभर पांगलेले गावकरी या उत्सवासाठी एकत्र जमतात. दिल्ली, मुंबई, हैदराबादसारख्या शहरात असले तरी गावचा हा उत्सव विसरत नाहीत. लाहीच्या आदल्या दिवशी गावात आपल्या घराबारासह सारे हजर होतात.

सकाळ.
सकाळ तर आपण नित् नेमानं अनुभवत असतो. पण गडबड, घाई, गतीनं आपली सकाळ शहरांमधून तुंबलेली असते. आज गावाकडं. सकाळी उठल्यावर कसलीही गडबड नाही. धांदल नाही. एकदम निवांत.आमच्या वाड्यापुढं अंगणात लिंब आणि संकासुराचं दाटबरप् झाडं आहेत. साऱ्या वाड्यावरन् अंगावर मस्त सावली धरून राहतात.या झाडांच्या पानांमधून गाळून आलेलं ऊन अधिकच गोड लागतंय. रूपवान ऊन साऱ्या अंगणाला साजिरं करतंय. या उन्हासंगं गमज्या करायला आपणाला लई आवडतंय. पण घरातून आवाज येतो, “अण्णा आंघोळीचं पाणी तापलंय…” झालं…ऊन विरघळून जातंय. कर्तव्य रमू देत नाही. वास्तव सत्य अन् प्रखर असतं. स्वप्नांचा अवतार कधीही संपवून मोकळं होतं.

गावाकडून परतलं तरी एखाद्या आवडत्या गाण्याच्या आवडत्या ओळीसारखी ही सुंदर साजिरी गावाकडची सकाळ मनात रेंगाळत राहते.

साहित्यिक शिवाजीराव आंबुलगेकर यांच्या Fb वरून साभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *