उपक्रम – स्मृतिगंध(क्र.१४)कविता मनामनातल्या…(विजो) विजय जोशी – डोंबिवली *कवी – केशवसुत *कविता – आम्ही कोण?

कृष्णाजी केशव दामले (केशवसुत).

जन्म – १५/०३/१८६६ (मालगुंड – रत्नागिरी).

मृत्यू – ०७/११/१९०५ (हुबळी – कर्नाटक) (वय वर्षे ३९).

केशवसुत यांना आधुनिक काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. मराठी काव्यसाहित्यातील ते एक श्रेष्ठ कवी होऊन गेले. काव्यरत्नावली या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सुचनेवरून “केशवसुत” या टोपणनावाचा त्यांनी स्विकार केला. खेड, बडोदा, वर्धा, नागपूर, पुणे अशा अनेक ठिकाणी शिक्षणासाठी त्यांनी पायपीट केली. त्यानंतर शिक्षकी पेशाची नोकरीही केली.


केशवसुतांनी विद्यार्थीदशेपासून कविता लिहिण्याचा प्रारंभ केला असला तरी १८८५ ते १९०५ हाच त्यांचा काव्यरचनाकाल म्हणता येईल. त्यांच्या आजवर जवळपास १३५ रचना उपलब्ध आहेत. कवी रे.ना.वा.टिळक, कवी वसंत अशा मान्यवर कवींचा सहवास केशवसुतांना लाभला. काव्य हाच जीवनध्यास असल्याने केशवसुत यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा शोधल्या, नवे प्रयोग केले.

इंग्रजीतील स्वच्छंदी काव्यरचना त्यांना विशेष प्रिय होती. स्फुट या प्रकारात त्यांनी अनेक रचना केल्या. कवित्व, कवीपण, दृष्टीकोन, क्रांतिकारकत्व व श्रेष्ठत्व हे सर्व त्यांच्या वादाचे विषय ठरले. त्यामुळे आधुनिक मराठीतील केशवसुत हे एक वादग्रस्त कवी समजले गेले.


व्यक्तीगत स्नेहबंध, कवी व कवित्व, स्त्रीपुरूष प्रेम, निसर्ग, सामाजीक बंडखोरी, गूढ साक्षात्कारी अनुभुती असे विविध विषय केशवसुत यांनी त्यांच्या काव्यरचनेत हाताळले. स्फुर्ती, आम्ही कोण, कवितेचे प्रयोजन, प्रतिभा, भ्रुंग, पुष्पाप्रत, फुलपाखरू, तुतारी, नवा शिपाई अशा त्यांच्या अनेक गाजलेल्या कविता आहेत.


७ नोव्हेंबर १९०५ रोजी वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी या महान कवीचा प्लेग या आजाराने अल्पायुषी अंत झाला.  बालकवींप्रमाणेच केशवसुत हे सुद्धा अल्पायुषी कवी ठरले. यांच्याकडे काव्यनिर्मितीची अफाट प्रतिभा होती.

केशवसुत अजून जर १५/२० वर्षे जगले असते तर आज मराठी कविता अजून समृद्ध झाली असती. आणि केशवसुतांच्या अजून छान छान कविता आपल्याला अभ्यासता आल्या असत्या. केशवसुतांच्या मृत्यूनंतर केशवसुत यांच्या कवितांचा संग्रह हरि नारायण आपटे यांनी प्रकाशित केला. गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर हे सर्व कवी स्वतःला केशवसुतांचे शिष्य समजत असत.

********************

त्यांच्या अनेक गाजलेल्या कवितांपैकी “आम्ही कोण?” या कवितेचा आस्वाद आपण घेऊयात.


केशवसुत स्वाभिमानी मनाने आपल्या साहित्यिक कलेची आणि साहित्यिकांची स्तुती करताना सांगतात की आम्ही देवाचे लाडके आहोत आणि आम्हाला देवानेच जणू या पृथ्वीवरती पाठविले आहे. आम्ही आमच्या दूरदृष्टीने या पृथ्वीवरती सर्वत्र लिलया फिरू शकतो, आमच्या प्रतिभेने सर्वत्र पाहू शकतो.

आमच्या हातामध्ये जादू आहे. कोणतीही मोठी गोष्ट आमच्यापुढे फिकी आहे. दाण्यावरचं टरफल/आवरण काढल्यावर जे सत्व उरतं ते म्हणजे आम्ही अशी पुस्ती कवी जोडतो.


असूर राक्षस प्रत्यक्षात असतात का माहीत नाही, पण आम्ही त्यांना पाहू शकतो, वर्णन करू शकतो. आमच्या कलेतून कृतीतून सदा मधूर रस पाझरत असतो आणि त्यातूनच पृथ्वीवरती सर्वत्र क्षेम कुशल मंगल होत असते.आम्हाला वगळलं तर तारांगण गतीहीन निस्तेज फिके होईल. आणि आम्हाविना हे जीवन सुद्धा कवडीमोलाचे होईल.

साहित्याची प्रशंसा आणि कौतुक करणारा एक वेगळा विचार साहित्यिकांची आणि कलेची स्तुती करून केशवसुत यांनी आपल्या या कवितेत मार्मिकतेने मांडला आहे.
ही कविता पाठ्यशाळेत अभ्यासक्रमात होती. चला तर मित्रांनो पुन्हा शाळेतील दिवसात जाऊन या कवितेचा प्रत्यक्ष आनंद घेऊयात..

आम्ही कोण?

—————-

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी?आम्ही असू लाडके-

देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;

विश्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया,

दिक्कालांतुनि आरपार अमुची द्रुष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;

पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया –

सौंदर्यातिशया,अशी वसतसे जादु करांमजि या;

फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्व आम्ही निके!

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?

पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?

ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;

ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा-गतप्रभ झणी होतील तारांगणे;

आम्हांला वगळा-विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

◆◆◆◆◆-

केशवसुत

◆◆◆◆◆

संदर्भ – इंटरनेट

विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.

Vijay Joshi sir

(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)


सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *