शेतकऱ्याला पाणी मिळालं की तो चमत्कार करून दाखवितो’ हा सिद्धांत मांडणारे व प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव फुलसिंग नाईक वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रा पुरतेच बोलायचे झाले तर एवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत मुख्यमंत्रीपद भूषविणारे ते एकमेव मुख्यमंत्री होते.
वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद गावाजवळ ‘गहुली’ या गावात नाईक फुलसिंग व माता हुनकाबाई यांच्या पोटी झाला वसंतराव नाईक यांचे मूळ आडनाव राठोड; परंतु ‘गहुली’ हे खेडे त्यांचे आजोबा चतुरसिंग राठोड यांनी बसविले त्यांनी जमिनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते बंजारा समाजाचे नायक झाले यावरून पुढे ते नाईक या नावाने ओळखू लागले. त्यांचे
प्राथमिक शिक्षण पोहरादेवी, उमरी, भोजली आणि बन्सी या गावात झाले तर माध्यमिक शिक्षण अमरावती व नागपूर येथून पूर्ण केलं अमरावतीच्या ‘नील सिटी हायस्कूल’ मधून एसएससी परीक्षा पास झाल्याच्या नंतर नागपूरच्या मॉरिशस महाविद्यालयातून बी ए पदवी पूर्ण केली आणि कायद्याचे शिक्षण घेतले. विद्यार्थी वयातच वसंतराव नाईक यांच्या मनावर महात्मा ज्योतिबा फुले व डेल कार्नेगी यांच्या विचारांची छाप होती. वसंतरावांचे व्यक्तिमत्व अतिशय राजस महाविद्यालयीन जीवनात नागपूरच्या प्रतिष्ठित घाटे घराण्यातील वत्सलाबाई या ब्राह्मण उच्चवर्णीय जातीतील मुलीशी त्यांचा आंतर जातीय विवाह झाला. पुढे ते 1943 मध्ये पुसद तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनले तर 1946 मध्ये पुसद नगरपालिकेचे नगराध्यक्ष होण्याचा बहुमान ही त्यांना मिळाला. शेतकऱ्यांच्या धान्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी धान्यगंज (ग्रेन मार्केट) शहराच्या मध्यभागी उभारले. देशात होऊ घातलेल्या 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेशात महसूल खात्याचे व उपमंत्री बनले, 1956 ला दुसऱ्यांदा सहकार कृषी तथा दुग्ध व्यवसाय मंत्री होण्याचा मानही मध्य प्रदेशातून त्यांना मिळाला. 1957 ला द्विभाषिक राज्यात मुंबई प्रांतात कृषी मंत्री झाले परत 1960 मध्ये महसूल मंत्री होऊन लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष बनले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले आणि श्री मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाले. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर श्री वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शेती यंत्राणे आणि तंत्राने होणार नाही आणि मंत्रानेही होणार नाही शेतीत गाडून घेतल्याशिवाय ती फुलत नाही. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत मी बसलेला असलो तरी देखील मी शेतीच्या बांधावर बसलेला आहे “असे ते नेहमी म्हणायचे महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणी त्यांच्याच काळात झाली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांनाच जाते. नवी मुंबईची निर्मिती ही वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीची उत्तम उदाहरण मानले जाते. महाराष्ट्रातील दापोली, अकोला, राहुरी व परभणी येथील चार कृषी विद्यापीठांची स्थापना त्याचबरोबर कोराडी, पारस, खापरखेडा आणि परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रांची निर्मिती केली. शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचे लेकरंसुद्धा कलेक्टर झाली पाहिजेत हे त्यांचं स्वप्न होतं. महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांतीला सुरुवात झाली म्हणूनच त्यांना हरितक्रांतीचे प्रणेते असं म्हटलं जातं. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय अभ्यास मंडळात वसंतराव नाईक यांची आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या शिष्टमंडळात निवड करण्यात आली. जपान (1958) युगोस लाइव (1964) चीन अमेरिका (1970) सिंगापूर (1978) इत्यादी देशांच्या अभ्यास दौऱ्यातून शेतीविषयक कामाची अतिशय बारकाईने पाहणी केली. कापसावरील प्रक्रिया उद्योगांचा विशेष अभ्यास केला अन कृषी आणि कृषी औद्योगीकरणाचा प्रसार केला. मुख्यमंत्री कालावधीत मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून दिला. बुटीबोरी (नागपूर), वाळुंज (छत्रपती संभाजीनगर) सातपूर अंबड (नाशिक) इस्लामपूर ( सांगली) अशा अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण केल्या. महाराष्ट्र बियाणे महामंडळ ( महाबीज) ची निर्मिती केली. वसंतराव नाईक कृषिमंत्री असताना त्यांच्या साठी असलेल्या ‘डगबिगन’ बंगल्यावर 7 नोव्हेंबर 1956 ला राहायला गेले आणि त्या बंगल्यांचे ‘वर्षा ‘असं नामांतर केलं आणि मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी तो बंगला सोडला नाही; त्यामुळे तेव्हाचे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान’ सह्याद्री’ हे मागे पडून ‘वर्षा’ हेच नाव प्रसिद्धीला आलं. 3 ऑक्टोबर 1965 रोजी पुणे येथे शनिवार वाड्याच्या समोरील सभेत एक ऐतिहासिक घोषणा केली “दोन वर्षामध्ये महाराष्ट्र अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण झाला नाही तर मला या शनिवारवाड्या पुढे फाशी द्या. “असं ठणकावून सांगून त्या शब्दाला खऱ्या अर्थाने जागले. ‘आरे’ चा सर्वांगीण विकास कार्यक्रम असेल की कापूस एकाधिकार योजना 1970 च्या दुष्काळातील रोजगार हमी योजना, 1967 च्या कोयना भूकंपग्रस्ताचे पुनर्वसन तर मुख्यमंत्री म्हणून पंचायत राजची प्रभावी अंमलबजावणी, कापूस एकाधिकार योजना, विधानसभा विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा जिल्हा नियोजन मंडळाची निर्मिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) निर्मिती. बालकांसाठी ‘किशोर’ व’ जीवन शिक्षण’ मासिक सुरू करणे 22 जून 1960 रोजी वसंतराव नाईक समितीची स्थापना झाली समितीच्या शिफारनुसार एक मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 मंजूर करण्यात आला हे सगळेच निर्णय वसंतरावाच्या कार्यप्रणालीची, दूरदृष्टीची छबी दाखवतात. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात वणवण भटकणाऱ्या समाजातील पालक आपल्या मुलांना शाळेत कसे बरे पाठवतील ? आणि पाठवलीच तर व्यसनात बुडालेला हा पालक आपल्या पोरावर काय संस्कार करणार ? घरात कोणते शैक्षणिक वातावरण असणार म्हणून नाईक साहेबांनी आश्रम शाळेची कल्पना राबविली 15 20 तांडे मिळून एक आश्रमशाळा सुरू केली. भटक्या समाजाला स्थिर करण्यासाठी ठोस प्रयत्न करणारा महाराष्ट्रातला पहिला महापुरुष म्हणजे महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक हेच म्हणावे लागेल. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवून जिल्ह्यातून 1 लाख 37 एकर शेती दान स्वरूपात भूमिहीनांना मिळवून दिली त्यांनी केलेलं शेतीविषयक कार्य हे महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेलं त्यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक करून तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी रोजगार हमी योजना देशभरात राबविली अशा या दूरदृष्टया हरितयोध्याचा मृत्यू 18 ऑगस्ट 1979 मध्ये सिंगापूर येथे झाला 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी तर एक जुलै हा वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या राज्यातील कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 1 जुलै 2013 रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाचा नामविस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ असा करून त्यांचा गौरव करण्यात आला. पिढ्यान पिढ्या इतिहास त्यांच्या कार्याची दखल घेतच राहील त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
श्री रविराज केसराळीकर
9970926976

