मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात प्रत्यक्ष रणमैदानावर लढणारे शूर सेनानी ज्यांच्या बलिदानातून हा मराठवाडा निजामाची जुलमी राजवट असलेल्या हैदराबाद संस्थानातून १७ सप्टेंबर १८४८ रोजी मुक्त झाला.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल १३ महिने ०२ दिवस हा लढा सुरू होता.
आधुनिक शस्त्रासह सज्ज निजामसेना आणि त्यांच्या मदतीला धूर्त, कपटी, निर्दयी कासिम रजवीची रजाकारी निमलष्करी सेनेशी संघर्ष करीत शेकडो हुतात्मे अमर झाले. अनेकांच्या त्याग आणि बलिदानातून
१७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले.या स्वातंत्र्यलढ्यात नांदेड जिल्ह्याने खूप मोठे योगदान दिले आहे.नांदेड जिल्हा हा मराठवाडा मुक्तिसंग्राम चळवळीचे केंद्रबिंदू राहिलेला आहे. नांदेडच्या मातीत शेकडो शूरवीर सेनानी जन्मास आले आहेत. ज्यांनी आपले अमूल्य योगदान देत वेळप्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून परिवाराचा कसलाही विचार न करता फक्त आणि फक्त मराठवाडा जुलमी निजाम राजवटीतून मुक्त करण्यासाठी संघर्ष केला. या लढ्यात अठरा पगड जातीतील शूरसेनानींने आपले बलिदान दिलेले आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यावर आजपर्यंत अनेक लेखकांनी, विचारवंतानी लेखन करत या लढ्यातील शूर सेनानी यांचे चरित्र व त्यांचे कार्य समाजासमोर आणलेले आहे. परंतु बहुजन समाजातील अनेक शूरवीर स्वातंत्र्य सेनानींचे कार्य, मराठवाडा मुक्तिसंग्राम चळवळीतील त्यांनी दिलेले बहुमोल योगदान फारसे पुढे आले नाही.महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत तथा लेखक प्रा. संतोष देवराये यांनी “शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ” या पुस्तकात या लढ्यातील दुर्लक्षित झालेल्या शूरवीर स्वातंत्र्यसेनानींचा संघर्ष, त्यांचा धगधगता इतिहास मांडला आहे.
लेखकांनी सदसद्विवेक बुद्धीला स्मरून प्रामाणिक आणि सत्य लिहिण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या लढ्याची वस्तुनिष्ठ माहिती त्यांनी या पुस्तकात दिलेली आहे. प्रा. संतोष देवराये यांनी या पुस्तकात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याचा इतिहास १८ प्रकरणात समाविष्ट केला असून पहिल्या प्रकरणात हैदराबाद संस्थानचा कारभार आणि निजामी राजवटीचा इतिहास मांडलेला आहे.
दुसऱ्या प्रकरणात मराठवाडा इतिहास आणि सद्यस्थिती यावर सखोल विवेचन केलेले आहे. “वंदेमातरम”चळवळीने हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचा पाया कशाप्रकारे घातलेला आहे हेही या पुस्तकात सांगितले आहे. संस्थानातील काही जमीनदार,भांडवलदार हे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी निजामाच्या बाजूने कशाप्रकारे उभे होते, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठवाड्याच्या अनुशेषाची पूर्ती कधी होईल ? ती कधी भरून निघेल ? मराठवाड्याचा अनुशेष कशाप्रकारे शिल्लक आहे. हे वस्तुनिष्ठ आकडेवारीसह मांडणी केल्याचे दिसून येते. मराठवाड्याच्या वाट्याला ४६ हजार कोटींच्या घोषणेतील ७०१ कोटी फक्त मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामात नांदेड जिल्ह्यातील आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा जयवंतराव पाटील वायपणेकर, हुतात्मा राजाभाऊ वाकडे, हुतात्मा किशनसिंह तेजसिंह राजपूत, हुतात्मा जानकीलाल राठी हुतात्मा शंकरराव जाधव, हुतात्मा वसंत राक्षसभुवनकर यांच्यासह अनेकांचा उल्लेख केलेला आहे.
तसेच कंधार तालुक्यातील कल्लाळी येथील ऐतिहासिक रणसंग्रामाची वस्तुनिष्ठ माहिती त्यांनी या पुस्तकात दिलेली आहे. पाटनुरचा जंगल सत्याग्रह कशाप्रकारे झाला.उमरी बँक ऑपरेशन कसे यशस्वी झाले ? स्वातंत्र्यसेनानींने बँक ऑपरेशन का केले ? यावर सखोल विवेचन केल्याचे दिसून येते. या मुक्तिलढ्यातील हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे मोठे योगदान, त्यांनी केलेला त्याग व बलिदान याचे वर्णन केले आहे. हुतात्मा जयवंतराव पाटील यांचा इस्लापूर येथील रणसंग्राम वाचताना अंगावर शहारे निर्माण होतात. देशाचे माजी गृहमंत्री, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी हजारो स्वातंत्र्यसेनानींचे प्राण कसे वाचवले हे या पुस्तकातून त्यांनी सांगितले आहे.
मुदखेड-अर्धापूर तालुक्याने मुक्तिसंग्रामचा पाया कशाप्रकारे रचला याची मुद्देसूद मांडणी केली आहे. उमरी तालुक्याचे क्रांतिकारी कार्य ज्यामध्ये निजामाच्या गाडीवरील बॉम्ब हल्ल्याचे वर्णन त्यांनी केले आहे.
कंधार- लोहा तालुका मुक्तिसंग्राम लढयाचे माहेरघर असल्याचे नमूद केले आहे. या धगधगत्या अग्नीकुंडात ३५ जण शहीद झाले. स्वातंत्र्य सेनानी सखाराम पाटील सोमवारे, स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय भाई डॉ. केशवराव धोंडगे यांचे या लढ्यातील योगदान खूप मोठे राहिले आहे हे त्यांनी सांगितलेले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये हदगाव तालुक्याने घेतलेली खंबीर भूमिका त्यांनी सांगितलेली आहे. या लढ्यात भोकर, धर्माबाद, बिलोली,नायगाव, मुखेड,देगलूर तालुक्यासह सबंध नांदेड जिल्ह्याने किती प्रयत्न केले त्याचे संक्षिप्त वर्णन केले आहे.
” स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला,
आनंदाची पहाट झाली,
मराठवाडा जुलमी निजाम
राजवटीतून मुक्त झाला “मुश्किल नही है कुछ दुनिया मे, तू जरा हिम्मत तो कर,ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर….
याच ब्रीदाने शूर सेनानी मराठवाडा मुक्तिसंग्रामात शूरपणे लढले.
प्रसिद्ध विचारवंत तथा लेखक प्रा. संतोष देवराये लिखित ” शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ” हे पुस्तक दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी प्रकाशित होत आहे.याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
सुज्ञ व चोखंदळ वाचकवर्ग या पुस्तकास भरभरून प्रतिसाद देतील
याची मला खात्री आहे.लेखकाच्या पुढील लेखन कार्यास मनस्वी शुभेच्छा!
पुस्तकाचे शीर्षक : शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची
प्रकाशन : निर्मल प्रकाशन
एकुण पृष्ठे : ७२
स्वागत मूल्य : १२० रू.
रमेश पवार
(व्याख्याते,लेखक,समीक्षक )
बहिशाल शिक्षण केंद्र स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेड
जिल्हासचिव-मराठा सेवा संघ नांदेड
दुरभाष क्र: ७५८८४२६५२१