(८ मार्च महिलादिन विशेष )
घरात अठरा विश्व दारिद्रय, भूमिहीन असूनही गरीबीचा बाऊ केला नाही.घरप्रपंच सांभाळण्यासाठी अपार कष्ट केले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मुलांना शिक्षण दिले.मुलांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्रगती साधली. नातवांनी हाच वारसा समृद्ध करण्यात यश मिळविले. जळकोट जिल्हा लातूर येथील गुजाबाई माधवराव तोगरे या महिलेची कष्ट अन् जिद्द समाजाला दिशादर्शक व नवीन पिढीला प्रेरणादायी अशीच आहे.
लातूर जिल्ह्यातील जळकोट हे तसे डोंगराळ व अत्याल्प सिंचन असलेले गाव.. बारमाही रोजगार उपलब्ध होत नाही.. अन् पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम करण्याची सवय गावात झाली.कोणत्याही कुटुंबाला स्त्री ही संस्कार अन् परिश्रमाची सुरेख सांगड घालत असते.गुजाबाई माधवराव तोगरे यांनी कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी श्रमाची कंजुषी कधी केली नाही.पती कै.माधवराव तोगरे हे मोसमी फळ झाडे घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. त्यातून कधी थोडी मिळकत तर अनेकदा कष्ट नाहक वाया जायचे.. अशावेळी संसाराचा गाडा हाकलले, मुलांचे शिक्षण करणे कठीण होतं असे.
गुजामायने मग कुटुंबाला आर्थिक हातभार जसा लावला तसा मुलांच्या शिक्षणासाठी अपार कष्ट केले. लिंबोळी वेचणी,टोळंब, बिबे गोळा करणे,शेण व गोवरी जमा करणे,चिंच फोडणे आदी कामे करून मुलांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान दिले.१९७३-७३ चा दुष्काळ तर जगण्याची उर्मी निर्माण करणारा जसा होता.तसाच जो संघर्ष करून परिस्थितीवर मात करेल तोच टिकेल..अशी भयावह परिस्थिती होती. रोजगार हमीदार मजूरी आणि मिलो ज्वारी मिळत असतं.परंतु कमी ज्वारी आणि मोठे कुटुंब असे परस्पर विरोधी स्थिती होती.परंतु गुजामाय यांनी भाकरी जास्त करण्याचा अफलातून प्रयोग साधला.आंबाडा पाला मिलो ज्वारी पिठात मिसळून भाकरी जास्त करण्याचा प्रयोग यशस्वी केला.प्रसंगी उपाशी राहून मुलांना जगविले अन् घडविले.शिक्षणासाठी प्रोत्साहन व मदत करून शैक्षणिक प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले.
आर्थिक ओढाताण सतत होत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत नव्हता.त्यासाठी दोन मुलांना जांब बु.ता.मुखेड येथील वसतिगृहात प्रवेश दिला.त्यामुळे मुलांच्या रोजी रोटी प्रश्नाची तीव्रता कमी झाली.परंतु शैक्षणिक साहित्य,कपडे यासाठी गुजाबाईचे योगदान प्रेरणादायी असेच राहिले.आई व वडीलांच्या श्रमाची जाणिव मुलांनी ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढविली.कुटुंबात वरिष्ठ महाविद्यालयात पहिला प्राध्यापक डॉ.गंगाधर तोगरे यांच्या रूपात निर्माण करण्याची किमया केली.तसेच मोठा मुलगा विजयकुमार तोगरे हा केंद्र शासनाच्या वर्ग १ अधिकारी पदा पर्यंत मजल मारणारा ठरला.एक त्र्यंबक तोगरे हा सामाजिक सेवेचा वसा घेतलेला आहे.
शिक्षणातून प्रगतीचे दालन उघडता येते.समाजासाठी काम करणारी पिढी निर्माण करावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षण विषयक विचार निरक्षर गुजाबाई यांनी स्विकारत कुटुंबाला शिक्षण प्रवाहात पतीच्या मदतीने आणले.मुलांसाठी अपार कष्ट केले.तसे नातवांना समाज व देश विकासात आपले योगदान देण्याचे संस्कार केले.त्यामुळे एक नातू अखिल भारतीय परिक्षेतून गुणवंतरॉय तोगरे मर्चंट नेव्हीत कॅप्टन,दुसरा नातु अजितरॉय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आय. आर. एस. झाला. एक निभितरॉय हा लघु उद्योजक होऊन तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे.एक दंत चिकित्सक, एक बॅंक ,एक महानगरपालिकेत आपली सेवा देत आहेत.

तालुक्यात सुशिक्षित कुटुंब
जळकोट शहर व तालुक्यात गुजाबाई तोगरे यांचे कुटुंब हे आदर्श व सुशिक्षित कुटुंब म्हणून ओळखले जाते. कुटुंबात वेगवेगळ्या पदव्या अन् पद पहायला मिळतात.तसेच नातं सुना सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आहेत. त्यात एक एम एस्सी बॉटनी,बी. एड्.डायट ,एक एम. बी. बी. एस. एम .डी. एक पदवी शिक्षण घेऊन बॅंकेत सेवा देत आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबाचा असामान्य असा प्रवास झालेले चित्र तालुक्यात दुर्मिळ असेच आहे.

