शनिवार दि 15 फेब्रु 25 रोजी उत्साहात पार पडले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ माधवराव गादेकर होते. तर स्वागताध्यक्षपदी श्री बी आर कलवले होते.
या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी तथा गजलकार डॉ. मुकुंद राजपंखे होते. डॉ. राजपंखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कर्मवीर भाऊराव पाटीलांना अपेक्षित असलेल्या तळागाळातील माणसांच्या विकासाचं स्वप्न पाहिल्याचं सांगून आपल्या कविता आणि गजला उपस्थितांना ऐकवल्या. कर्मवीर भाऊराव पाटीलांना आपल्या संस्थेमधून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनगट आणि मस्तकाचा संतुलित विकास हवा होता असे प्रतिपादन करुन आपल्या उत्कृष्ठ कविता आणि गजल ऐकवल्या.
” मनगटाला मस्तकाची जोड द्यावी शिक्षणाने,
गगनभेदी झेप घ्यावी पंख झडल्या पाखरांनी.”
त्यांनी आपल्या…
“घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे”
आणि
“मया पातळ करु नकोस गावाकडे येत जा”
या कविता ऐकवून साहित्य संमेलनातील कविसंमेलनात उर्जा भरली. या बहारदार कविसंमेलनाचे सुत्रसंचलन राजेसाहेब कदम या महाराष्ट्राच्या लाडक्या सुत्रसंचलकाने आणि अहमदपूरच्या भुमिपुत्राने केले. त्यांनी सादर केलेली रचना अशी होती.
“आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या.
ठिगळाला ठिगळ लावण्यातच आमच्या बी जिंदग्या बर्बाद झाल्या !”
कविसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून कवी अंकुश सिंदगीकर यांनी आपल्या तडाखेबंद शैलीत आपली कविता ऐकवून पुरोगामी साहित्य चळवळीच्या साहित्याची आवश्यकता विषद केली.
प्रा कवी अनिल चवळे यांनी वृक्षारोपणाची आवश्यकता सांगणारी कविता सादर केली. ती अशी होती..
“पाण्यासाठी आड नाही
पाखरासाठी झाड नाही.
नाही आंबरी पाखरांचा थवा
करपतो अंकुर उगवण्यापुर्वी नवा !”
चळवळीतील कार्यकर्ते आणि विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी चळवळीतील एक कसदार रचना सादर केली.
मुजोर पेशवाई,
लोकशाहीत ठोकशाही,मदीरेत नाचनारे दरबार पाहिले.
फितुर पळणारे सरदार पाहिले मी”
कवी संजीवकुमार भोसले यांनी एक बहारदार प्रेम कविता सादर केली आणि तरुणाईचा वन्स मोअर मिळवला.
“गेलीस तू आणि काळीज फाटलं
जीवन पेटलं ग् जीवन पेटलं !”
कवी मुरहारी कराड पारकर यांनी एक हृदयस्पर्शी कविता सादर केली. ती कविता सबंध शेतकऱ्यांना दिलासा देणारी होती. तो दिलासा पारकर यांच्या शब्दांत.
” मेली नाही माती अजून
वांझ नाही मेघ काळा.
सोडू नका गाव गड्यांनो
बाकी आहे पावसाळा.”
तर कवी विजय पवार यांनी पुढील कविता सादर केली.
“माय माझी माझ्या लहानपणी जात्यावरती दळायची,
दळता दळता ओव्या आणि
गवळणी ती गायायची.”
सौ रंजना गायकवाड यांनी आपल्या सुरेल आवाजात गाऊन रचना सादर केली आणि सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. ते असे…
” गाते बाई गाणी गोड भिडे वाड्याची
लेक आहे मी हो माय साऊ नि फुलेची.”
या साहित्य संमेलनात ग्रामीण कथाकार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरोगामी साहित्य परीषद अहमदपूरचे एन. डी. राठोड यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. प्रा. रा. ना. पस्तापुरे यांनी कष्टकरी बाप या रचनेत कष्ट करीतो रानात, त्याला येईना थकवा; उन असो की पाऊस, कधी घेईना विसावा ! पत्रकार कवी बाबासाहेब वाघमारे यांनी चौकीदार ही विद्रोही रचना सादर केली. प्रा भगवान आमलापुरे यांनी चालू घडामोडीवर परखड मत व्यक्त करणारी,
“चला मी तुम्हाला परळीला नेऊन आणतो !
ती माझी कर्मभूमी मी थोडं बहुत जाणतो !!”
ही कविता सादर केली.
नवोदित कवी पवन कच्छवे परभणी यांनी ‘चला गड्यांनो नव्या उद्याचे स्वप्न पाहायला’ ही कविता सादर केली. शिवाजी नामपल्ले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. डॉ. सतिश नाईकवाडे, डॉ. व्यंकट सुर्यवंशी , प्रा. चंद्रकांत मोरे, रमेश हणमंते लातूर वैजनाथराव कांबळे, नवोदित कवी अरुण वाघमारे, नागनाथ कलवले, आमदार रामभाऊ गुंडीले, सौ. मीना तौर मॅडम,जळकोटचे प्राचार्य कवी वाघमारे सरांची रचना भाव खाऊन गेली. प्राचार्य तुकाराम हरगिले यांनी वीर फकिराच्या जीवन आणि कार्यावर आधारित बहारदार कविता सादर केली. शिवाय विद्या बयास, सुवर्णा माळी आणि हाशम पटेल लातूर यांनीही आपल्या कविता ऐकवल्या. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव,माजी जि प सभापती अॅड टी एन कांबळे, श्रीकांत बनसोडे,प्रा. डॉ. रमाकांत गजलवार, केंद्रे सर ब्रम्ह वाडीकर, बाबासाहेब पौळ खंडाळीकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
▪
प्रा. भगवान आमलापुरे,
अहमदपूर.
द्वारा : कै. शं. गु. ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी ता परळी वै.