वडिलांना श्रद्धांजली अन् समाजाला प्रेरणा! ठाकूर कुटुंबीयांची आगळीवेगळी तेरवी”

 

परंपरेला समाजसेवेची जोड; गरजूंना अन्नदान करून माणुसकीचा नवा आदर्श, नेत्रदान आणि अन्नदानाचा अनोखा संगम

नांदेड : माणुसकी ही केवळ विचारांची नाही, तर कृतीतून व्यक्त होणारी गोष्ट आहे. हे सिद्ध करत, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आपल्या वडिलांच्या तेरवीच्या निमित्ताने गरजूंसाठी अन्नदान करून समाजसेवेचा नवा आदर्श घालून दिला.

———————————————
समाजसेवा हीच खरी श्रद्धांजली!”

परंपरांच्या चौकटीत अडकण्याऐवजी, त्यांना सामाजिक हिताच्या दिशेने वळवण्याची खरी गरज आहे. दिलीप ठाकूर यांच्या या कृतीतून समाजाला एक नवा मार्ग मिळाला आहे.

“माणुसकीला कृतीची जोड मिळाली की, ती केवळ विचार न राहता प्रेरणा बनते!” ठाकूर कुटुंबीयांनी दिलेल्या या संदेशाने अनेकांना समाजसेवेसाठी प्रवृत्त केले आहे.
———————————————

एसटी इंटक संघटनेचे माजी अध्यक्ष कै. गोपालसिंह भैय्या ठाकूर यांच्या निधनानंतर, प्रथेप्रमाणे नातेवाईकांसाठी गोडजेवण ठेवण्या सोबतच ठाकूर कुटुंबीयांनी समाजसेवेचा नवीन मार्ग निवडला. त्यांनी वृद्धाश्रम, अनाथाश्रम, दिव्यांग शाळा, महिला बालगृह यांसह विविध ठिकाणी गरजूंसाठी अन्नदान करून परंपरांना एक वेगळा अर्थ दिला.

नेत्रदान आणि अन्नदान – माणुसकीची खरी शिकवण!

कै. गोपालसिंह ठाकूर यांच्या निधनानंतर, मरणोत्तर नेत्रदान करून गरजू व्यक्तींना प्रकाश देण्याचे कार्य करण्यात आले. त्यानंतर, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरजूंसाठी अन्नदान करून सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श घालून देण्यात आला.

या दु:खद प्रसंगी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. प्रतापराव चिखलीकर, आ. आनंदराव बोंढारकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, अनुसयाताई खेडकर ,भाजपा संघटन मंत्री संजय कोडगे,महानगर अध्यक्ष अमर राजूरकर,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, जेष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे, संजीव कुलकर्णी, विजय पवार, केशव घोणसे पाटील यांच्यासह अनेकांनी ठाकूर कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.

समाजसेवेचा दीप उजळला!

धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे केवळ नावाने नव्हे, तर कार्याने मोठे समाजसेवक आहेत. त्यांच्या पुढाकाराने संध्या छाया वृद्धाश्रम, सुमन बालगृह, लहुजी साळवे अनाथाश्रम, अंध विद्यालय वसरणी येथे भोजनदान करण्यात आले. तसेच, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा, क्षुधा शांती या सामाजिक उपक्रमांतर्गत अन्नदान करण्यात आले.

याशिवाय, रेल्वे स्थानकावर प्रवाशांना गोड जेवण वाटप करण्यात आले. या उपक्रमात सुरेश लोट,दिपकसिंह ठाकूर, दिनेशसिंह ठाकूर, राजेशसिंह ठाकूर, सुरेश शर्मा, बिरबल यादव,शिवा लोट, कपिल यादव, कामाजी सरोदे , अरुण काबरा, संतोष बच्चेवार, जगतसिंह ठाकूर, शिवचरण लोट, रोहित ठाकूर,संतोष भारती यांनी मोलाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *